रवींद्र पालकर, डॉ. साताप्पा खरबडे, ऋषिकेश बसुगडेMango Fruit and Seed Damage by Weevil: आंबा पिकामध्ये उत्पादन व गुणवत्तेला अनेक किडींचा धोका असतो. त्यापैकी आंबा कोयीतील भुंगा ही नुकसानकारक व निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाची विलगीकरण (Quarantine) कीड मानली जाते. अनेक देशांमध्ये या किडीच्या प्रादुर्भावामुळे आंबा निर्यातीवर निर्बंध लागू शकतात. या किडीची अळी फळाच्या कोयीमध्ये राहून बीजपत्रांवर उपजीविका करत असल्यामुळे बाहेरून सहजासहजी प्रादुर्भाव दिसून येत नाही. परिणामी, फळांची गुणवत्ता, बियाण्याची उगवणक्षमता आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. आजच्या लेखामध्ये या किडीची ओळख व नुकसानीचे स्वरूप छायाचित्रांद्वारे समजून घेऊ. .सामान्य नाव : आंबा कोयीतील भुंगा (Mango Stone Weevil)शास्त्रीय नाव : स्टर्नोकेटस मॅन्जिफेरी (Sternochetus mangiferae)गण (Order) : कोलिऑप्टेरा (Coleoptera)कुल (Family) : कर्क्युलिऑनिडी (Curculionidae)किडीची नुकसानकारक अवस्था : अळी..किडीची ओळखअंडी अवस्था : अंडी फिकट पांढऱ्या (क्रीम) रंगाची, लांबट अंडाकृती व अतिशय लहान असतात. त्यांची लांबी ०.७२ ते ०.८७ मि.मी. तर रुंदी ०.२४ ते ०.३४ मि.मी. असते.अळी अवस्था : नव्याने बाहेर पडलेली अळी पांढऱ्या रंगाची, पाय नसलेली व बारीक असते. पूर्ण वाढ झालेली अळी किंचित वाकलेली, इंग्रजी ‘C’ आकाराची दिसते. तिची लांबी १ ते १७ मि.मी. पर्यंत असते. अळीचे डोके काळसर असते.कोषावस्था : नव्याने तयार झालेला कोष पांढरट रंगाचा असतो. प्रौढ भुंगा बाहेर येण्यापूर्वी त्याचा रंग फिकट लालसर होतो. पोटाच्या शेवटच्या टोकाला काट्यासारखी उपांगे (urogomphi) आढळतात..Mango Stem Borer Pest: आंब्यावरील खोडकीड.प्रौढ अवस्था (भुंगा) : प्रौढ भुंगा लहान, मजबूत व काळ्या रंगाचा असून, त्याची लांबी ७.५ ते ९.५ मि.मी. असते. शरीरावर काळसर, करड्या किंवा पिवळसर रंगाचे सूक्ष्म खवले असतात. पंखांच्या आवरणावर उठावदार रेषा दिसतात. पाय जाड व मजबूत असून मांड्यांवर दातासारखा ठळक उंचवटा असतो. मादीच्या पोटाच्या शेवटच्या टोकावर (pygidium) उंचवट्यासारखी रेषा दिसते, तर नरामध्ये ती नसते. धोका जाणवल्यास हा भुंगा मृत असल्याचे नाटक करून निश्चल पडून राहतो.....असे पूर्ण होते जीवनचक्रमादी भुंगा अर्धविकसित किंवा पिकू लागलेल्या आंब्याच्या फळांच्या सालीवर अथवा सालीखाली एकेक अंडे घालते. एक मादी दररोज सुमारे १५ अंडी घालून आयुष्यात सरासरी ३०० अंडी घालते. अंडी ६ ते ७ दिवसांत उबतात. उबलेली अळी फळाच्या गरातून कोयीमध्ये प्रवेश करतात. तिथे अळी पाच अवस्थांमधून आपला विकास २३ ते ३८ दिवसांत पूर्ण करते. त्यानंतर ती कोयीमध्येच ६ ते ९ दिवसांची कोषावस्था पूर्ण करते. पूर्ण वाढ झालेला प्रौढ भुंगा जून-जुलैमध्ये फळातून बाहेर पडतो. पुढील फळधारणेच्या हंगामापर्यंत तो आंब्याच्या झाडाच्या खोडावरील भेगा-फटी, सुकलेली साल किंवा दगडाखाली सुप्तावस्थेत लपून राहतो. मादी भुंग्याचे सरासरी आयुष्य ३०२ दिवस, तर नराचे २६७ दिवस असते. या किडीची वर्षातून केवळ एकच पिढी पूर्ण होते..Mango Pest Infestation: आंब्यावर आढळतोय तुडतुड्यांचा प्रादुर्भाव.