धांडोळा पर्जन्यमापक तयार करणे आणि ते वापरून पाऊस मोजणे इथपासून हा उपक्रम सुरू झाला. पण पाऊस पडणे हे केवळ पाण्यापुरते मर्यादित नसते, तर त्याच्यामुळे संपूर्ण निसर्ग-सृष्टी प्रभावित होते. माणसाचे जगणे, आरोग्य, अर्थव्यवस्था या सर्वच गोष्टी पावसावर अवलंबून असतात. या सर्वांची दखल आणि नोंद घेणारा असा हा व्यापक उपक्रम होता. आकडे आणि परिमाणे या तांत्रिक तपशिलात अडकून न पडता त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांचा नेमका अर्थ समजून घेणे, आकलन करून घेणे हे खरे शिक्षण. तेच या उपक्रमाच्या निमित्ताने प्रकर्षाने पाहायला मिळाले..पाऊस तर नेहमीच पडतो. तो हवामान विभागाकडून मोजला जातो. त्याच्या आकडेवारीचे विश्लेषण केले जाते. विविध घटकांचा उपयोग करून पावसाचे आणि हवामानाचे अंदाजही व्यक्त केले जातात. या अंदाजांचा आपल्या सर्वांसाठी उपयोग असतो. ही अतिशय महत्त्वाची बाब, पण या सर्व प्रक्रियेत आपण असतो का?... या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘नाही’ असे आहे. विज्ञानाचा विकास घडवून आणायचा असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल. त्यात लोकांचा सहभाग असला तरच ते समाजात रुजेल आणि राज्याच्या, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्तही ठरेल..Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार.सध्या समाजात अवैज्ञानिक किंवा तर्कहीन गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, पसरवल्या जात आहेत. जुन्या कोणत्याही गोष्टीला ओढूनताणून विज्ञान जोडण्याची खोड, पेहरावाने पारंपरिक किंवा अगदी आधुनिक दिसत असलेल्या पण प्रत्यक्षात ‘बाबा-बुवा’ असलेल्या मंडळींचा सुळसुळाट, त्यांना मिळणारा प्रतिसाद, त्यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा... अशा वातावरणात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे भवितव्य काय? ही शंका निश्चितच उपस्थित होते..या अशा प्रतिगामी वातावरणात काही सकारात्मक बाबी घडत आहेत. त्यापैकी एक ‘भवताल फाउंडेशन’ च्या प्रयत्नांमुळे पुढे गेली आणि त्याचा प्रत्यय नुकताच आला. त्याविषयी मांडणी करणे गरजेचे आहे. हा उपक्रम म्हणजे, पावसाची शाळा! ‘भवताल’तर्फे गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांसाठी पाऊस मोजण्याचा उपक्रम राबवला जात आहे. त्यात आतापर्यंत राज्यभरातून हजाराहून अधिक लोक सहभागी झाले. त्यांना पर्जन्यमापक तयार करण्याचे आणि पाऊस मोजण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते. त्यातून ते पावसाळ्यात पाऊस मोजतात, पावसाशी संबंधित विविध निरीक्षणे घेतात. या सर्व नोंदी ‘भवताल’च्या वेबसाइटवर प्रदर्शित केल्या जातात. त्यात अनेक शाळा, त्यांचे विद्यार्थी-शिक्षक सुद्धा सहभागी होतात..Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक .