डॉ. सुभाष के. देसाईDairy Industry Update: अमूल आणि मदर डेअरीने १२ नोव्हेंबर २०२४ पासून दुधाच्या दरात वाढ केली. टोंड दूध दोन रुपये, तर फुल क्रीम दूध चार रुपयांनी महागले. त्यामुळे टोंड दुधाचा दर ७२ रुपये आणि फुल क्रीम दुधाचा दर ७६ रुपये प्रतिलिटर झाला. मार्च २०२२ नंतरच्या चार वर्षांच्या कालावधीत दुधाच्या किमतीत सुमारे ३२ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जाते. ग्राहकांच्या खिशाला या दरवाढीचा फटका बसतो; परंतु या वाढीचा प्रत्यक्ष फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना किती मिळतो, हा खरा प्रश्न आहे. दूध गावातून शहरात पोहोचेपर्यंत त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. .दूध संकलन, स्वच्छता, शीतकरण, वाहतूक, प्रक्रिया आणि वितरण यासाठी मोठा खर्च होतो. दूध संघ आणि कंपन्या या खर्चाचा आधार घेऊन दरवाढीचे समर्थन करतात. मात्र दुसऱ्या बाजूला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चातही प्रचंड वाढ झाली आहे. जनावरांचा चारा, पशुखाद्य, औषधे, गोठ्याची देखभाल आणि मजुरी यांचे दर वाढले आहेत. त्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, तापमानातील चढ-उतार आणि ऋतुमानातील बदल यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. विशेषतः वाढत्या तापमानामुळे गायी-म्हशींच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट होते..यामागे आणखी एक महत्त्वाचे अर्थकारण आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले आहे. इथेनॉल उद्योगासाठी मका आणि उसासारख्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. त्यामुळे पशुखाद्य उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींवरही दबाव निर्माण होऊ शकतो. परिणामी पशुखाद्य महाग होते आणि त्याचा अतिरिक्त आर्थिक भार दूध उत्पादक शेतकऱ्यांवर पडतो. इथेनॉल धोरणाचे फायदे कोणाला मिळतात आणि त्याचा अप्रत्यक्ष खर्च पशुपालकांना किती सहन करावा लागतो, याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे..Maharashtra Dairy Industry: डेअरी उद्योगात तेजी.दुधाच्या किमतीमागे फॅटचेही अर्थकारण आहे. फुल क्रीम दुधामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याची किंमत टोंड दुधापेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात साधारणपणे दूध उत्पादन वाढते, तर उन्हाळ्यात घटते. त्यामुळे वर्षभर दुधाचा पुरवठा आणि मागणी यांचे गणित बदलत राहते. दूध उत्पादन पूर्णपणे घटले आहे असे नाही; मात्र उत्पादन वाढण्याचा वेग कमी झाला आहे. या परिस्थितीचा परिणाम बाजारातील किमतींवर होतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा बनला आहे. सहकारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या दूध संस्थांमुळे हजारो गावांतील शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचे साधन मिळाले. अनेक कुटुंबांचा संसार या उत्पन्नावर चालतो. मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार आणि शेतीसाठी लागणारा पैसा या व्यवसायातून उभा राहतो..मात्र या व्यवसायाचे खरे कष्ट बाहेरच्या माणसाला दिसत नाहीत. एका कुटुंबातील दोन तरुण माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनावरांच्या सेवेत गुंतलेली असतात. जनावरांसाठी गवत कापून आणणे, चारा गोळा करणे, पशुखाद्य देणे, पाणी पाजणे, गोठा स्वच्छ ठेवणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांना रोज करावी लागतात. पावसाळ्यात हिरवा चारा मिळतो. त्यानंतर उसाचा हंगाम सुरू झाल्यावर उसाचे वाढे जनावरांसाठी उपयोगी पडतात. भातशेतीच्या हंगामात मिळणारा पेंढाही साठवून ठेवावा लागतो. वर्षभर जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून शेतकऱ्यांना आधीच नियोजन करावे लागते. दूध उत्पादन हा केवळ जोडधंदा राहिलेला नाही, तर तो पूर्णवेळ कष्ट आणि जबाबदारीचा व्यवसाय झाला आहे..दुसरीकडे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा बाजार दिवसेंदिवस विस्तारत आहे. दूध, दही, ताक, पनीर, लस्सी, लोणी आणि तूप यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. दूध संघांकडून ठरावीक वेळेला वितरकांच्या माध्यमातून दुकानदारांपर्यंत दूध पोहोचवले जाते. एखादा छोटा दुकानदारसुद्धा दररोज चारशे लिटर दूध विकतो. म्हणजे या व्यवसायातील उलाढाल किती मोठी आहे, याची कल्पना येऊ शकते. परंतु वितरण व्यवस्थेतही ग्राहकांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत..