सुनील चावकेIndia US Relation: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाब्दिक हल्ल्यांना सामोरे जाताना अध्यात्म-दर्शनात मौलिक मानली जाणारी मौनाची महत्ता समजून घेत आहेत. लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हेच सर्वांत प्रभावी माध्यम असल्याची प्रचिती ‘ऑपरेशन सिंदूर’ला अचानक विराम लागल्यापासून त्यांना येत आहे..दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी पदग्रहण समारंभासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले नाही. पण फेब्रुवारीमध्ये त्यांची स्वतंत्रपणे भेट झाली. त्यात आयात शुल्क आणि भारत-अमेरिका व्यापार करारासह उभय देशांदरम्यानच्या सहकार्यावर चर्चा झाली. पण ९ एप्रिल रोजी जगातील सर्व देशांवर सरसकट आयात शुल्क लावताना ट्रम्प यांनी भारताला कोणतीही विशेष सवलत दिली नाही. तिथून भारत-अमेरिका संबंधात तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली..त्यानंतर महिनाभरातच पहेलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६ भारतीय पर्यटकांची निर्घृण हत्या करण्याची घटना घडली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील अतिरेक्यांचे तळांवर लष्करी कारवाई केली. या संघर्षाची परिणती युद्धात होण्याची स्थिती उद्भवली. १० मे रोजी भारत-पाकिस्तान युद्ध थांबल्याची घोषणा सर्वप्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर केली. भारत-पाकिस्तान वादात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य करायचा नाही, ही भारताची पहिल्यापासून भूमिका असल्याने हा धक्का होता..Indian Politics: विरोधकांपुढे व्यापक आव्हान .सौहार्दाला कोरडप्रत्यक्ष भेटीत किंवा समाज माध्यमांवर संधी मिळेल तेव्हा पंतप्रधान मोदी आणि पर्यायाने भारताला गोत्यात आणण्याच्या ट्रम्प यांच्या वाचाळ डिप्लोमसीला सावध उत्तर देणे भारतासाठी क्रमप्राप्त ठरले. जून महिन्यात जी-७ देशांच्या बैठकीच्या निमित्ताने कॅनडाच्या कनानास्किस शहरात मोदी-ट्रम्प भेट टळली आणि तिथून उभय नेत्यांमधील सौहार्दाला कोरड पडत गेली. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांना टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी न जाण्याचा पवित्रा घेतला..मलेशियाच्या कौलालंपूरमध्ये आयोजित आसियान देशांच्या शिखर परिषदेत ‘डॉयलॉग पार्टनर’ देशांपैकी एक ट्रम्प यांची ‘डॉयलॉग’रूपी मुक्ताफळे प्रत्यक्ष ऐकायला नको म्हणून पंतप्रधान मोदी यांनी ‘आभासी उपस्थिती’चा सोईचा पर्याय निवडला आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी यावे, अशी विनंती मलेशियाच्या पंतप्रधानांनी केली. पण दिवाळी-छटपूजेचे (आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील व्यग्रता) कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात आले..भारत-पाकिस्तान संघर्षविराम, आयात शुल्क, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आयात शुल्कावर २५ टक्क्यांचा अतिरिक्त भुर्दंड, अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांची अपमानास्पद पद्धतीने केलेली परतपाठवणी, अमेरिकेत नोकरीसाठी इच्छुक भारतीयांसाठी एच-१ बी व्हिसासाठी एक लाख डॉलर आकारण्याची घोषणा, अमेरिकेत निर्यात करणाऱ्या भारतीय औषध कंपन्यांवर लावलेले १०० टक्के आयात शुल्क, अशी संधी मिळेल तिथे कोंडी करून भारतावर दबाव आणण्याचा खेळ ट्रम्प यांनी गेल्या दहा महिन्यांपासून आरंभला आहे..