Low Cost Sanitation Solution : पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी शोषखड्डा, जलतारा, पाझर तलाव, रिचार्ज शाफ्ट असे विविध मार्ग वापरले जातात. प्रामुख्याने सांडपाणी जिरविण्यासाठी शोष खड्डे किंवा सुधारित शोषखड्ड्यांचा वापर केला जातो. त्यांच्या आश्चर्यकारक फायद्यांमुळे त्यांना ‘मॅजिक पिट्स’ असेही संबोधतात. बऱ्याच वर्षापासून घरातील सांडपाणी जमिनीत जिरवण्याची संकल्पना चालत आलेली आहे. अगदी गाडगे महाराजांच्या कीर्तनात आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतही हा मार्ग सुचविला आहे. .पूर्वी मर्यादित लोकसंख्या होती. वापरायचे पाणीही विहिरीतून काढावे लागायचे किंवा दूरवरून वाहून आणावे लागे. साहजिकच पाणी जपून वापरले जाई आणि सांडपाण्याचे प्रमाणही कमी होते. मात्र बहुतांश गावात घरापर्यंत नळयोजना झाल्या आहेत. विनाकष्टाचे पाणी उपलब्ध होत असल्याने वापरावर आणि सांडपाणी निर्मितीवर कसला धरबंदच राहिला नाही. प्रत्येक घराभोवती गटारी व त्यात वाहणारे सांडपाणी दिसते. या गटारींची नियमित देखभाल होतेच असे नाही. त्यात पाणी तुंबल्यामुळे दुर्गंधी, डासांची पैदास आणि रोगराईचे उगमस्थान झालेली दिसतात. या साऱ्या समस्यांवर शोषखड्डे हा रामबाण उपाय ठरू शकतो..नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये शोषखड्ड्यांची चळवळच झाली आहे. त्यामागे होते नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे. त्यांच्या काळात नांदेड जिल्ह्यात सर्वत्र शोषखड्डे निर्मितीची चळवळ राबवली गेली. सरकारी कार्यक्रमासोबतच लोकांच्या व गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अभिमन्यू काळे हे खेड्यापाड्यात जायचे, मुद्दाम मुक्काम करायचे. अशा मुक्कामी सर्वाधिक त्रास होई तो डासांचा. पण एका गावात दोन दिवस मुक्कामी राहिले तरी एक डास त्यांना दिसला नाही. मग त्याचे कारण शोधताना लक्षात आले की या गावपरिसरात सर्वत्र सांडपाणी शोषण्यासाठी शोषखड्डे आहेत. .शोधण्याचा प्रयत्न केला असता त्या गावासहीत आजूबाजूच्या काही गावांत शोष खड्ड्यांचा उपक्रम राबवला गेला होता. या उपक्रमाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. तेव्हा आणि नंतर जिल्हा परिषद मुख्याधिकारी झाल्यावर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेला सक्रिय करून पूर्ण नांदेड जिल्ह्यात ही शोषखड्ड्यांची मोहीम राबवली. २०१६ मध्ये नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावे डासमुक्त झाली. या सांडपाण्यासाठी शोषखड्डा हा चार फूट बाय चार फूट बाय चार फूट आकाराचा असतो. किंवा छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे छिद्रे असलेली सिमेंटची टाकी असते. या टाकीभोवती खड्डा करून त्यात छोटे छोटे दगड भरलेले असतात. या साध्या संरचनेसाठी फारतर तीन ते चार हजार खर्च येतो. स्वतः काम केल्यास याहीपेक्षा कमी खर्च होतो. हा खड्डा चार-पाच लोकांच्या कुटुंबातून तयार होणाऱ्या सांडपाण्यासाठी पुरेसा ठरतो..खड्ड्यातील सिमेंटच्या टाकीचे महत्त्वस्वयंपाक घर व शौचालयातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात घनपदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या विघटनास अधिक काळ लागतो. ही सिमेंटची टाकी न करता नुसताच शोषखड्डा केल्यास हे घनपदार्थ दगडांच्या पोकळीत साठून राहतात. तीन- चार वर्षांत दगडांच्या पोकळ्या गच्च झाल्याने जमिनीत पाणी मुरणे थांबते. अशा वेळी हे सर्व दगड बाहेर काढून वाळवून त्यातील गाळमाती काढून टाकावी लागते. हे कामही नव्या टाकीमुळे टळते. घनपदार्थ असलेले सांडपाणी टाकीत पडताच चिद्राद्वाररेत्यातील पाणी जमिनीत मुरते. घनपदार्थ टाकीच्या तळाशी बसतात. त्याने काही काळानंतर अशा घनपदार्थाने टाकी भरली दगडांना न हलवताही ती काढून टाकता येते. त्यामुळे शोषखड्डे पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतात. म्हणूनच त्यांना ‘मॅजिक पीट’ म्हणतात. जिथे सिमेंटच्या पाइपची उपलब्धता नाही, तिथे प्लॅस्टिकचा मोठा बॅरलही वापरता येतो..Ground Water Recharge : लोकसहभागातून भूगर्भाचे पुनर्भरण करावे.