Nashik Grape Market: नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्षांच्या निर्यात हंगामाला सुरुवात झाली आहे. सध्या रशिया, ओमान आणि दुबई या बाजारपेठांमध्ये द्राक्ष रवाना होत आहेत. यामध्ये बागलाण तालुक्यातील पहिला कंटेनर रशियाला रवाना झाला आहे. सध्या रशियातून द्राक्षांना सर्वाधिक मागणी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले..कसमादे परिसर अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये बागलाण तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून द्राक्ष काढणीला प्रारंभ झाला. तालुक्यातील पिंगळवाडे, बिजोटे गावांमध्ये काढणीला वेग आला आहे. सध्या पांढऱ्या द्राक्षांचे उत्पादन अधिक असून रंगीत द्राक्षांची उपलब्धता तुलनेने कमी आहे..सुरुवातीच्या काळात स्थानिक बाजारपेठेसह दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ आणि उत्तर प्रदेशातील विविध बाजारपेठांमध्ये द्राक्षे पाठविली जात होती. आता निर्यातीचे व्यवहारही सुरू झाले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने बागांमधील रोग-किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहिला आहे..Grape Crop Advisory: वाढीच्या टप्प्यातील द्राक्ष बागेतील परिस्थिती.बंदरांवर कोंडी, कंटेनरची टंचाई : निर्यातीला सुरुवात झाली असली, तरी सागरी वाहतुकीतील अडचणी निर्यातदारांसमोर आव्हान ठरत आहेत. रशियाला जाणारे कंटेनर सेंट पीटर्सबर्ग बंदराच्या दिशेने रवाना होत आहेत. मात्र तेथे कंटेनरची मोठी कोंडी असून नोवोरोसिस्क हे दुसरे महत्त्वाचे बंदर सध्या बंद आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे सागरी वाहतुकीचे मार्ग बदलावे लागत आहेत..Grape Farming Tips: दुष्काळी परिस्थितीत फळछाटणीनंतर द्राक्ष बागेचे व्यवस्थापन.अनेक कंटेनर विविध बंदरांमध्ये अडकले असून रिकामे कंटेनर वेळेत उपलब्ध होत नसल्याने निर्यातीच्या नियोजनावर परिणाम होत आहे. रशियाच्या बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना दरवर्षी चांगली मागणी असते. यंदाही दर्जेदार माल उपलब्ध होत असल्याने निर्यातीचा हंगाम सकारात्मक सुरू झाला आहे. आगामी काळात निर्यातीला आणखी वेग येईल, अशी अपेक्षा द्राक्ष निर्यातदार व मॅग्नस फार्म फ्रेशचे संचालक लक्ष्मण सावळकर यांनी व्यक्त केली..दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेतकऱ्यांनी बागा जगविल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी संरक्षण शेतीचा अवलंब करीत आहेत. सुरुवातीच्या पावसापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करून उत्पादन घेतले आहे. यंदा तुलनेने नुकसान कमी व उत्पादन व दर चांगले असल्याने दिलासा मिळाला आहे.कृष्णा भामरे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंगळवाडे, ता. बागलाण.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी राहिल्याने निर्यातीसाठी दर्जेदार द्राक्षे तयार झाले आहेत. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठांमध्येही मागणी चांगली आहे. यंदा द्राक्षांच्या गुणवत्तेनुसार दर मिळत असल्याने समाधानकारक वातावरण आहे. मागील काही वर्षांत झालेले नुकसान यंदा काही अंशी भरून निघेल.पोपट जाधव, सरपंच व द्राक्ष उत्पादक, बिजोटे, ता. बागलाण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.