मेघा कोतुरवार, डॉ. भगवान आसेवारवातावरण बदलांमुळे बहुतांश पारंपरिक पिके शाश्वत उत्पादनाची हमी देऊ शकत नाहीत. अशा स्थितीमध्ये भरड धान्यांसारख्या हवामान विशेषतः तापमान व पावसातील बदल अधिक सहन करणाऱ्या पिकांचा समावेश आपल्या पीक पद्धतीमध्ये करणे गरजेचे आहे. बाजरी, नाचणी, समई, कोदो, कांगणी, ज्वारी आणि बाजरी इ. पिके पारंपरिक प्रमुख धान्यांपेक्षा (तांदूळ, गहू व मका) अधिक पोषकही आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू व दुष्काळग्रस्त अर्धशुष्क भागांमध्ये पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व जमिनीचा योग्य वापर करून त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी ही पिके फायदेशीर ठरू शकतात. .संवर्धित शेती म्हणजे काय?संवर्धित शेती ही शाश्वत शेतीची पद्धत असून, त्यात मातीचे आरोग्य टिकवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि पर्यावरणीय ताण कमी करण्यावर भर दिला जातो. त्यात मुख्यतः जमिनीची कमीत कमी मशागत, सतत जमिनीचे सुपीक थर जपणे आणि विविध पीक प्रणालींचा अवलंब या तीन घटकांवर भर दिला जातो. जमिनीत पिकांचे अवशेषांच्या आच्छादनसोबत पीक फेरपालटाला प्राधान्य असते. भरड धान्य पिके (उदा. नाचणी, बाजरी, कोदो, वरई) कोरडवाहू भागात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देतात. प्रतिकूल हवामानातही तग धरत असल्याने शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढू शकते. संवर्धित शेती पद्धतींच्या वापरातून उत्पादन खर्चही कमी राहतो..Millet Crop : पौष्टिक सुरक्षेचे महत्त्व समजून घ्या.संवर्धित शेतीचे फायदेमातीचे आरोग्य सुधारते – सेंद्रिय पदार्थ वाढवतो आणि मातीतील जैविक क्रियाशीलता टिकवतो.जलकार्यक्षमता – जल संधारण शक्य होऊन गरजेनुसार पाण्याचा वापर होतो.उत्पादन खर्चात बचत – नांगरणी कमी झाल्यामुळे इंधन, मजुरी आणि यंत्रसामग्रीवरील खर्च कमी होतो.जैवविविधतेचा संवर्धित – पीक विविधता वाढवून कीटक आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.हवामान बदलाशी सुसंगतता – तापमानातील चढ-उतार, अवकाळी पावसासारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची क्षमता वाढते..संवर्धित शेतीची मुख्य तत्त्वेकमीत कमी नांगरट : सूक्ष्मजीवांसाठी अनुकूल वातावरण तयार होते.पिकांच्या अवशेषाचे आच्छादन : यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि जमिनीची धूप थांबते.विविध पिकांची लागवड : शेती पद्धतीमध्ये पीक फेरपालटासोबतच आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. (उदा. ज्वारीसोबत चवळीची लागवड इ.) यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो..भरड धान्यांसाठी संवर्धित शेती का आवश्यक आहे?भरड धान्ये आणि संवर्धित शेती दोन्ही कमी पाण्यात चांगले उत्पादन देऊ शकतात. परिणामी, दुष्काळी आणि निम-शुष्क प्रदेशांसाठी एक आदर्श पद्धत ठरते.भरड धान्यांमध्ये पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. संवर्धित शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते. परिणामी पिकांचे पोषणमूल्य वाढते.भरड धान्यांची मुळे ही बहुतांश तंतुमय पद्धतीच्या असल्याने जमिनीची धूप रोखतात. संवर्धित शेतीमध्ये पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवल्यामुळेही जमिनीची धूप थांबते.संवर्धित शेतीमुळे जमिनीतील पोषक तत्त्वांचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो. कालांतराने पिकाचे उत्पादन वाढत जाते..