Pune News : राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. पावसाने सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी धुव्वाधार पाऊस पडला. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात आतापर्यंतच्या कालावधीतील सर्वाधिक ५४८ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी नद्या, ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पीक नुकसानीचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत..राज्यात मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, लातूर, नाशिक, सोलापूर, पुणे, रायगड आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. जायकवाडी, उजनी, कोयना, गंगापूर, बिंदुसरा, येलदरी, गोसेखुर्द, बेंबळा, धामणी, निम्नदुधना, खडकवासला आणि भातसा या प्रमुख अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून नद्यांना पूर आला आहे. गोदावरी आणि सीना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. .सोयाबीन, कपाशी, झेंडू फूल, मूग, ऊस, मका, बाजरी आणि कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘‘आपत्ती काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवरती राहून काम करण्याचे’’ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तसेच, धरणाचे विसर्ग वाढविल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. वैजापूरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या २७ लोकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले..कोकणात धुव्वाधारकोकणात दीर्घ विश्रांतीनंतर धुव्वाधार पाऊस पडला. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांत पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून दहा मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली. तर कोकणात एकूण ७३ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे कोकणात नद्या पुन्हा दुथडी भरून वाहत असून या भागातील सर्वच धरणे तुडूंब भरली आहे. मुसळधार पावसाने रस्ते ओसंडून वाहत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढला होता. भिरा घाटमाथ्यावर १४५ मिलिमीटर पाऊस पडला. तर खांड ११७, डुंगरवाडी १०१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे..Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा.नगर, नाशिकमध्ये अतिवृष्टीचा फटका :मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यांत पावसाने कहर केला. नाशिकमधील ९८ मंडलांत अतिवृष्टी झाली. पेठ व येवला तालुक्यांत सर्वाधिक अतिवृष्टी झाली असून गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला आहे. अनेक ठिकाणी पूर, संपर्क तुटला असून बंधारे ओव्हरफ्लो झाले असून रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच सोमवारी (ता. २८) सुरू होता. बहुतांश भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना, खैरी, मुळा, प्रवरा, हंगा, कुकडी, ढोरा, नंदीनीसह जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने पुरामुळे नदीकाठचे लोक दहशतीखाली आहेत. .शेवगाव- गेवराई, नेवासा-शेवगाव, अहिल्यानगर- पाथर्डी, नेवासा फाटा-शेवगाव, शेवगाव-पैठण, शेवगाव-तिसगाव यासह बऱ्याच मार्गावरील वाहतूक बंद होती. चोवीस तासांत १२८ महसूल मंडलांपैकी तब्बल ८३ मंडलांत अतिवृष्टी झाली. राहाता, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर मंडलात सर्वाधिक १९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सीना नदीमध्ये कमी केलेला पाण्याचा विसर्ग रविवारी पुन्हा सोडण्यात येत असल्याने तिसऱ्यांदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. पुणे, सातारा, सांगली भागातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पिकांचे नुकसानीत वाढ होत आहे..मराठवाड्यात दाणादाणमराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चापानेर परिसरात ऊस पिके आडवी झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे झालेल्या जोरदार पावसामुळे येथील पाझर तलावाला भगदाड पडले आहे. नगर, नाशिक भागातून जायकवाडीत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाचे सर्वचे सर्व २७ दरवाजे उघडले. .