यातही अधिक सुधारणा करता येते. शौचालयातील सेंद्रिय घनपदार्थांचे विघटन वेगाने होण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण असलेली भुकटीही बाजारात उपलब्ध आहे. तिचा वापर दरवेळी शौचालय धुताना केल्यास स्वच्छतेसोबतच विघटनाचे कामही वेगाने होऊन जाते. गाळाचे विघटन एकाच दिवसात होऊन पाणी स्वरूपात ते बाहेर पडून जाते. टाकी वारंवार भरण्याची समस्या राहत नाही. पुन्हा शौचालय स्वच्छतेसाठी फिनाईल किंवा ॲसिड वापरण्याचीही आवश्यकताही राहत नाही. (ही भुकटी वापरत असल्यास ते वापरू नये, असेच सुचवले जाते.).शोष खड्ड्याचे फायदेघरातील सांडपाणी तिथेच जमिनीत मुरते. गटारी वाहणे, तुंबणे हे प्रकार टळतात. परिणामी घराभोवतीची घाण व त्यात पैदास होणारे जीवजंतू, डास, माश्या, चिलटे असे रोगकारक घटकांची पैदास थांबते.या कीटकांच्या चाव्यापासून बचावासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरील खर्चात बचत होते. उदा. डासांच्या कॉइल, धूपकांड्या किंवा सतत पंखा लावणे इ.रोगकारक घटकच नसल्यामुळे रोगराई टळते. आजारपण व औषधांवरील खर्चात (किमान ५ हजार रुपये प्रति कुटुंब) बचत होते. त्यातही डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंगी किंवा अन्य प्राणघातक आजाराच्या उपचारात कितीतरी पट खर्च येऊ शकतो.गटारांची देखभाल, स्वच्छता याचे कष्ट किंवा ग्रामपंचायतीचा खर्च दोन्ही वाचतात.घरापुढील अंगणात बसणे, खेळणे किंवा छोटीमोठी कामे करणे शक्य होते. उन्हाळ्यात अंगणात डासांच्या त्रासाविना खेळत्या हवेत झोपण्याचे सुख काय वर्णावे?सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे भूजल पुनर्भरण होय. एका हजार लोकसंख्येच्या गावात रोज सरासरी ७० हजार लिटर सांडपाणी तयार होते. पाणी वापराचे प्रमाण दुष्काळी परिस्थितीत माणसी ३० लिटर, तर बागायती भागात माणसी शंभर लिटर इतके भिन्न आहे. वापरलेल्या पाण्याच्या ७० टक्के पाणी सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. बाष्पीभवनाद्वारे उडून जाते. उलट हेच पाणी शोष खड्ड्याद्वारे जमिनीत जिरवले तर सगळ्या गावाचे एका महिन्यात १५ लाख लिटर या प्रमाणे वर्षात दोन कोटी लिटर पाणी जमिनीत मुरते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक गावे याचा अनुभव गेली वीस ते पंचवीस वर्षे घेत आहेत.ग्रामपंचायतीचा गटारी बांधणे, दुरुस्ती, देखभाल आणि स्वच्छ ठेवण्याचा खर्च एकतर कमी होतो किंवा पूर्ण वाचतो. एक हजार लोकसंख्येच्या गावात अंदाजे पाच किलोमीटर लांबीची गटारे बांधावी लागतात. त्यासाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च होतो. तो अन्य विकासकामांना वापरता येतो.सांडपाण्यातून तयार होणारे मिथेन व अन्य विषारी वायू यांची समस्या राहत नाही..Groundwater Enrichment : भूजल पुनर्भरणाची जलतारा मोहीम.याबाबतीत काही शंका१. शोषखड्डे (मॅजिक पीट) काळ्या मातीत यशस्वी होतात का?बहुतेक गावठाणी ही मुरमाड वा खडकाळ जमिनीवर आहेत. काळी माती असल्यास त्या भागात खड्ड्याचा आकार मोठा घ्यावा. तसेच त्यात दगड भरण्यापूर्णी अडीच फुटाचा कडक मुरमाचा थर द्यावा. त्यावर सिमेंटची सच्छिद्र टाकी ठेवून बाजूने दगडांचा थर रचावा.२. मोठ्या कुटुंबात माणसांच्या संख्येच्या प्रमाणात खड्ड्याचा आकार वाढवावा.३. सार्वजनिक नळ, विहिरी, बोअर, हातपंप येथेही मोठे शोष खड्डे घ्यावेत. .४. सांडपाणी जमिनीत जाऊन भूजलात जाते. म्हणजे ते पिण्यासाठी वापरणे शक्य आहे का?खरेतर तशी शंका बाळगण्याची आवश्यकता नसते. कारण हे सांडपाणी जमिनीत मुरतेवेळी त्यातील न विरघळलेले व विरघळलेले घटक माती, दगडातून गाळले जातात. तसेच मातीतील सूक्ष्मजीवाही त्यांच्या विघटनाचे काम करत असतात. त्यामुळे भूजलापर्यंत अशुद्धी शक्यतो जात नाही. होत राहते, तसेच माती व खडकामुळे ते गाळून खाली जाते. त्यामुळे या पाण्यात अशुद्धता सहसा राहत नाही. तरीसुद्धा अधूनमधून आपल्या विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याची तपासणी जरूर करावी. ते आरोग्यासाठी फायद्याचेच!५. यातूनही शोष खड्ड्याभोवती उपलब्ध जागेमध्ये कर्दळी, केळी, अळू, शेवगा व नारळ यासारखी काही झाडे नक्की लावावीत. म्हणजे त्यांची मुळे सांडपाण्यातील सेंद्रिय घटकही शोषून घेतात.शोषखड्ड्यांच्या निर्मितीची चळवळ लातूर जिल्ह्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी जोमदारपणे राबवला आहे. त्यांनी शहरासोबत ग्रामीण परिसरामध्ये यासंदर्भात जनजागरणाची मोहीम राबवली होती. पाणी फाउंडेशननेही त्यांच्या उपक्रमात शोषखड्ड्यांबाबत आग्रह धरला असून, त्यासाठी काही मार्कही राखीव ठेवले आहेत.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.