संरक्षण शेती अंतर्गत भरड धान्यांची उत्पादनाची व्याप्तीसंरक्षण शेती ही एक कृषी परिसंस्था आधारित व्यवस्थापन प्रणाली असून, त्यातून अन्न सुरक्षा, आर्थिक उत्पन्न आणि पर्यावरणीय संसाधनांचे जतन यांचा मेळ घातला जातो. या प्रणालीत कमीत कमी नांगरणी, किमान ३० टक्के पीक अवशेषाचे जमिनीवर आच्छादन आणि पीक पद्धतीमध्ये कडधान्यवर्गीय पिकांचा विविध मार्गाने समावेश या तीन मूलतत्त्वांचा आधार घेतला जातो. त्याचे फायदे खालीलप्रमाणे...मातीचे संवर्धित ःभरड धान्य सामान्यतः अर्ध-कोरड्या आणि कोरड्या भागांमध्ये घेतली जातात. या भागात मातीची धूप आणि गुणवत्तेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. संवर्धित शेतीतील विना मशागत पद्धती, पिकांचे अवशेषांचे आच्छादन यामुळे मातीची धूप टळते. मातीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढत जाते. मातीतील ओलावा साठविण्याची क्षमता सुधारते..Millet Crop : पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग.पाण्याचे व्यवस्थापनज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अशा ठिकाणी कमीत कमी निविष्ठांच्या साह्याने भरड धान्ये घेता येतात. त्याला संवर्धित शेतीची जोड दिल्यास पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होते. आच्छादनासारख्या तंत्रांच्या वापराने मातीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते. मातीचा तापमान संतुलित राहते.जैवविविधता आणि कीड व्यवस्थापनशेतीत पिकांच्या आणि अन्य नैसर्गिक घटकांच्या जैवविविधतेला चालना दिली जाते. रासायनिक घटकांचा वापर किमान पातळीवर ठेवल्याने उपयुक्त कीटकांची संख्या वाढते. पीक वैविध्य आणि फेरपालट केल्यामुळे कीड आणि रोगांचे चक्र मोडले जाते. त्यामुळे संवर्धित शेतीमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव किमान पातळीवर राहण्यास मदत होते.हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता :भरड धान्य हे कठीण हवामान परिस्थितीतही वाढणारी पिके आहे. उदा. दुष्काळ, उष्णता आणि सुपीकता कमी असलेली माती इ. संवर्धित शेती पद्धतीत त्यांचा अवलंब केल्यास मातीतील ओलावा टिकवणे, धूप कमी करणे आणि जमिनीत सेंद्रिय कार्बन साठवणे या बाबी पिकांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करतात. शेती परिसरातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होते..अल्पभूधारकांसाठी वरदान :भरड धान्ये ही प्रामुख्याने अल्पभूधारक आणि आदिवासी शेतकऱ्यांकडून पिकवली जाणारी पिके आहे. त्यांनीच ही पिके आजवर जिवंत ठेवली आहेत. मात्र या शेतकऱ्यांपर्यंत संवर्धित शेतीची तत्त्वे पोचविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची शेती अधिक शाश्वत होण्यास मदत होईल. मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या भागांतील बाजरी व भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान आणि अन्नसुरक्षा सुधारू शकते.भरड धान्य उत्पादनात संवर्धन शेती पद्धतींचा अवलंब व यश स्थानिक परिस्थिती, शेताचे क्षेत्रफळ, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे ज्ञान व संसाधनांपर्यंत असलेली उपलब्धता अशा विविध घटकांवर अवलंबून असते. मात्र योग्य अशा संवर्धन शेतीच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास, शेतकरी अधिक शाश्वत आणि उत्पादक शेती पद्धती साध्य करू शकतात. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, तग धरण्याची क्षमता वाढू शकते.मेघा कोतुरवार, ९१५६३६६२६७आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषी विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.