Farmers Waiting for Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंमलबजावणीतील संथगती, पारदर्शकता आणि स्पष्टता नसल्याने अद्याप लाभ न मिळालेले शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. बँका, सोसायट्यांनी अपलोड केलेली यादी, पात्र -अपात्र शेतकरी, केवायसी झालेले-न झालेले शेतकरी, फार्मर आयडी आदींसंदर्भात घोळात घोळ निर्माण होत असल्याने अंमलबजावणी केवळ २७ टक्केच झाल्याची माहिती समोर आली आहे..शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ची घोषणा २ जून २०२६ रोजी झाली. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र आज पाच महिन्यांनंतर चार याद्या जाहीर होऊनही अंमलबजावणीतील गोंधळ कायम असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. अद्यापपर्यंत जाहीर सुमारे २५लाख पात्र शेतकऱ्यांतही १५ लाख जणांनाच कर्जमुक्ती मिळाल्याची माहिती असून, अद्यापही ४१ लाख जण प्रतिक्षेत असल्याने शेतकरी तणावस्थिती कायम आहे..पात्रताधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात इतकी दिरंगाई का होत आहे, याचे उत्तर जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडे नाही. राज्यात एका बाजूला दुष्काळ, नापिकी असून चारा आणि पाणी टंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यात पुन्हा कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे गुऱ्हाळ म्हणजे आमच्या दुःखावर डागण्या देण्याचा प्रकार असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत..Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत जेहूरच्या एकाही शेतकऱ्याचे नाव नाही; शेतकऱ्यांमध्ये नाराजी.जिल्हा निबंधक कार्यालये गप्प१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीचे पीककर्ज माफ झाले आहे. सरकारने याद्यांच्या घोषणा करताच यासंदर्भातील कोणताही संपर्क बँकांकडून होत नसल्याचे ‘नाव आले की नाही,’ या चौकशीसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे..अनेक गावांमध्ये कर्जमाफीपासून वंचित असलेले शेतकरी केवळ याद्या प्रसिद्ध होण्याची वाट बघत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीच्या तिसरी, चौथी यादी ग्रामपंचायती तसेच तलाठी कार्यालयांमध्ये प्रसिद्ध झाली. परंतु त्यात घोळ आहेत. अमरावतीच्या सिंदी बुद्रक गावातील शेतकऱ्यांची नावे चक्क दुसऱ्याच गावाच्या यादीत असल्याने अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. ई-केवायसीच्या आघाडीवर देखील बोंबाबोंब आहे. बहुतेक जिल्ह्यात ई-केवायसी पूर्णतः झालेली नाही. तर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘डेटा नॉट फाउंड’ अशी ‘एरर’ येत असल्याने शेतकरी वैतागले आहेत..कर्जमुक्ती योजनेच्या पात्र-अपात्र लाभार्थ्यांबाबत राज्यभर असलेली संभ्रमाची स्थिती चौथ्या यादीनंतर देखील कायम आहे. कर्जमुक्ती योजनेस नाशिक जिल्ह्यात ४४ हजार शेतकरी पात्र ठरत असल्याचे सांगितले गेले. मात्र आधीच्या प्रसिद्ध झालेल्या तीन याद्यांमध्ये पात्रताधारक शेतकऱ्यांची पूर्ण नावे आलेली नाहीत. विशेष म्हणजे चौथ्या यादीत देखील हाच घोळ आहे. त्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यंत्रणा समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..दुसऱ्या बाजूला एकरकमी समझोता (ओटीएस) प्रक्रिया रोखली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज रकमा दोन लाखांच्या पुढील आहेत. शेतकऱ्यांची नावे अद्याप प्रतीक्षेत का आहेत, याचे धड उत्तर ना सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आहे ना बॅंकांकडे आहे. काही गावांत मोजक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. सोसायट्यांकडे सभासद शेतकरी हेलपाटे मारत आहेत..प्रोत्साहनपर अनुदान कधी?नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे २४ लाख शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान केव्हा मिळणार? याबाबत ना सरकारकडून काही माहिती येत आहे, ना सहकार विभागाकडून यामुळे संभ्रम वाढला आहे..रब्बी कर्ज का अडकवले?धक्कादायक बाब म्हणजे, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बॅंकांकडून नवे कर्ज देण्यास आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हेतूच फोल ठरतो आहे. वागदचे (जि. यवतमाळ) शेतकरी मनीष जाधव यांनी सांगितले, की मला एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज माफ झाले. माझे नाव कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत आहे. परंतु मला नवे कर्ज दिलेले नाही. कर्ज का दिले जात नाही, याविषयी बॅंक काहीही बोलण्यास तयार नाही..ऐन दुष्काळ शेतकरी सावकाराकडेराज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेची संथगतीमुळे रब्बीसाठीच्या कर्ज उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागत आहे. संतापाची बाब म्हणजे काही बॅंकांनी शेतकऱ्यांना नवे कर्ज देण्यास सपशेल नकार दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबूराव खंडागळे म्हणाले, की कर्जमाफीच्या यादीत माझे नाव येत नाही. मी बॅंकेत खेटे घातले. इतर बँकांनी देखील कर्ज देण्यास नकार दिला. शेवटी नाइलाजाने मला सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले..Farmer Loan Waiver : कर्जमाफीच्या ४ याद्या जाहीर, पण वर्ष उलटूनही ५० हजारांचा प्रोत्साहन निधी मिळेना!.याद्यांच्या तारखा सांगता येत नाहीत!राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहकार विभागासह विविध यंत्रणा क्षेत्रीय पातळीवरील प्रयत्नशील आहे. योजना राबविण्यासाठी अनेक तांत्रिक पातळ्यांमधून जावे लागत असल्यामुळे काही ठिकाणी अडचणी येतात. मात्र त्या सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातात. योजनेतील काही मुद्दे महाआयटीशी निगडित, तर काही मुद्दे फार्मर ‘आयडी’शी निगडित आहेत. काही मुद्दे बॅंकांच्या स्तरांवर तर काही मुद्दे शासनाच्या पातळीवरील असतात. त्यामुळे पुढील याद्या केव्हा प्रसिद्ध होतील, याची निश्चित माहिती लगेच सांगता येत नाही. अर्थात, शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता तालुक्याच्या पातळीवरील सहायक निबंधक कार्यालय किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून शंका निरसन करावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयातून करण्यात आले आहे..योजनेतील गोंधळ...- योजनेत पारदर्शकता, स्पष्टतेचा अभाव- यादी नेमकी कोणाकडे? बँकाही झटकतात हात- ई-केवायसी, फार्मर आयडीचे मुद्दे कायम- आधार प्रमाणीकरण, ओटीपीच्या तक्रारी- नावांसाठी बँका, सेतूत शेतकऱ्यांच्या हेलपाटे- मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हाल- चौथ्या यादीनंतरही संभ्रम कायम.“ई-केवायसी होऊनही पैसे मिळालेले नाहीत. मुलांच्या नावे शेती केल्याने फार्मर आयडी मिळत नाहीत. गावातील २०-३० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.”भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, कर्डे, ता. शिरूर, जि. पुणे.‘‘बॅंकेकडे मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु यादीत नाव येत नाही. बॅंकेचा अधिकारी सांगतो, की माझी सर्व माहिती शासनाकडे पाठवली. परंतु यादीत माझे नाव का येत नाही हे सांगता येत नाही.’’- शेतकरी तात्यासाहेब पाटील, खटाव, ता. पलूस, जि. सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.