Agriculture Loan Update: शेतकरी कर्जमाफीत निकषांची मारलेली पाचर आणि ३० जूनच्या हुकलेल्या डेडलाइनमुळे खरिपाचा खोळंबा झाला आहे. खाते थकीत असल्याने पीककर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्के असल्याचे बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. .सरकारने कर्जमाफीचे तपशील दिलेले नसल्यामुळे नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण सरकारने पुरवणी मागण्यांत कर्जमाफीसाठी तरतूद केलेली रक्कम आणि पात्रतेच्या निकषांत बसणाऱ्या शेतकऱ्यांची अंदाजे संख्या लक्षात घेता दोन लाखांपर्यंत केवळ ५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो किंवा कमी कर्ज असलेल्या जवळपास १० ते १५ लाख शेतकऱ्यांचीच खाती नील होऊ शकतात, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..गेल्या वर्षी खरिपात शेतकऱ्यांच्या जवळपास ९५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हाती आलेल्या सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसह रब्बीतील हरभऱ्यालाही कमी भाव मिळाला होता. खरीप तर शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरला होता..त्यामुळे शेतकरी नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणुकीच्या वेळी सरकारने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दोन जून रोजी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर नियमित कर्जदारांना आणि २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरल्यास ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता (ओटीएस) योजना आणली..Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल.जाचक निकषसरकारने २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी यंदाच्या कर्जमाफीसाठी पात्र नसतील, असे म्हटले आहे. या शेतकऱ्यांनी २०१९ नंतर कर्ज घेतले असेल आणि ते थकले असेल तर त्यांनी ते कर्ज भरल्यास ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार ३२ लाख ३७ हजार आहे. तसेच नियमित कर्जदारही काही लाख आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे..५० लाख शेतकऱ्यांची ५० हजारांवर बोळवण?सरकारने कर्जमाफी जाहीर करताना ५६ लाख शेतकरी पात्र ठरतील आणि ३६ हजार ५८५ कोटी रुपये लागतील असे सांगितले होते. या रकमेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यायची असेल, तर केवळ १८ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. पण सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रति शेतकरी ६५ हजार ३३० रुपयांचाच लाभ मिळेल. पण सरकारने लावलेले निकष तसेच कर्जमाफीसाठी एकूण तरतूद आणि पात्र शेतकरी संख्या याची गोळाबेरीज केल्यास केवळ ५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना पूर्ण दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कर्ज एक लाखांच्या दरम्यान आहे. अशा जास्तीत जास्त १० ते १५ लाखांच्या दरम्यान शेतकऱ्यांची खाती नील होऊ शकतात. तर उरलेल्या ४५ ते ५० लाख शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपये मिळतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे..Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा.पेरणीच्या पैशांसाठी शेतकऱ्यांची वणवणयंदा ‘एल निनो’चे वर्ष आहे. पाऊस कमीच राहणार आहे. त्यामुळे पेरणीचा काळ एकदा उलटल्यानंतर संपूर्ण हंगामाच हुकण्याची भीती आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेच पेरणी करणे यंदा आवश्यक आहे. म्हणजेच पेरणीयोग्य पाऊस पडण्याच्या आधीच खते, बियाणे आदी तजवीज करून ठेवावी लागेल. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पेरणीसाठी नवीन कर्ज मिळेल, या आशेवर शेतकरी होते. पण सरकारने खाती ‘नील’ केली नाहीत. .त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. सध्या नवीन कर्जवाटचे प्रमाण १५ ते २० टक्के असल्याचे लातूर आणि जालना जिल्ह्यातील बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी उसनवारी किंवा खासगी सावकारांकडून कर्जे घ्यावी लागत आहेत. पुढे दुबार पेरणीची वेळ आल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे शेतकरी सांगत आहेत. आधीच एल निनोच्या सावटामुळे पुढे पीक किती येईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत सरकारची अनास्था शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकत आहे..प्रोत्साहन अनुदानासाठी वाढतोय कर्जाचा भारशेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान हवे असल्यास त्यांना आधी थकलेले कर्ज भरावे लागणार आहे. विशेषतः २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी अडचणीत आले आहेत. नियमित कर्जदारांनीही कर्जे भरावी, असा तगादा बॅंका लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून किंवा उसनवारी करून कर्जे भरूनच प्रोत्साहनपर अनुदान घ्यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवरचा कर्जाचा भार आणखी वाढणार आहे, असे अनेक शेतकऱ्यांना सांगितले..सरकारने घातलेल्या जाचक अटींमुळे ३५ ते ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली केवळ ५० हजार रुपये मिळतील. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जाणार नाही हे सांगितले होते. पण सध्याची प्रक्रिया पाहता सरकार सध्या केवळ शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेईल आणि प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम २०२८ नंतरच खात्यात जमा करेल, अशी शक्यता दिसत आहे. सरकार पावलोपावली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.अजित नवले, सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा.कर्जमाफीत सरकारने टाकलेल्या निकषांमुळे अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत. तसेच कर्जमाफी अजूनही झाली नाही त्यामुळे बॅंका पीककर्जे देत नाहीत. आधीची कर्जमाफी घेतलेल्या आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी कर्ज भरण्यासाठी बॅंका तगादा लावत आहेत. आधीच कमी पाऊस आणि त्यात पेरणीच्या तोंडावर सरकारने शेतकरी आणखी अडचणीत आणला आहे.रूपेश शंके, युवा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, लातूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.