Onion Quality Issue: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत मध्य प्रदेशातून आणलेल्या निकृष्ट दर्जाच्या कांद्याचा शिरकाव झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. .मध्य प्रदेशातून आणलेले कांद्याने भरलेले ट्रक, ओळख पटलेल्या रिकाम्या गोण्या तसेच गोदामात सापडलेला सडका कांदा असे अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत असून चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांनी समोर आणलेले पुरावे व महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांमधूनही या प्रकरणातील अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत..जुलै महिन्यात कांदा खरेदीला वेग आल्यावर या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली. सुरुवातीला देवळा तालुक्यातील उमराणे-झाडी परिसरातील ‘एनसीसीएफ’ संबंधित खरेदी केंद्राजवळ मध्य प्रदेशातून आणलेल्या निकृष्ट दर्जाच्या कांद्याने भरलेले २० ते २५ ट्रक आढळून आले. गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी दोन ट्रकमधून कांदा उतरविताना पाहिल्यानंतर ट्रक अडवून धरले. .Onion Procurement Issue: ‘ए’ ग्रेडच्या नावाखाली कांदा खरेदीत पिळवणूक.या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सटाणा-ठेंगोडा मार्गावरील सावकी फाटा येथे इंदूरमधील व्यापाऱ्यांच्या स्टिकर असलेल्या शेकडो रिकाम्या गोण्या आणि सडका कांदा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक स्पष्ट होऊ लागली..दरम्यान, चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे खासगी गोदामात मध्य प्रदेशातून कांदा येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर चांदवडचे तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार विश्वजित शाहू यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ३० जुलै रोजी महसूल, कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त पथकाने पाहणी केली..यावेळी इंदूरहून आणलेला सुमारे ६०० क्विंटल, १० ते २० मिमी आकाराचा ‘चिंगळी’ प्रकारातील निकृष्ट कांदा शेडमध्ये साठवून ठेवलेला आढळला. तेथे उपस्थित संजयकुमार बाबूलाल अग्रवाल (रा. धुळे) यांच्या चौकशीतून हा कांदा इंदूरहून आणल्याचे आणि नायलॉन गोण्यांमध्ये साठविल्याचे निष्पन्न झाले. संबंधित व्यापाऱ्याकडे कागदपत्रे असली, तरी मध्य प्रदेशातील निकृष्ट कांदा नाशिकमध्ये नेमका कोणत्या उद्देशाने आणला गेला, हा प्रश्न अनुत्तरित आहे..Onion Procurement: शासकीय कांदा खरेदीवरील संशयाचे धुके गडद.प्रत्यक्ष पंचनामा करून या गंभीर प्रकरणाची संपूर्ण माहिती नाफेडच्या शाखा व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आली आहे. योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. तपासात हलगर्जीपणा झाल्यास संपूर्ण प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मात्र, नाफेड प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नसल्याचा आरोप केला जात आहे..मध्य प्रदेशातून अवघ्या ५ ते ७ रुपये प्रति किलो दराने आणलेला निकृष्ट कांदा सरकारी खरेदीत स्वीकारला गेल्याचा संशय आहे. मात्र आता स्थानिक शेतकऱ्यांचा दर्जेदार कांदा किरकोळ कारणांवरून नाकारला जात आहे. त्यामुळे सरकारी खरेदी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे..संशयास्पद घडामोडी२८ जुलै : उमराणे-झाडी परिसरात परराज्यांतील कांद्याचे २० ते २५ ट्रक आढळले.२९ जुलै : सावकी फाटा येथे इंदूरमधील व्यापाऱ्यांच्या स्टिकर असलेल्या २५० ते ३०० रिकाम्या गोण्या व सडका कांदा आढळला.३० जुलै : मंगरूळ येथील गोदामात ६०० क्विंटल ‘चिंगळी’ प्रकारातील निकृष्ट कांदा आढळला.२ ऑगस्ट : राहुड गावाजवळ पुन्हा मध्य प्रदेशातील कांद्याच्या छापील रिकाम्या गोण्या सापडल्या..परराज्यांतील निकृष्ट व सडका कांदा स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्यात मिसळून गोदामे भरली जात असल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रिकामे बारदानाही गिरणा नदी व राष्ट्रीय महामार्गावर फेकल्याचे निदर्शनास आले आहे.कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. शेतकरी आणि ग्राहकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांना बोलावून फेकून दिलेल्या गोण्या आणि कांद्याचा पंचनामा करण्यात आला आहे.किरण मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, मोरेनगर, ता. बागलाण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.