Agricultural Electricity: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत सिंचनासाठी एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा केला जात आहे. त्यातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, नियोजित आठ तासांऐवजी प्रत्यक्षात चार ते सहा तासांपेक्षा अधिक वीजपुरवठा होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..विजेवर सिंचनाची सोय अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची परवड थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची घोषणा केली असली, तरी ती अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. काही भागांत सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे सबस्टेशनला जोडणी देण्यात आली असली, तरी तेथून अपेक्षित दाबाने वीजपुरवठा होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..Farmer Success Story: राजाबापू थोरात : ज्ञानाधिष्ठित शेतीतून समृद्धी.यंदा अत्यल्प पावसामुळे बहुतांश भागातील जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. ज्या भागांत पाणी उपलब्ध आहे, तेथे शेतकरी कसरत करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अडथळा ठरत आहे. सौरऊर्जा प्रकल्पाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे..रात्रीच्या वेळी शेतशिवार अंधारातजालना जिल्ह्यातील ढोकसाळ (ता. मंठा) येथील बंडूनाना देशमुख म्हणाले, ‘‘वीजपुरवठ्याची परिस्थिती काय सांगावी. ५० टक्के शेतकरी शेतात राहण्यासाठी गेले आहेत. रात्रीच्या वेळी शेतातील आखाड्यावर वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे शेतात वास्तव्यास असणाऱ्यांनाही अंधारातच राहावे लागते. सिंचनाची परवड काय सांगावी, वीज टिकतच नाही. मोटार सुरू केली की पुन्हा वीज खंडित होते. आज दिवसभरात २० वेळा वीजपुरवठा खंडित झाला. फॉल्ट झाल्यास महावितरणकडूनही तत्काळ दुरुस्ती होत नाही. दहा गावांसाठी एकच लाइनमन असल्याने त्यांचीही अडचण होते. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनाच धडपड करावी लागते. ही परिस्थिती जीवावर बेतणारी आहे.’’.रोहित्र २४ तासांत बदलून मिळेल का?सध्या पावसात मोठा खंड पडल्यामुळे पिकांना संरक्षित पाणी देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. दिवसाचा वीजपुरवठा उपलब्ध असला, तरी ओव्हरलोडमुळे रोहित्र जळण्याचे किंवा ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा रोहित्र खराब झाल्यास ते दुरुस्त होऊन किंवा बदलून मिळण्यासाठी किमान आठ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. अशा नाजूक टप्प्यावर १५ दिवस पाणी मिळाले नाही, तर उभी पिके डोळ्यांदेखत वाळू लागतात. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्र २४ तासांत बदलून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी ताडपिंपळगाव (ता. कन्नड) येथील युवा शेतकरी सागर सोनवणे यांनी केली..विजेचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या सोयीचे नाहीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी गराडा (ता. कन्नड) येथील शेतकरी पदमसिंह राजपूत म्हणाले, ‘‘सिंचनासाठी वीजपुरवठ्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या सोयीचे नाही. त्याच्या नियोजनात शेतकऱ्यांचा विचारच केला जात नाही. एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री वीजपुरवठा केला जातो. त्यात रात्रीचा वीजपुरवठाही ठरलेल्या वेळेत होत नाही. त्यामुळे सिंचन आणि खत व्यवस्थापन कोलमडते. दिवसा वीजपुरवठा होणाऱ्या भागातही तो वारंवार खंडित होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.’’.Farmers Protest: संतप्त शेतकऱ्यांचा मध्यरात्री वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा .विजेवर सिंचन अवलंबून असलेल्या आमच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री, तेही चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. त्यानुसार शेतकऱ्यांना सतत पळापळ करावी लागते.- बाळासाहेब बिडवे, सातोना, ता. परतूर, जि. जालना.जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून मिळणारे पाणी अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची गरज भागवते. मात्र, कालवा परिसरातील वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने, सुरळीत आणि किमान दहा तास मिळाला तरच शेतकरी प्रभावीपणे सिंचन करू शकतील. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण थांबायला हवे.- सुनील कोरडे, भायगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना.चार-पाच तास वीजपुरवठा होतो, तोही खंडित स्वरूपात. सबस्टेशन सौरऊर्जेशी जोडल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होतो. आधीच दुष्काळामुळे सर्व काही वाळून गेले आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पाणी आहे, तेही वीजेअभावी सिंचन करू शकत नाहीत.- संदीप करपे, जवळबन, ता. अंबाजोगाई, जि. बीड.फॉल्ट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याला मर्यादा राहिलेली नाही. मोठ्या मुश्किलीने चार-पाच तास वीजपुरवठा होत असेल. रात्री सहा तास आणि दिवसा आठ तास असे वेळापत्रक सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. काही रोहित्र बंद केले तरच काही भागांत वीजपुरवठा होतो; अन्यथा पुरवठा सुरळीत होत नाही.- बाबासाहेब कानडे, चांगतपुरी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.