डॉ. प्रकाशकिरण पवारकेवळ महाराष्ट्रच नाही, तर देशातील शेतकरी हे कष्ट आणि शहाणपणातून प्रगती साधणारे आहेत. त्यांच्या प्रगतीमध्ये असलेला मुख्य अडसर म्हणजे पाण्याची नियमित आणि शाश्वत उपलब्धता नसणे. आज राज्यातील बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू असून, ते प्रामुख्याने मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. सिंचनासाठी नियमित पाण्याची उपलब्धता ही महत्त्वाची गरज असूनही त्याची पूर्तता होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्या मोठी आहे. अशा वेळी उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम सिंचन कसे करायचे, या बाबत मूलभूत, शास्त्रीय व तांत्रिक अचूक माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या सदरातून आपण प्रयत्न करणार आहोत. .शेती ही निसर्गावर आधारित प्रक्रिया आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश यांच्यासोबतच शेतकऱ्याचे व्यवस्थापन या सर्वांचा योग्य मेळ साधला तरच चांगले उत्पादन मिळते. यामध्ये पाणी (सिंचन) हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पिकाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दिलेले सिंचन हे उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे. एक बाब मात्र पहिल्यांदाच स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे शेती जरी निसर्गावरती अवलंबून असली तरी ती माणसाद्वारे केली जाते. शेती म्हणजे निसर्गाच्या एका भागामध्ये आपण करत असलेला हस्तक्षेपच असतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये पडणारे पावसाचे पाणी हे नैसर्गिक असते. पण आपण बाहेरील जलस्रोतातून किंवा विहिरीतून उपसून दिलेले पाणी हाही त्याच्या शेतामधील हस्तक्षेपच असतो. त्यामुळे शेती आणि त्याचे सिंचन या दोन्ही बाबी करत असताना निसर्गाला कमीत कमी हानी पोचेल, हे पाहणे आपले कर्तव्यच ठरते..Water Conservation Farming : मूलस्थानी जलसंधारणावर द्या भर.पिकांच्या वाढीसाठी पाण्याचे महत्त्वपिकांच्या वाढीसाठी पाणी हा मूलभूत घटक आहे. बियांचे अंकुरण, उगवण होणे, जमिनीतील अन्नद्रव्य पिकांपर्यंत पोहोचणे, पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालणे आणि वनस्पतीचे तापमान नियंत्रित ठेवणे अशा अनेक कामांसाठी पाणी आवश्यक असते. पाण्याची कमतरता भासल्यास पीक अशक्त होते. पाणी जास्त झाल्यास पिकाची मुळे, खोड कुजण्याची शक्यता असते. तसेच पाण्याच्या सातत्यपूर्ण अतिवापरामुळे मातीत क्षारांचे प्रमाण वाढते, मातीतील नैसर्गिक व कृत्रिमरीत्या पुरविलेल्या अन्नद्रव्यांचा निचरा होऊन भूजल व परिसरातील जलस्रोत प्रदूषित होतात. त्यामुळेच सिंचन हे संतुलित प्रमाणातच करण्याची आवश्यकता असते. पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था असून, त्यामध्ये त्यांची पाण्याची गरज वेगवेगळी असते..सिंचन व्यवस्थापन म्हणजे काय?पिकाला पाणी देणे म्हणजे सिंचन ही ढोबळ व्याख्या असली तरी पिकांना कोणत्या पद्धतीने पाणी द्यायचे, कधी पाणी द्यायचे आणि किती पाणी द्यायचे या तीन प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे मिळवणे म्हणजे चांगले सिंचन व्यवस्थापन होय. यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर पीक लागवडीच्या आधी मशागतीपासूनच माहिती असावे लागते. म्हणजे त्यानुसार जमिनीची रचना उदा. सपाट वाफा, सरी वरंबा, गादीवाफा इ. आधीच तयार करून घेता येतात..Farm Pond Water : शेततळ्यातील पाणी टिकवून ठेवण्याचे उपाय.शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या मूलभूत पद्धतीसामान्यतः अधिक उत्पादन घेणे म्हणजे अधिक निविष्ठांचा वापर करणे हा चुकीचे गृहीतक बहुतेकांच्या मनात असते. त्याऐवजी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांचा योग्य प्रमाणात, योग्य वेळी वापर करणे गरजेचे असते. उत्पादन वाढीच्या मूलभूत व सिद्ध झालेल्या पद्धती पुढील प्रमाणे....सिंचनाचे वेळापत्रक ः सिंचनाचे वेळापत्रक म्हणजेच पिकाला कधी पाणी द्यायचे आणि किती पाणी द्यायचे हे ठरविणे. ते शास्त्रीय पद्धतीने केल्यास पाण्याची बचत होते, उत्पादनात वाढ होते.