सपना जाधव, रेवती शितोळे, डॉ. समीर ढगेसंशोधनांमध्ये असे निदर्शनास आले आहे, की काही मोजकी जनावरे इतर समान जातीच्या जनावरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी मिथेन उत्सर्जन करतात. या जनावरांची ओळख निश्चितपणे पटवून देता आली, तर कमी मिथेन उत्सर्जन करणारे पशुधन विकसित करणे शक्य होऊ शकते. .भारतीय पशुधन व्यवस्था ही हरितगृह वायू उत्सर्जनात महत्त्वाचा वाटा उचलणारी असून, त्यामुळे जागतिक तापमानवाढीशी तिचा थेट संबंध आहे. भारतात रवंथ करणाऱ्या पशुधनाची संख्या प्रचंड आहे. जगातील एकूण रवंथ पशुधनापैकी सुमारे १४ टक्के पशुधन भारतात आढळते, जे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे १५,००० कोटी रुपयांचे योगदान देते.आयपीसीसीच्या अहवालानुसार सर्व स्रोतांमधून होणारे जागतिक मिथेन उत्सर्जन ६१० दशलक्ष टन/वर्ष इतके आहे. यांपैकी सुमारे ६० टक्के उत्सर्जन मानवनिर्मित आहे. त्यातील महत्त्वाचा वाटा पशुधन क्षेत्राचा आहे. विविध अभ्यासांनुसार पाळीव जनावरांकडून होणारे मिथेन उत्सर्जन ७० ते २२० दशलक्ष टन/वर्ष या मर्यादेत आढळते. या फरकाचे मुख्य कारण म्हणजे मापन पद्धती, गृहीतके आणि प्रति-पशू उत्सर्जन दरातील तफावत..Methane Emission: पशुपालनातील मिथेन उत्सर्जनाचे परिणाम.भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधन उत्पादन प्रणालीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध, मांस, लोकर, कातडी, शेणखत यांसारख्या उत्पादनांबरोबरच देशातील सुमारे ५ टक्के लोकसंख्येला थेट रोजगार पशुधन क्षेत्रातून मिळतो. विविध अभ्यासांनुसार भारतीय पशुधनातून आंत्रिक किण्वनाद्वारे दरवर्षी ७.२६ ते १०.४ दशलक्ष टन मिथेन उत्सर्जन होते.मात्र या अंदाजांमध्ये अनेकदा आहाराचे प्रमाण व गुणवत्ता विचारात घेतलेली नव्हती. प्रायोगिक पचनक्षमता चाचण्या व प्रादेशिक आहार संसाधनांच्या आधारे भारतीय पशुधनातील मिथेन उत्सर्जन सुमारे ९.०२ दशलक्ष टन/वर्ष असल्याचे नोंदवले गेले आहे. यांनी विविध रवंथ पशुधन गट व आहार प्रकारांचा विचार करून १०.०८ दशलक्ष टन/वर्ष मिथेन उत्सर्जन नोंदवले आहे..भारतात आंत्रिक मिथेन उत्सर्जनांपैकी ९० टक्क्यांहून अधिक योगदान मोठ्या रवंथ पशुधनाचे (गाई व म्हशी) असून उर्वरित लहान रवंथ पशुधनाचे आहे.पशू किती आहार घेतो आणि त्या आहाराची पचनक्षमता हे दोन घटक मिथेन निर्मिती ठरवतात. भारतात प्रति पशू मिथेन निर्मिती विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे.याचे मुख्य कारण म्हणजे कमी दर्जाचे, तंतुमय चाऱ्याचा वापर. सरासरी भारतीय गाय दरवर्षी सुमारे ३५ किलो मिथेन तयार करते, तर जर्मनीतील दुग्धजन्य गाईमध्ये हे प्रमाण ९५ किलो/वर्ष आहे. जागतिक तुलनेत भारतीय उपखंडात प्रति पशू मिथेन उत्सर्जन सर्वांत कमी असल्याचेही नोंदवले गेले आहे..Methane Emission: पशुपालनामुळे मिथेन उत्सर्जनाचे संकट गंभीर.मिथेन उत्सर्जन कमी करण्याचे उपायपशुधनातून होणारे मिथेन उत्सर्जन हे प्रामुख्याने खाद्याचा प्रकार, खाद्याचे प्रमाण, आजूबाजूचे तापमान, खाद्य सेवनाचा वेग, सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटकांचे संतुलन आणि प्राण्यांच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांची रचना या घटकांवर अवलंबून असते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून समग्र पशुधन विकासाचा दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनामुळे एकीकडे दूध उत्पादनात वाढ होऊ शकते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना शाश्वत उपजीविका मिळू शकते..भारतामध्ये पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये कमी उत्पादन देणारी किंवा अजिबात उत्पादन न देणारी रवंथ करणारी जनावरे मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा जनावरांमधून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण प्रति किलो दूध किंवा मांस उत्पादनाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे जागतिक पातळीवर भारतावर पशुधनामुळे होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाबाबत वारंवार टीका केली जाते. तथापि, भारतातील अनेक राज्यांमध्ये गोहत्या बंदी असल्यामुळे अशा जनावरांचे थेट निर्मूलन करणे सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाय करण्याऐवजी दीर्घकालीन व नियोजित धोरण अवलंबणे आवश्यक आहे..India methane emissions : भारतातील कृषी व पशुधन क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनाकडे संयुक्त राष्ट्रांनी लक्ष वेधले; अहवालात कोणते मुद्दे?.