Drought Declaration Conditions Issue: पावसातील दीर्घ खंडामुळे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर झाली आहे. शासनाने नियम व निकषांच्या चौकटीत मदत देण्याऐवजी सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली..कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांची विभागीय आढावा बैठक गुरुवारी (ता. २४) नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. दुष्काळ, पाणीटंचाई, पीक नुकसान, पीकविमा आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पीक परिस्थितीचे सादरीकरण केले..Maharashtra Farmers Relief : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये ग्वाही.नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, आमदार माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते..गिरीश महाजन यांनी पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. गरज भासल्यास परराज्यातून चारा आणण्यासह परिस्थितीनुसार चारा छावण्या सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे भरपाई देऊन प्रलंबित पीकविमा दावे तातडीने निकाली काढण्याची मागणी केली..Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे.धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतही पावसातील खंड, घटलेले उत्पादन, पाणीसाठा आणि भूजलस्थिती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. अहिल्यानगरमध्ये १२१ गावे आणि ४४१ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नंदुरबारमध्ये संभाव्य उन्हाळी पाणीटंचाईच्या दृष्टीने आतापासून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.नाशिक जिल्ह्यात पावसातील खंडामुळे ७२ महसूल मंडळे बाधित झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. विविध आंदोलनांमुळे पीक पंचनाम्यांचे काम काही प्रमाणात मागे पडले असून, ते लवकर पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले..खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे तसेच आमदार राहुल आहेर, हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, किशोर दराडे, विवेक कोल्हे, किरण लहामटे आणि माणिकराव कोकाटे यांनी विविध मागण्या मांडल्या. बैठकीत सरसकट दुष्काळ जाहीर करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. आता शासनाच्या निर्णयाकडे शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे..वीजपुरवठ्याचा मुद्दा बैठकीत गाजलादुष्काळामुळे शेती आधीच संकटात असताना उरलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे या प्रयत्नांवर पाणी फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असल्याचे लोकप्रतिनिधींनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. ‘आठ तासांऐवजी सात तास वीज द्या; मात्र ती सुरळीत द्या,’ अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. तक्रारींची तीव्रता लक्षात घेऊन गिरीश महाजन यांनी हा प्रश्न राज्यभराचा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले..‘संकटात राजकारण नको’नैसर्गिक संकटाच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन आढाव्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीकस्थितीची पाहणी करावी, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.