आताच्या संपलेल्या पावसाळ्यात खास शाळांसाठी, सातारा, पुणे, पालघर या तीन ठिकाणी असा उपक्रम राबवण्यात आला. त्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यापैकी साताऱ्याचा उपक्रम नुकताच पूर्णत्वाला गेला. मुलांनी केलेले काम, त्यांना शाळा आणि भवताल समन्वयकांची मिळालेली साथ या अतिशय आश्वासक गोष्टी पाहायला मिळाल्या. साताऱ्यापासून काही अंतरावर कण्हेर नावाचे गाव आहे. तिथली न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील २४ विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. ‘भवताल’तर्फे समन्वयक म्हणून वैभव जगताप याने काम पाहिले, तर शाळेतर्फे मुख्याध्यापक जाधव सर आणि शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले..या उपक्रमाच्या शेवटी, याच महिन्यात विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यातून त्यांनी तीन-साडेतीन महिन्यांच्या काळात केलेले उपक्रम समजून घेता आले. एका उपक्रमातून किती व्यापक गोष्टी शिकता येतात, अनुभवता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा उपक्रम. पर्जन्यमापक तयार करणे आणि ते वापरून पाऊस मोजणे इथपासून हा उपक्रम सुरू झाला. पण पाऊस पडणे हे केवळ पाण्यापुरते मर्यादित नसते, तर त्याच्यामुळे संपूर्ण निसर्ग-सृष्टी प्रभावित होते. माणसाचे जगणे, आरोग्य, अर्थव्यवस्था या सर्वच गोष्टी पावसावर अवलंबून असतात. या सर्वांची दखल आणि नोंद घेणारा असा हा व्यापक उपक्रम होता..Marathwada Natural Disaster: मराठवाड्यात निम्म्या क्षेत्रावर नैसर्गिक आपत्ती.त्यात पावसाबरोबरच वाऱ्याची दिशा, वेग, ढगांचे प्रकार आणि हवामानाच्या इतर घटकांची नोंद करण्याचा समावेश होता. पडलेला पाऊस मिलिमीटर, सेंटिमीटर, इंच या परिमाणांमध्ये मोजला जातो. पण म्हणजे नेमका किती पाऊस पडला याचे आकलन होत नाही. त्यासाठी, पावसामुळे घरावर किंवा अंगणात किती पाणी पडले याचे मोजमाप विद्यार्थ्यांनी केले. पावसाळ्याच्या एका दिवसात, आठवड्यात किंवा महिन्यात अमूक इतके लिटर पाणी पडले हे समजल्यावर पावसाचा अर्थ समजायला लागतो, नाही तर ते केवळ आकडेच बनून राहतात..हे घरावर पाणी पडण्यासंदर्भात होते. तसेच, पाण्याच्या साठ्यासंदर्भात, विशेषत: धरणातील पाणीसाठा, त्याचे मोजमाप करण्याची दलघमी, टीएमसी ही परिमाणे यांची उकल विद्यार्थ्यांनी केली. पाणी साठवण्याच्या पलीकडे वाहते पाणी मोजण्याची वेगळी परिमाणे आहेत- क्युसेक, क्युमेक वगैरे. एरवी वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांमध्ये हे शब्द ऐकायला मिळतात. पण बहुतांश वाचकांना, श्रोत्यांना त्याचा अर्थ समजत नाही. शिवाय, तो मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही किंवा इच्छा असली तरीही तसे मार्ग मिळत नाहीत..Water Awareness : सामान्यांच्या जलसाक्षरतेसाठी शासनाचा पुढाकार.पण या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी धरणाला भेट देऊन त्याचे पाणी कसे-कुठून सोडले जाते हे समजून घेतलेच. त्याचबरोबर, त्याचा साठा, पाणी सोडण्याचा वेग यांची परिमाणेसुद्धा चांगल्या प्रकारे समजून घेतली. आकडे आणि परिमाणे या तांत्रिक तपशिलात अडकून न पडता त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांचा नेमका अर्थ समजून घेणे, आकलन करून घेणे हे खरे शिक्षण. तेच या उपक्रमाच्या निमित्ताने प्रकर्षाने पाहायला मिळाले..