के. एच. शिरगापुरे, संजय बडेरेशीम उद्योगासाठी आवश्यक त्या हिरव्या पाल्याची उपलब्धतेसाठी तुतीची रोपवाटिका तयार करणे, रोपवाटिकेमध्ये चार ते पाच महिने रोपे जोपासल्यानंतर त्यांची शेतामध्ये लागवड करणे आवश्यक असते. लागवडीनंतर सामान्यतः तीन महिन्यात चांगला पाला येतो. हा पाला मिळू लागेपर्यंतच्या तीन महिन्यात कीटक संगोपनगृहाची उभारणी करून घेता येते. या कीटक संगोपनगृहात अंडीपुंज किंवा चॉकी अळ्या घेणे, अळ्याची जोपासना करणे, अळ्या कोष बांधतात. हेच आपले कोषाचे उत्पादन. कोष बाजारात विक्री केल्यानंतर बऱ्यापैकी चांगले उत्पन्न मिळू शकते. असे या उद्योगाचे स्वरूप आहे. .तुती लागवडमहाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता तुतीची वाढ जोमाने होऊ शकते. वार्षिक पर्जन्यमान ६०० ते २५०० मि.मि. असलेल्या ठिकाणी तुतीची वाढ होऊ शकते. पावसाळ्यात दहा दिवसातून एकदा ५० मि.मि. पाऊस झाल्यास तुतीची चांगली वाढ होते. तुती लागवडीसाठी जमीन निवडताना शक्यतो खोल, पाण्याचा उत्तम योग्य निचरा होणारी, चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवणारी व भुसभुशीत असावी. तापमान १२ ते ४० अंश सेल्सिअस, पाच ते दहा तास सूर्यप्रकाश या बाबी तुती वाढीसाठी व उद्योगासाठी आवश्यक आहेत..Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र.महाराष्ट्र राज्यासाठी तुतीची सुधारित जातीव्ही १ ः या जातीच्या फांद्या- सरळ जाड असतात. पाने आकाराने मोठी, लांब, गडद हिरव्या रंगाची लुसलुशीत असतात. पानातील ओलावा ७० टक्के असतो. मुळे फुटण्याचे प्रमाण ९४ टक्के असते. प्रति वर्ष हेक्टरी ६० ते ७० टन हिरव्या पानाचे उत्पादन मिळते. या जातीच्या लागवडीसाठी ६.२ ते ६.८ सामू असलेली काळी किंवा तांबडी जमीन लागवडीस योग्य आहे. योग्य खताची मात्रा व मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी, प्रामुख्याने वाढीव अवस्थेतील कीटक संगोपनासाठी या जातीची शिफारस केली जाते..एस ३६ ः या जातीच्या फांद्या सरळ, उभ्या व पसरट असतात. पाने मोठी, मऊ, लुसलुसीत, साधी आणि हिरवी असतात. मुळे फुटण्याचे प्रमाण ४८ टक्के असते. प्रति वर्ष हेक्टरी ४० ते ५० टन हिरव्या पानाचे उत्पादन मिळते. प्रामुख्याने चॉकी अवस्थेतील कीटक संगोपनासाठी या जातीची शिफारस आहे..तुती बेण्याकरिता बाग तयार करणेज्यांच्याकडे सुधारित वाणाची लागवड आहे, असे शेतकरी तुतीची रोपे तयार करू शकतात. त्यासाठी काही झाडांची वेगळी जोपासना मातृवृक्ष म्हणून करावी. त्यामध्ये वेगळ्या जातीची झाडे असल्यास ती झाडे काढून टाकून शुद्धता जपावी. एकाच जातीची सुधारीत वाणांची बेणे उपलब्ध होतील. त्यामधून व्ही१ जातीकरिता ६ महिन्यापर्यंत वाढ झालेल्या व एस ३६ जातीकरिता ८ महिन्यांपर्यंत वाढीच्या जुन्या फांद्यांची निवड करावी..रोपवाटिकेची तयारी बेणे कलमे तयार करणेजून ते सप्टेंबर या महिन्यात तुती लागवड केली जाते. लागवडीपूर्वी ३ ते ५ महिने आधी म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात नर्सरी करावी. उपरोक्त कालावधीत नर्सरी केल्यास प्रत्यक्ष लागवड कालावधीत योग्य वाढीची रोपे तयार होतात. तुती बेण्याकरिता योग्य फांद्यांची निवड करावी. निवडलेल्या फांद्यांचा शेंड्यांचा कोवळा व बुंध्याकडील जाड भाग बेण्याकरिता वापरू नये. साधारणतः १२ ते १५ सें.मी. लांबीचे व १० ते १५ मि.