Kharif Season: राज्यात उशिराने सुरू झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या आणि कापूस लागवड पूर्ण केली. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांच्या वाढीच्या चिंतेने डोके वर काढले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा आदी भागांतील सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांना तातडीने पावसाची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः ज्या भागात कापूस आणि सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे, त्याच भागात पावसाची कमतरता जाणवत आहे. .यंदा राज्यात मॉन्सूनला जवळपास महिनाभर उशीर झाला. जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह कोकण, पुणे, सातारा व घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस झाला; मात्र उर्वरित राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला नाही. उपलब्ध अल्प पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या आणि कापूस लागवड केली. त्यानंतर गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पिके तणावाखाली आली आहेत..Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ.राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर असून, आतापर्यंत १ कोटी ४ लाख ७१ हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये कापसाची लागवड सर्वाधिक ८१ टक्के, तर मका १०५ टक्के, तूर ७७ टक्के, सोयाबीन सुमारे ८७ टक्के, भुईमूग ५५ टक्के, मुग ३८ टक्के, उडीद ३८ टक्के, बाजरी ३९ टक्के, भात २२ टक्के आणि खरीप ज्वारी २१ टक्के या प्रमाणात पेरणी झाली आहे..सोयाबीनची लागवड जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, धुळे आदी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तर कापसाचे क्षेत्र धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अधिक आहे. अपवाद वगळता याच भागांमध्ये पावसाची तूटही अधिक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Crop Management: पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते पिकांना पाणी देत आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांपर्यंतच आहे. उर्वरित क्षेत्र पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने लवकर पाऊस न झाल्यास पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे..उत्पादनावर परिणाम शक्यमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, बाजरी आणि भात या प्रमुख खरीप पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत पूर्ण होणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे या पिकांचा पेरणी कालावधी आता संपला आहे. यानंतर उशिरा पेरणी किंवा लागवड केल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या भागांत अद्याप पेरणी होऊ शकलेली नाही, तेथील काही शेतकरी आता रब्बी पिके किंवा कांदा लागवडीकडे वळण्याची शक्यता आहे. यंदा मुग आणि उडिदाच्या क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे..काही ठिकाणी आठवड्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, चालू महिन्यात पुन्हा पावसाचा अंदाज असून उर्वरित पेरण्या महिनाअखेरीस पूर्ण होतील.- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग, कृषी आयुक्तालय.खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना पावसाचा खंड पडल्याने पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने पिकांना संरक्षित पाणी द्या. मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हलकी कोळपणी किंवा आच्छादन करा. बाष्पीभवन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोटॅशयुक्त खतांचा वापर करावा.- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.