काही वितरकांकडून दुधाच्या छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा (एमआरपी) एक रुपया अधिक आकारला जात असल्याचे दिसते. अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे एक रुपया जादा घेतला, तर एका लिटरमागे दोन रुपये ग्राहकांच्या खिशातून विनाकारण जातात. हा प्रकार नियमबाह्य असल्यास दूध संघांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. वितरण व्यवस्थेतील अशा गैरप्रकारांची चौकशी करून ग्राहकांची होणारी लूट थांबवणे आवश्यक आहे. दूध उत्पादक शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो; दूध संघांची उलाढाल कोट्यवधी रुपयांची होते;.Dairy Processing Business: संघर्षातून घेतली दुग्ध प्रक्रिया उद्योगात भरारी.ग्राहक महागडे दूध खरेदी करतो; मग या संपूर्ण व्यवसायात सर्वाधिक फायदा कोणाला मिळतो? अनेक दूध संघांच्या सत्ताकारणात संचालकपदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी संचालकपद म्हणजे प्रतिष्ठा, सत्ता आणि आर्थिक लाभाचे साधन बनल्याचे आरोप होतात. संचालक होण्यासाठी होणारी धडपड, निवडणुकांमधील राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून मिळणारे लाभ यांची चर्चा ग्रामीण भागात सातत्याने होते. काही संचालकांना वाहन, मानधन किंवा अन्य सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे दूध संघांच्या कारभारात पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे..दुग्धव्यवसायातील बोकेदूध संघांच्या संचालकांना उपरोधाने ‘दुधाच्या व्यवसायातील बोके’ म्हटले जाते. कारण लोणी आणि तुपाच्या व्यवसायात मोठी उलाढाल असताना दूध उत्पादकाच्या घरात मात्र दूध आणि तूप मर्यादित प्रमाणातच राहते, ही वस्तुस्थिती आहे. खरा दूध उत्पादक शेतकरी दिवसभर जनावरांच्या सेवेत गुंतलेला असतो. त्याला दूध संघाच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी वेळच मिळत नाही. त्याच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या व्यवसायाच्या सत्तेवर मात्र अनेकदा इतरांचे वर्चस्व निर्माण होते. शेतकरी उत्पादन करतो, ग्राहक पैसे देतो आणि मधल्या व्यवस्थेतील सत्ताधारी आर्थिक लाभ मिळवतात, अशी परिस्थिती निर्माण होणे ही सहकार चळवळीसाठी चिंतेची बाब आहे..दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे, असे म्हणणे आता पुरेसे नाही. तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या व्यवसायात शेतकरी, दूध संस्था, दूध संघ, प्रक्रिया उद्योग, वितरक आणि ग्राहक असे अनेक घटक सहभागी आहेत. मात्र या साखळीतील सर्वांत जास्त शारीरिक श्रम करणारा दूध उत्पादक शेतकरीच आर्थिकदृष्ट्या असुरक्षित राहणार असेल, तर सहकाराचा मूळ उद्देशच हरवला असे म्हणावे लागेल. दुधाचे दर वाढले की ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते. पशुखाद्य महागले की शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. दूध संघांची उलाढाल वाढते;.परंतु उत्पादकाला मिळणारा दर, त्याच्या उत्पादनाचा खर्च आणि प्रत्यक्ष नफा यांचा हिशेब जनतेसमोर येत नाही. म्हणूनच दूध संघांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण आणि संचालकांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील सार्वजनिक करावा. दूध उत्पादकाला मिळणारा दर ठरवताना चारा, पशुखाद्य, औषधे, मजुरी आणि जनावरांच्या देखभालीचा प्रत्यक्ष खर्च विचारात घ्यावा. ग्राहकाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब पारदर्शक असावा..दूध महागले म्हणून दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत झाला, असे समजण्याचे कारण नाही. दूध संघांची उलाढाल वाढली म्हणून सहकार समृद्ध झाला, असेही म्हणता येणार नाही. सहकाराच्या या संपूर्ण अर्थकारणात ज्याच्या घामातून दूध निर्माण होते, त्या शेतकऱ्याच्या घरात आर्थिक समृद्धी पोहोचली पाहिजे.(लेखक दुग्धव्यवसायाचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.