राजेश उरकुडेSilk Producers: ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सलग एक नव्हे, तर दोन नवीन रेशीम कोष बाजारपेठा उघडण्यात आल्या. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा....महाराष्ट्रात रेशीम शेतीचा विस्तार वेगाने होत असला, तरी रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबलेली नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रात एकही हक्काची रेशीम कोष बाजारपेठ उपलब्ध नव्हती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपला पिकविलेला माल विकण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत कर्नाटकातील रामनगर, सिडलगट्टा किंवा आंध्रातील हिंदूपूरच्या बाजारपेठा गाठाव्या लागत होत्या. लांबच्या प्रवासाचा खर्च आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान हे तर नित्याचेच झाले होते. या प्रवासामुळे शेतकऱ्यांना प्रति किलो मागे ५० ते १०० रुपयांचा थेट फटका सहन करावा लागत होता. त्याचप्रमाणे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना भाषेच्या समस्येलाही सामोरे जावे लागे. त्यात अडवणूक व लुबाडणूक ठरलेलीच..Silk Cocoon Market Buildings: जालना रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त!.अनेकदा परप्रांतीय व्यापारी थेट शेतावर येऊन माल उचलतात, परंतु त्यातही बाजाराच्या तुलनेत किलोमागे १०० ते १५० रुपयांचा फरक पडत होता. राज्यात योग्य मूल्यसाखळी उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रातील बहुतांश कच्चा माल बंगळूर, रामनगर व पश्चिम बंगालमधील रिलिंग युनिट्सकडे वळवला जायचा व अजूनही जातो..गेल्या सात ते आठ वर्षांत महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर काही प्रमाणात रिलिंग युनिट्स उभे राहिले आहेत. त्यातून कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन रेशीम धागा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हा सकारात्मक बदल होऊनही शेतकऱ्यांच्या हाती योग्य मोबदला पडत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कर्नाटकातील रामनगर आणि सिडलगट्टा बाजारांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये आजही रेशीम कोषाला प्रति किलो १०० ते १५० रुपये कमी भाव मिळतो..Sericulture Success Story: पाणलोटामुळे रेशीम शेतीला चालना.या परिस्थितीवर मात करण्यासाठी २०१८ मध्ये जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राज्यातील पहिले रेशीम कोष मार्केट सुरू करण्यात आले. सुरुवातीची पाच वर्षे या बाजारात मालाची आवक उत्तम राहिली, परंतु पुढे व्यापाऱ्यांनी संगनमत करून भाव पाडण्याचे प्रकार सुरू केल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. जालन्यातील आवक मंदावली. याच दरम्यान विदर्भातील शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून बडनेरा येथे मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पुरेशा आवक अभावी ते मार्केट कधी चालूच होऊ शकले नाही..जालन्याची आवक घटत असतानाच बीड आणि बारामती येथे नवीन मार्केट सुरू झाले. महाराष्ट्रातील एकूण रेशीम कोष उत्पादकांपैकी तब्बल ३० टक्के शेतकरी एकट्या बीड जिल्ह्यात असल्याने, बीड बाजारात मोठी आवक सुरू झाली आणि आजही ते मार्केट जोमाने चालत आहे. मात्र या बाजारात मालाच्या गुणवत्तेला दुय्यम स्थान दिले जाते. शास्त्रोक्त प्रतवारी न करता केवळ ठोकळ बोली लावली जाते आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागतो. विक्री झाल्यानंतरही ८ ते १५ दिवस पेमेंट मिळत नाही, ज्यामुळे संतप्त शेतकरी अनेकदा लिलाव बंद पाडतात. दुसरीकडे, बारामती बाजारात आवक मर्यादित राहिल्याने बहुतांश शेतकरी थेट रिलिंग युनिट्सना माल विकणे पसंत करतात. परंतु बीड मार्केटला आता जालना आणि सोलापूर बाजारांची टक्कर घ्यावी लागणार हे निश्चित; त्यामुळे जो बाजार पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या सुविधांचा विचार करेल, त्या बाजाराची प्रगती होईल..सोलापूर येथे रेशीम कोष बाजाराची इमारत २०२४ मध्येच बांधून तयार होती, मात्र या बाजाराचे लोकार्पण व्हायला १ ऑगस्ट २०२६ उजाडावे लागले. श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने हे मार्केट सुरू केले आहे. थोड्याफार फरकाने जालन्याचेही चित्र हेच होते; नवीन इमारत पूर्ण होऊनही वर्षभर धूळ खात पडली होती. अखेर रेशीम विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सर्व सोईसुविधांची पूर्तता करून काल म्हणजेच १४ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बाजाराचे मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले..आजघडीला महाराष्ट्रात पाच बाजारपेठा कार्यरत असल्या, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक बाजारात मालाची शास्त्रोक्त प्रतवारी व अचूक मूल्यमापन यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांचे संगनमत मोडून काढण्यासाठी रामनगरच्या धर्तीवर पारदर्शक ई-लिलाव पद्धत अमलात आणणे गरजेचे आहे. माल विकल्यानंतर २४ ते ४८ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची सक्ती करणे आणि राज्यात अधिकाधिक प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन स्थानिक मागणी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तरच महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळू शकेल.- राजेश उरकुडे,९९३०३०५७५४(लेखक महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे संचालक असून रेशीम उद्योगाचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.