Farmer Crisis: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत पावसाअभावी खरीप पिकांची होरपळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिंचनाची सोय नसलेल्या हलक्या, मध्यम जमिनीतील पिके कोमात गेली असून अनेक भागांत हलक्या जमिनीतील पिके करपली आहेत. अत्यल्प पाऊस आणि त्यातही प्रदीर्घ पावसाचे खंड पिकांच्या मुळावर उठले आहेत..यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे १९ लाख ८८ हजार १५८.७७ हेक्टर, म्हणजे सरासरीच्या ९३ टक्के पेरणी झाली. एकीकडे पावसाची तूट भरून न निघणे, दुसरीकडे खंडाने ‘रेनी डेज’ म्हणून गणले जाईल तेवढाच पाऊस पडणे, यामुळे पिकांच्या जीवाची सुरुवातीपासूनच घालमेल सुरू आहे. एल निनोच्या संकटामुळे यापुढेही पाऊस येईल की नाही, याचीही चिंता वाढली असून भूपृष्ठावरील पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळे पुढे कसे, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ऑगस्टमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन, जालन्यातील दोन, तर बीडमध्ये केवळ दोन पावसाचे दिवस गणले गेले आहेत. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी आदी पिके फुलोरा, शेंगा, बोंड व दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांच्या या सर्वच प्रक्रियांवर मोठा परिणाम झाला आहे..Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत.सरासरीच्या तुलनेत पाऊस आणि तालुके५० ते ७५ टक्के : घनसावंगी, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, बीड, माजलगाव, वडवणी, शिरूर कासार.७५ ते १०० टक्के : कन्नड, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पैठण, अंबड, जाफराबाद, जालना, परतूर, बदनापूर, मंठा, धारूर, परळी, पाटोदा.१०० टक्क्यांपेक्षा जास्त : गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, केज..२२ तालुक्यांत तीन वेळा प्रदीर्घ पावसाचे खंडछत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील २८ पैकी २२ तालुक्यांत तीन वेळा पावसाचे प्रदीर्घ खंड पडले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ९, जालन्यातील ३, तर बीडमधील १० तालुक्यांचा समावेश आहे. ६ ते २३ दिवसांपर्यंतचे हे खंड आहेत. याशिवाय पाच तालुक्यांत ४ वेळा, तर एका तालुक्यात पाच वेळा पावसाचे खंड पडले आहेत. त्यामध्ये बीड व प्रत्येकी दोन, तर छत्रपती संभाजीनगरमधील एका तालुक्याचा समावेश आहे. फुलंब्री तालुक्यात आजवर एकूण २८ दिवस पडलेले पावसाचे खंड पाच टप्प्यांत पडले आहेत..आष्टी तालुक्यात सर्वाधिक दिवस पावसाचा खंडबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात २७ ऑगस्टपर्यंत सर्वाधिक तब्बल ५२ दिवस पावसाचा खंड पडला. पहिला खंड २१ दिवसांचा, दुसरा आठ दिवसांचा, तर तिसरा २३ दिवसांचा राहिला आहे. दुसरीकडे १३ तालुक्यांत पावसाच्या खंडाचे एकूण ४० ते ५० दिवस भरले आहेत..पावसाची मोठी तूटतिन्ही जिल्हे मिळून पावसाची वार्षिक सरासरी ६४६.५ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ३६० मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंत पावसाची सरासरी ४१४.२ मिलिमीटर असताना प्रत्यक्ष सरासरी ३६० मिलिमीटर पडलेल्या पावसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३९१.३ मिलिमीटर, जालना ४०५.४ मिलिमीटर, तर बीड जिल्ह्यात सर्वांत कमी २८३.४ मिलिमीटर पडलेल्या सरासरी पावसाचा समावेश आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ टक्के, जालन्यात ३३ टक्के, तर बीड जिल्ह्यात सुमारे ४१ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.दृष्टिक्षेपात...खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडअत्यल्प पाऊस आणि त्यातही पावसाचे खंडसिंचनाची सोय नसलेल्या जमिनीतील पिके कोमातहलक्या जमिनीत अनेक ठिकाणी पिके करपली.सुरुवातीपासून पावसाचा तुटवडा आहे. महिनाभरापासून पाऊस नाही. तूर वगळता बाजरी, कपाशी, सोयाबीन सुकून गेली. आजवर पाऊस येईल अशी आशा होती; पण आता आशा सोडली.- राजेंद्र जाधवर, सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड..अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन करपून गेले. आजदेखील पाऊस पडला तरी सोयाबीनला काहीही लागणार नाही. तत्काळ शासनाने दुष्काळ जाहीर करावा.- विनायक शिनगारे, धारूर, जि. बीड..जमिनी भेगाळल्या, मकाचे कणीस भरणार नाही, तुरीची वाढ खुंटली, मोसंबीला द्यायला पाणी नाही. कपाशी काळी पडली. सोयाबीन करपल्यात जमा.- बप्पासाहेब पाटील, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना..जिल्ह्यातील आष्टी, शिरूर, पाटोदासह गेवराई, धारूर, बीड तालुक्यांत सिंचनाच्या सोयी नसलेल्या जमिनीतील पिके कोमेजली आहेत. स्थिती बिकट आहे. शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्न करतो आहे. कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख हेक्टरपर्यंत असल्याने अजूनही पाऊस न आल्यास या पिकांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.- सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड..पिकांना पावसाची नितांत गरज आहे. शेतकरी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पाऊस येत नसल्याने दिवसेंदिवस संकट वाढते आहे.- गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना..पाऊस येत नसल्याने स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, हे नाकारता येणार नाही. कपाशी आणि सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे. हलक्या जमिनीतील पिके जास्त संकटात आहेत.- दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.