मी. जाडीचे ३ ते ४ डोळे असलेले बेणे निवडावे. या फांद्यांची आणि बेण्याची साल निघणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी बेणे छाटणी करण्यासाठी प्रामुख्याने धारदार सिकेटर वापरावा. बेणे कलमे तयार केल्यानंतर लागवड होईपर्यंत ओल्या बारदाण्यामध्ये सावलीत साठवणूक करावी. तुती बेणे बुरशीनाशकाच्या ०.१ टक्के द्रावणात ३० मिनिट बुडवून ठेवावेत. या प्रक्रियेनंतर तुती बेणे जमिनीत त्वरित लावावेत. म्हणजे तुटाळी किंवा मर होणार नाही. .Mulberry Cultivation : तुती लागवडीसाठी मिळणार एकरी दोन लाखांचे अनुदान.जमिनीत लागवडरोपवाटिकेकरिता ३ मी. x १ मी. x १० सेंमी. आकाराची गादी वाफे तयार करावेत. त्यात २० टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळून घ्यावे. रोपवाटिकेला पाणी देण्यासाठी वाफ्याच्या दोन्ही बाजूस सरी तयार करून घ्याव्या. तुती कलमांच्या लागवडीच्या १ ते २ दिवसाआधी वाफ्याला पाणी द्यावे. कलमांच्या लागवडीच्या वेळेस दोन रांगेतील अंतर २० सेंटीमीटर तर दोन रोपांमधील अंतर १० सेंटीमीटर ठेवावे. कलम लावताना बेण्याची काडी उभी ठेवावी. एकच डोळा जमिनीच्या वर ठेवावा. लागवडीनंतर बेण्याच्या बाजूची माती दाबून घ्यावी..रोपवाटिकेचे व्यवस्थापनरोपवाटिकेला प्रत्येक ४ दिवसांनी पाणी द्यावे. लागवडीच्या एक महिन्यानंतर प्रती हेक्टरी १०० किलो युरिया जमिनीत टाकून चांगला मिसळून घ्यावा. या काळात तुती रोपांवर बुरशीजन्य रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याकडे लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात. अशा प्रकारे रोपवाटिकेची साधारणतः ४ महिने जोपासना करावी..शेतात तुती रोपांची लागवडलागवडीपूर्वी जमीन ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या साह्याने ३० ते ४० सेंमी. खोल नांगरून घ्यावी. प्रति हेक्टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे. ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या साह्याने जमीन सपाट करून घ्यावी. काडीकचरा वेचून घ्यावा. तुतीची लागवड जोडओळ पद्धतीने ५ x ३ x २ फूट या अंतरावर करावी. जोडओळ पद्धतीने झाडांची संख्या हेक्टरी १३,८८८ इतकी बसते. जोड ओळ पद्धतीमुळे तुतीच्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळते, त्यामुळे रोग व किडींना अटकाव होण्यास मदत होते. लागवडीसाठी ४ महिन्यांच्या रोपाची निवड करावी. रोपांची काढणी करताना मुळे व फांद्यांना इजा न पोहोचवता काळजीपूर्वक वाफ्यातून काढावीत. लागवड होईपर्यंत रोपे, ओल्या गोणपाटात सावलीत ठेवावी. त्वरित लागवडीकरिता वापरावी. लागवडीपूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या ०.१ टक्के द्रावणात १५ ते ३० मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यातून जमिनीमध्ये रोपे लावून घ्यावीत. त्यानंतर चहू बाजूंनी माती व्यवस्थित दाबून घ्यावी. त्वरित हलके पाणी द्यावे. तुती बागेस प्रत्येकी ७ ते ८ दिवसांत एकदा पाणी द्यावे. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी तुतीचा पाला कीटक संगोपनाकरिता वापरण्यासाठी तयार होतो..तुतीची छाटणीलागवडीनंतर सहा महिन्यांनी तुतीची झाडे प्रथम छाटणीकरिता तयार होतात. तुती झाडांची छाटणी जमिनीपासून १५ ते २० सेंमी अंतरावरून करावी.उत्पादनएक एकर तुती लागवडीतून एस-३६ आणि व्ही-१ सारख्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती प्रति वर्ष प्रति एकर २०,००० ते २४,००० किलो तुती पाल्याचे उत्पादन देतात. बाय व्होल्टाइन कीटक संगोपनामध्ये एका बॅचसाठी साधारणतः ३५०० किलो खाद्य लागते.शिरगापुरे के. एच., ९५४५६९५१४१सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.