आपल्या हस्तक्षेपामुळेच भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील विकोपाला जाऊ पाहणारे युद्ध थांबले, असे ट्रम्प यांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक वेळा जाहीरपणे सांगितले आहे. भारताचे पंतप्रधान आणि भारताविरुद्ध ट्रम्प वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मनास येईल ते बोलले आहेत. भारताशी बिघडलेले संबंध कधीही सुधारता येतील, या विश्वासात अमेरिकेचा भारताविषयीचा तुसडेपणा दडला आहे..सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि लष्करी सामर्थ्य असलेला देश या दुहेरी शक्तीचा वापर करून ट्रम्प कोणाचाही जाहीर पाणउतारा करतात. त्यातून चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही सुटलेले नाहीत. व्हाइट हाउसमध्ये माध्यमांसमोर बसवून अनेक राष्ट्रप्रमुखांची झाडाझडती घेत राष्ट्रप्रमुखांवर दबाव आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असतो. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेस्की यांच्या मानापमाननाट्याचे थेट प्रक्षेपण जगभराने पाहिले. ट्रम्प यांच्यासमोर मोदी आले तर ते त्यांच्या देखत काय बोलतील याचा नेम नाही..Indian Agriculture: ग्राहकांच्या आवडीनुसार ठरवा पीकपद्धती.जागतिक वर्चस्वाला धोकाअमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला चीन-भारत-रशिया यांच्या मैत्रीचा सर्वाधिक धोका संभवतो. ब्रिक्स देशांचे जनक असलेल्या चीन-भारत-रशियाला एकमेकांपासून तोडून अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेचे वर्चस्व कायम राखण्यासाठी ट्रम्प जंगजंग पछाडत आहेत. जगातील प्रमुख देशांना त्यांची ताकद आणि कमकुवतपणा यांच्याआधारे चिन्हीत करून, आयात शुल्काचा धाक दाखवून त्यांच्याशी स्वतंत्रपणे बोलणी करण्याचा गृहपाठ करूनच ट्रम्प व्यापारयुद्धात उतरले आहेत..भारत-रशिया संबंध खूपच भक्कम आणि स्थिर असतानाच रशियाकडून तेलखरेदी करणे बंद करणार असल्याचे मोदी यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. चीन-भारत संबंधांमध्ये सलोखा नसला तरी उभय देशांमधील व्यापारसौहार्द टिकून आहे. भारताला दबावाखाली ठेवून ट्रम्प भारताची धोरणे जाहीर करण्याच्या प्रयत्नांमुळे भारत-चीन आणि भारत-रशिया संबंधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे..या ट्रम्पनीतीला भारत सध्यातरी शह देऊ शकत नाही. रशिया-युक्रेन युद्धाविषयी ट्रम्प-पुतीन यांच्यात तह होईल तेव्हाच या संकटातून भारताची अंशतः सुटका होईल. पुढच्या वर्षी अमेरिकी काँग्रेस आणि सिनेटच्या मध्यावधी निवडणुका होईपर्यंत ट्रम्प यांची दादागिरी अशीच कायम राहील, असे चीन, रशिया आणि भारतासह बहुतांश देशांना वाटते. या दोन्ही सभागृहांमधील बहुमताला धक्का बसल्यास ट्रम्प यांचा दबदबा आणि ताकद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पण तसे झाले नाही तर ट्रम्प यांचा वारू आणखीच उधळेल..परिणामी, ट्रम्प यांच्याविषयी भरवसा न राहिल्याने त्यांना टाळणेच उचित ठरेल, अशा निर्णयाप्रत भारताची मुत्सद्दी आलेले दिसतात. समोरासमोर भेट होऊन ट्रम्प यांनी त्यांना उभय देशांंच्या व्यापारात हव्या असलेल्या गोष्टी पंतप्रधान मोदींना स्वीकारण्यास भाग पाडल्यास त्याचे भारताला न परवडणारे परिणाम व्यापार वाटाघाटींवर होतील..अमेरिकेशी व्यापार वाटाघाटी आणि अन्य मुद्यांवर जो काही संवाद साधायचा असेल तो अधिकृत आणि मुत्सद्देगिरीच्या शालीन माध्यमातूनच साधायचा, असा सावध पवित्रा भारताने घेतला आहे. या सावधनीतीच्या केंद्रस्थानी आहे ते पंतप्रधान मोदी आणि भारताचे ‘मौन’. मोदींचे मौन ट्रम्प यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारे ठरू शकते. नव्या वर्षातील सर्व शक्यता गृहीत धरून भारताला सध्याच्या मौनातून भविष्यातील ‘आत्मनिर्भर’ परराष्ट्र धोरणाचा मार्ग प्रशस्त करावा लागणार आहे.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.