Monsoon Heavy Rainfall: राज्यात मॉन्सूनने जोरदार आगमन केल्यामुळे बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तब्बल २५५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून, धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात २० महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३२४.२५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. .या पावसामुळे भात लागवडीला वेग आला असून, खरीप पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. काही धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..कोकणात पालघर-ठाणे पट्ट्यात विक्रमी पाऊसकोकण विभागातील पालघर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला. देहरी आणि मांग्रूण येथे प्रत्येकी ३१७ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. त्यापाठोपाठ बोईसर येथे ३०८ मिलिमीटर, पडघा येथे ३०२ मिलिमीटर आणि पालघर येथे २७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Monsoon Update: पश्चिम घाटात दाणादाण; राज्यात २७४ मंडलांत अतिवृष्टी; आजही बरसणार.ठाणे, पालघर आणि रायगड परिसरांतील बहुतांश महसूल मंडलांत १५० ते २५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. भातसा, अपर वैतरणा, बारवी आणि सूर्या धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत असून, मुंबईसह परिसराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही स्थिती दिलासादायक मानली जात आहे..मराठवाड्यात पावसाचा जोर कमीमराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी असला, तरी अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाला वेग आला आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात सुमारे ०.२४८४ टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली आहे. जायकवाडी धरणातील एकूण जलसाठा ४६.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. येलदरी, पैनगंगा (ईसापूर), तेरणा, दुधना आणि विष्णुपुरी धरणांतील साठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग पिकांच्या पेरण्या बहुतांश भागांत पूर्ण झाल्या असून उगवण चांगली आहे. पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी तणनियंत्रण आणि आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात करत आहेत..विदर्भात खरीप पिकांना दिलासाविदर्भात अतिवृष्टीची तीव्रता कमी असली, तरी पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. तोतलाडोह धरण क्षेत्रात हंगामात आतापर्यंत ३९८ मिलिमीटर, तर गोसीखुर्द धरण क्षेत्रात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोसीखुर्द धरणातून २६,२५१ क्युसेक्स विसर्ग सुरू असून, धरणातील जलसाठा वाढत आहे. गोसीखुर्द, तोतलाडोह, ऊर्ध्व वर्धा आणि अरुणावती धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि मका पिकांच्या पेरण्या बहुतांश भागांत पूर्ण झाल्या असून, वेळेवर झालेल्या पावसामुळे पिकांच्या उगवणीस चांगला आधार मिळाला आहे. शेतकरी खत व्यवस्थापन आणि पुढील आंतरमशागतीच्या कामात व्यग्र आहेत..Maharashtra Rainfall: राज्यातील ३१० मंडलांत अतिवृष्टी .धरणांमध्ये वाढती आवकराज्यातील प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. भंडारदरा, मुळा, कोयना, उजनी, जायकवाडी, भातसा, सूर्या, पवना, मुळशी, चासकमान आणि इतर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. काही धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..मुळशी धरणात ४५० मिमी पाऊसपुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड, हवेली आणि वेल्हा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भंडारदरा, निळवंडे, मुळा, कोयना, पानशेत, चासकमान, पवना, मुळशी, वीर आणि उजनीसह अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. मुळशी धरण क्षेत्रात तब्बल ४५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणात ८५१ दलघफूट, मुळा धरणात १,४६० दलघफूट, तर कोयना धरणात ६.३१ टीएमसी पाण्याची आवक झाली. .काही धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सलग पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्या जवळपास पूर्णत्वाकडे गेल्या असून, सोयाबीन, मका, बाजरी, भात आणि भाजीपाला पिकांना मोठा फायदा झाला आहे. डोंगराळ भागात भात रोपलावणी वेगाने सुरू असून, शेतकरी शेतातील कामांमध्ये व्यस्त आहेत..सर्वाधिक पावसाची नोंद (मिमीमध्ये)त्र्यंबकेश्वर ३२४.२५आंबेगाव ३१७महाबळेश्वर ३०३वेलुंजे २७५लोणावळा २०२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.