पावसाळ्यात परिसरातील गवत-वनस्पती, कीटक, पक्षी, प्राणी यांच्या संदर्भात जैवविविधतेच्या नोंदीही विद्यार्थ्यांनी घेतल्या. त्यातून त्या भागात किती आणि कोणत्या प्रकारचे जीव आहेत यांचा आपोआपच अभ्यास करता आला. त्यांची वैशिष्ट्ये, वेगळेपण या बाबींना आढावा घेता आला. एरवी पुस्तकातून ‘थिअरी’ म्हणून या गोष्टी शिकणे आणि प्रत्यक्षात स्वत: त्यांच्या नोंदी घेणे यात मोठा गुणात्मक फरक आहे. ही बाब केवळ जीवांच्या नोंदीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर या सर्व जिवांचे आपल्या परिसंस्थेत काय स्थान आहे, ते निसर्गात काय सेवा पुरवतात, ते आपल्या अवतीभवती असण्याने काय फरक पडतो, हेही समजून घेता आले..Water Awareness : पाणी बचतीने मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल.या उपक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात, मुलांचे लक्ष आहाराकडे वेधण्यात आले. विविध पिढ्यांमध्ये शेती, त्यातील पिके कशी बदलत गेली? त्यानुसार आहार कसा बदलत गेला? पूर्वी जेवणाच्या ताटात किती प्रकारची धान्ये होती? भाज्यांचे किती प्रकार होते? प्रथिनांचे (प्रोटिन) स्रोत काय होते? पोषण देणारे घरात तयार केले जाणारे पदार्थ आणि वरचे म्हणून विकतचे खाल्ले जाणारे पदार्थ या सर्वांची तुलना करता आली..यातून पोषणमूल्ये, त्यासाठी आवश्यक असलेले पदार्थ, प्रत्यक्षात आपण खात असलेले पदार्थ यांची विस्तृत चर्चा घडवून आणता आली. हे सारे प्रात्यक्षिक पद्धतीने होत असल्याने त्याच्याशी जोडले जाणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वाभाविक प्रक्रिया होती. माणूस पावसाच्या अंदाजाचा वेध पिढ्यान् पिढ्या घेत आला आहे. त्यामुळे पंचांग असोत वा इतर कॅलेंडर, पावसाचे दिवस देण्यात येतात. या गोष्टी डोळे झाकून मान्य करणे किंवा शहानिशा न करता टाकून देणे असे करण्याऐवजी त्या ताडून पाहिल्या तर..? विद्यार्थ्यांनी हेच केले आणि त्याच्या मर्यादा स्वत: शोधून मांडल्या..एका उपक्रमाच्या निमित्ताने इतक्या विस्तृत प्रमाणात गोष्टींना स्पर्श करता येणे, त्या अनुभवता येणे आणि त्यातून भरपूर काही शिकता येणे ही अनोखी बाब म्हणावी लागेल. शिवाय हे सर्व पावसासारख्या नैसर्गिक आणि दरवर्षी नित्य नेमाने येणाऱ्या घटकासोबत घडणे ही आणखी महत्त्वाची बाब. यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण होते, त्यांना निसर्गाशी जोडता येते आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरतो. निरीक्षणे नोंदवणे, त्यावरून कच्चा गृहीतक (हायपोथेसिस) मांडणे आणि ते सिद्ध करण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावे देणे ही विज्ञानाची पद्धती. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्याच्या जवळ जाण्याची संधी मिळते..‘शिक्षण म्हणजे घोकंपट्टी’ ही बाब आता इतिहास जमा झाला आहे. शिकण्याची प्रक्रिया किती व्यापक आणि सर्वस्पर्शी आहे, याचे भान आता वाढू लागले आहे. म्हणून ‘पावसाची शाळा’ आणि अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर काही देण्याची क्षमता आहे. म्हणून ते जास्तीत जास्त शाळांनी स्वीकारायला हवेत आणि आपापल्या गरजेनुसार सुधारणा करून / बदल करून राबवायला हवेत... अशा शाळा पुढच्या पिढीला निश्चितच आणखी पुढे नेतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.