पाण्याची गरजेनुसार योग्य प्रमाण ः प्रत्येक पिकाची पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते. जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकाच्या वाढीची अवस्था, पाणी देण्याची पद्धत आणि शेतीचे व्यवस्थापन यानुसार गरज बदलत असते. त्यानुसार योग्य प्रमाणात पाणी देणे..Water Meter: पाणीपुरवठा संस्थांना नाही बसणार मीटर : डॉ. पाटणकर.पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी देणे ः प्रत्येक पिकाच्या वाढीमध्ये काही अवस्था पाण्यासाठी संवेदनशील असतात. या काळात पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये जास्त घट होते. प्रत्येक पिकाच्या जल संवेदनशील अवस्था जाणून घेणे. उदा. सर्वसामान्यपणे पिकांसाठी बिजांकुरण, फुटवे फुटण्याची अवस्था, फुले येणे, फळे किंवा दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्था आहेत.कार्यक्षम सिंचन पद्धतींचा वापर ः कार्यक्षम सिंचनामुळे पाण्याची सरासरी २५ ते ७० टक्क्यांपर्यंत बचत होते. उत्पादनामध्ये १५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंचनाच्या पारंपरिक किंवा आधुनिक अशा दोन्ही पद्धतीमध्ये पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे शक्य आहे..जमिनीमधील आर्द्रता टिकवून ठेवणे ः जमिनीमध्ये ओलावा जपण्यासाठी योग्य वेळी मशागत, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविणे, जमिनीचे आच्छादन करणे अशा काही बाबींचा वापर करता येतो.खतांचा संतुलित वापर ः पाण्यासोबत खते पिकांच्या मुळापर्यंत पोहचतात. त्यामुळे खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्याची गरज असते.पीक आणि पिकांचे वाण यांची योग्य निवड ः पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाण आणि पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणाऱ्या पद्धतीची निवड अत्यावश्यक असतात..Water Conservation: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारातील कामांना ‘क्लिन चीट’.जमिनीचे सपाटीकरण ः पाण्याचे सर्व दिशांना व्यवस्थितपणे व एकसमान वितरण होण्यासाठी जमिनीची सपाटीकरण आवश्यक आहे.पाण्याचा अपव्यय टाळणे ः पाण्याचा सर्वाधिक अपव्यय हा जलस्रोतापासून पिकापर्यंत पाणी येईपर्यंत (म्हणजे वहनाच्या काळात) होतो. पिकापर्यंत पोचल्यानंतरही मुळांच्या कक्षेबाहेर होणारा झिरपा आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे बाष्पीभवन यामुळेही पाण्याचा अपव्यय होत असतो..जागरूकता व निर्णय क्षमता ः सिंचनाबाबत अनेक निर्णय हे जागरूकतेने व तातडीने घ्यावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्याची निर्णयक्षमता महत्त्वाची ठरते. इथे अत्याधुनिक निर्णय समर्थन प्रणाली उपयुक्त ठरू शकतात.एकात्मिक कीड नियंत्रण ः सिंचनाच्या ताणाचे किंवा आधिक्याचे परिणाम हे कीड रोगांना आकर्षित करणारे ठरू शकतात. पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब गरजेचे ठरतो. त्यासाठी लागवडीपासून दूरदृष्टीने योजना आखल्या पाहिजेत.पीक फेरपालट / पिकांची अदलाबदल ः जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आणि कीड-रोगांची साखळी तोडण्यासाठी पिकांमधील फेरबदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात.आपल्या या लेखमालेमध्ये आपण कार्यक्षम सिंचनाशी संबंधित सर्व घटकांची सांगोपांग चर्चा करणार आहोत..पिकासाठी पोषक तत्त्वेपिकासाठी कोणती पोषक तत्त्वे लागतात, याची यादी पाहिल्यास त्यात हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांचाही समावेश असतो. ही तत्त्वे प्रकाश संश्लेषणात म्हणजेच अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामध्ये बाधा आल्यास संपूर्ण प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बाधित होऊन सरासरी उत्पादनामध्ये ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्याच प्रमाणे मुख्य पोषक अन्नद्रव्ये उदा. नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) व पालाश (पोटॅशिअम) यांची उपलब्धता न झाल्यास पीक वाढीवर सरासरी ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.डॉ. प्रकाशकिरण पवार ९९५८६६७६५८, (फक्त मेसेजिंगसाठी)(लेखक ग्रीन प्रॉस्पॅरिटी इनोव्हेशन्स या सिंचन विषयक कंपनीचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.