गोदावरी नदी पात्रात २,२६,३६८ क्युसेसने प्रचंड विसर्ग, नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. काही गावांचा संपर्क तुटला आहे. ३ लाख क्युसेसपर्यंत विसर्ग जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यातील ११ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून ७७००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे येलदरी धरणातून विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. येलदरी धरणाचे दरवाजे उघडले असल्यामुळे जिंतूर-सेनगाव हा रस्ता बंद करण्यात आला आहे..Rainfall Update : वाशीम, अकोल्यात पावसाचा पुन्हा जोर.विदर्भात पावसाचा जोर :विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. तर ११ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला असून एकूण २६ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. अनेक मंडलांत अतिवृष्टी झाल्याने ओढे, नाले भरून वाहत असून पिकांचे नुकसान वाढत आहे. धरणात वेगाने पाण्याची आवक वाढत असून धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे..रत्नागिरीत नद्या दुथडी भरून वाहताहेतरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असला तरीही थांबूनथांबून आहे. त्यामुळे पूर परिस्थिती नाही. मात्र जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बावनदी, काजळी, अर्जुना या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ५९.२४ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड ८८.७५, खेड ९२, दापोली ९०, चिपळूण ५१.६७ गुहागर ५९.६०, संगमेश्वर ५६.३३, रत्नागिरी ४५.११, लांजा २९.२०, राजापूर २० मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील भातक्षेत्र कापणीच्या प्रतिक्षेत आहे.रविवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेली मंडले : (स्त्रोत ः कृषी विभाग)कोकण : ठाणे १२६, मुरबाड १३१, धसई ११४, देहरी, सरळगाव, शिवाळे १२१, नयाहडी १२७, किन्हवळी ११४, साईवन, तळवाडा १००.मध्य महाराष्ट्र : जातेगाव ११२, नायुडुंगरी १३१, बाऱ्हे, मानखेड, नानशी, पेठ, जोगमोडी, कोहोर, करंजाळी १४४, नायगाव १०३, येवला, आंदरसूल १५५, सावरगाव ११९, कुडशी, उमरपत्ता १०९, बहाळ १०३, हातळे १३७, तळेगाव ११२, खडकी १०५, सावेडी ११५, नागापूर १२२, जेऊर १००, चिंचोडी १३५, कोंभळी १०१, खर्डा, नायगाव, सकट ११४, शेवगाव १२१, भातकुडगाव १०९, ढोरजळगाव १०९, करंजी ११७, मिरी १४७, तिसगाव १२५, नेवासा खु १०३, सलाबतपूर १९९, कुकाणा १०९, सोनई, ब्राम्हणी १०६, प्रवरासंगम १९९, देडगाव १०९, सात्रळ, ताहराबाद १०२, वांबोरी १०५, बारागावनांदूर ११२, कोपरगाव १२७, दहीगाव १४७, कोकणठान १२७, श्रीरामपूर १३२, बेलापूर ११५, राहाता १६७, शिर्डी १४७, लोणी १६६, बाभळेश्वर १२९, पुणतांबा १२६, अस्तगाव १६७, राजूर, आपटाळे १२०, आंबेगाव १२१.मराठवाडा : कांचनवाडी १४२, चौवका १००, गंगापूर १४८, मांजरी १५१, भेंडाळा १५६, तुर्काबाद १६५, वाळउंज १२६, हरसूल १९६, डोनगाव १९३, सिंद्दनाथ १५०, आसेगाव ११८, गजगाव १५०, जामगाव १४८, वैजापूर १७४, खंडाळा १७२, शिवूर १८९, बोरसर १८९, लोणी १७२, गरज १५१, लासूरगाव १२७, महालगाव, नागमंठन, लाडगाव १७३, दहीगाव १६४, जानेफळ १७५, कन्नड, चापनेर १३५, देवगाव १६६, चिखलठाणा ११७, पिशोर १२६, नाचनवेल १२५, चिंचोली १२०, करंजखेड १३९, वेरूळ १८०, सुलतानपूर ११०, बाजर १०५, सिल्लोड १५९, निल्लोड १२२, बनोती १०३, फुलंब्री १२६, आळंद ११३, पीरबावडा १०९, वडोदाबाजार १२१, बाबारान १३१, भोकरदन १६५, सिपोरा १०१, आनवा १०६, पिंपळगाव ११५, हसनाबाद, दाभाडी, मंथा, हनुमंत, वारंगा १०३, महोरा १०१, डवळवाडगा १२९, धानोरा ११३, पिंपळा १०२, दादेगाव ११३, धाराशिव १३१, पिंपरखेड १३८, पेठशिवनी १२६.विदर्भ : आखडा १०३, डोंगरकडा १०८, वसमत, हयातनगर १२७, किन्हीराजा १०१, कळगाव १२४, उमरखेड ११८, निगनूर १३८, कुपटी ११८, कळी द ११२, फुलसावंगी १३८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.