मादी भुंगा मार्च–एप्रिलमध्ये सुपारीआकाराच्या कोवळ्या आंबा फळांच्या सालीवर होडीसारख्या चिरा करते. त्यात एकेक अंडे घालून त्यावर चिकट स्रावाचे आवरण देते. फळ मोठे झाल्यानंतरही ही खूण दिसून येते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फळाच्या गरातून कोयीमध्ये प्रवेश करते. सुरुवातीला ती कोयीच्या आवरणावर उपजीविका करते. त्यानंतर बीजपत्रे (Cotyledon) पोखरून खाते. अळीचा संपूर्ण विकास कोयीच्या आत होत असल्याने बाहेरून प्रादुर्भावाची ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. बाधित फळ कापल्यास कोयीलगतचा गर अळीची विष्ठा व स्रावामुळे काळसर किंवा तपकिरी झालेला दिसतो. पूर्ण वाढ झालेला भुंगा कोयी व गर पोखरून फळातून बाहेर पडतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कोयींची उगवणक्षमता घटते, परिणामी रोपवाटिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव तीव्र असल्यास फळांची अकाली गळ होते. प्रौढ भुंगे पाने, कोवळे कोंब आणि फुलांच्या कळ्यांवर उपजीविका करतात..नुकसानीची प्रक्रियामादी भुंगा मार्च–एप्रिलमध्ये सुपारीआकाराच्या कोवळ्या आंबा फळांच्या सालीवर होडीसारख्या चिरा करते. त्यात एकेक अंडे घालून त्यावर चिकट स्रावाचे आवरण देते. फळ मोठे झाल्यानंतरही ही खूण दिसून येते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फळाच्या गरातून कोयीमध्ये प्रवेश करते. सुरुवातीला ती कोयीच्या आवरणावर उपजीविका करते. त्यानंतर बीजपत्रे (Cotyledon) पोखरून खाते. अळीचा संपूर्ण विकास कोयीच्या आत होत असल्याने बाहेरून प्रादुर्भावाची ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. बाधित फळ कापल्यास कोयीलगतचा गर अळीची विष्ठा व स्रावामुळे काळसर किंवा तपकिरी झालेला दिसतो. पूर्ण वाढ झालेला भुंगा कोयी व गर पोखरून फळातून बाहेर पडतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कोयींची उगवणक्षमता घटते, परिणामी रोपवाटिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव तीव्र असल्यास फळांची अकाली गळ होते. प्रौढ भुंगे पाने, कोवळे कोंब आणि फुलांच्या कळ्यांवर उपजीविका करतात..व्यवस्थापननवीन लागवड करताना कमी प्रादुर्भाव होणाऱ्या किंवा प्रतिकारक्षम जातींची निवड करावी.बागेची नियमित स्वच्छता ठेवल्यास सुप्तावस्थेतील प्रौढ भुंग्यांना आश्रय मिळत नाही आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू वाढतो. नियमित स्वच्छतेमध्ये पुढील कामे महत्त्वाची ठरतात.झाडाखाली पडलेली कीडग्रस्त फळे व कोयी नियमित गोळा करून नष्ट करावीत. अशी फळे केवळ बागेबाहेर टाकू नयेत; ती किमान ६० सें.मी. (२ फूट) खोल खड्ड्यात पुरावीत किंवा बारीक करून नष्ट करावीत..प्रक्रिया उद्योगातून निर्माण होणाऱ्या कोयींचीही योग्य विल्हेवाट लावावी.झाडाभोवतीची जमीन अधूनमधून हलवावी. त्यामुळे सुप्तावस्थेतील भुंगे उघडे पडून नष्ट होण्यास मदत होते.फेब्रुवारी महिन्यात प्रौढ भुंग्यांचा फांद्यांकडे व फळांकडे होणारी चढण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी झाडाच्या खोडावर चिकट पट्टे (स्टिकी बँड) बांधावेत..मित्रकीटकलाल विणकर मुंगी (शा. नाव : ओइकोफिला स्मॅरॅग्डिना) हा या किडीचा प्रभावी नैसर्गिक शत्रू आहे. ही मुंगी प्रौढ भुंग्यांवर हल्ला करते. त्यामुळे अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन किडीची संख्या कमी होण्यास मदत होते.काही प्रसंगी ॲस्परजिलस जातीची बुरशी, रायझोग्लायफस वंशातील माइट्स (सूक्ष्म कोळी) सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगे, अळ्या व कोषांवर परजीवी म्हणून आढळून आले आहे. हे घटक त्यांची संख्या कमी करण्यास मदत करतात.रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच.डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.