कमी उत्पादन देणाऱ्या व अनुत्पादक जनावरांची संख्या हळूहळू कमी करत त्याजागी सुधारित देशी जातींची तसेच संकरित जातींची उत्पादक जनावरे वाढविणे ही एक प्रभावी रणनीती ठरू शकते. निवडक संकरण, कृत्रिम रेतन, आणि वंशवृद्धी कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुधनाची उत्पादकता वाढविता येते. यामुळे समान संख्येतील जनावरांकडून अधिक दूध किंवा मांस उत्पादन मिळू शकते आणि परिणामी प्रति युनिट उत्पादनामागे होणारे मिथेन उत्सर्जन कमी होते. तसेच कमी उत्पादक जनावरांचे संगोपन कमी केल्यास चारा, पाणी आणि व्यवस्थापन खर्चातही बचत होते. ही प्रक्रिया हळूहळू आणि नियोजनपूर्वक राबविल्यास सामाजिक विरोध टाळता येतो आणि पर्यावरण संरक्षणासोबतच पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे भारतासारख्या देशासाठी ही रणनीती मिथेन उत्सर्जन कमी करण्याच्यादृष्टीने अत्यंत व्यवहार्य व शाश्वत ठरते..पशुधनामधून होणारे मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी कमी मिथेन निर्माण करणाऱ्या जनावरांची निवड करणे ही आशादायक रणनीती मानली जाते. सध्याच्या परिस्थितीत अशा जनावरांचे प्रमाण एकूण पशुधनामध्ये अत्यंत कमी असल्याचे आढळून येते. तसेच कमी मिथेन उत्सर्जन हा गुणधर्म आनुवंशिक स्वरूपात पुढील पिढीकडे जातो की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट वैज्ञानिक निष्कर्ष उपलब्ध नाहीत. तथापि, विविध संशोधनांमध्ये असे निदर्शनास आले आहे, की काही मोजकी जनावरे इतर समान जातीच्या जनावरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी मिथेन उत्सर्जन करतात. या जनावरांमध्ये असे का घडते, यामागील नेमकी जैविक किंवा सूक्ष्मजैविक कारणे सध्या पूर्णपणे समजलेली नाहीत..Methane Emission : मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना.काही शास्त्रज्ञांच्या मते रुमेनमधील सूक्ष्मजीवांची रचना, पचनक्षमता, खाद्याचा उपयोग करण्याची कार्यक्षमता किंवा चयापचय प्रक्रिया यांचा यामध्ये सहभाग असू शकतो. या संदर्भात अधिक सखोल व दीर्घकालीन संशोधन करण्याची नितांत गरज आहे. जर कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या जनावरांची ओळख निश्चितपणे पटवून देता आली, तर अशा जनावरांचा निवडक संकरणासाठी वापर करता येईल. भविष्यात या गुणधर्माचा व्यावसायिक स्तरावर उपयोग करून कमी मिथेन उत्सर्जन करणारे पशुधन विकसित करणे शक्य होऊ शकते. यामुळे पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होतील तसेच हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास भारताला मोठी मदत होईल. म्हणूनच कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या जनावरांची निवड ही शाश्वत पशुपालनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची संशोधनाधारित दिशा ठरते..पशुधनामधून होणारे मिथेन उत्सर्जन कमी करण्यामध्ये आहाराची निवड ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे, की काही विशिष्ट चाऱ्यांचे प्रकार आणि तेलपेंड इतर आहार घटकांच्या तुलनेत कमी मिथेन निर्माण करतात, जरी त्यांची रासायनिक रचना आणि ऊर्जा मूल्य जवळपास समान असले तरीही. अशा आहार घटकांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास पशुधनातून होणारे मिथेन उत्सर्जन किमान १० ते १५ टक्क्यांनी कमी करता येते. विशेषतः उच्च दर्जाचा हिरवा चारा आणि संतुलित तेलबियांपासून मिळणारी पेंड रूमेनमधील किण्वन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडवून आणतात. यामुळे मिथेन निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता काही प्रमाणात कमी होते..Methanotroph Bacteria: मिथेन उत्सर्जनावर नियंत्रण आणणारे मिथेनोट्रॉप्स जिवाणू.बहुतांश शेतकरी उपलब्ध असलेला स्थानिक चारा किंवा शेती अवशेष यांवरच आपल्या जनावरांचे संगोपन करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना बाजारातून विशिष्ट किंवा सुधारित चारा खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे जरी संशोधनाच्या पातळीवर कमी मिथेन निर्माण करणारे आहार उपलब्ध असले, तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहतो. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर उपलब्ध चाऱ्यांचे सुधारित व्यवस्थापन, त्यांचे प्रक्रिया तंत्रज्ञान आणि योग्य मिश्रणावर भर देणे आवश्यक ठरते. शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून व्यवहार्य आणि स्वस्त आहार पर्याय विकसित केल्यास मिथेन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते. म्हणूनच आहाराधारित उपाय हे वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असले, तरी त्यांची अंमलबजावणी शेतकरी-केंद्रित व अर्थसाह्य असणे अत्यंत गरजेचे आहे..पशुखाद्याची गुणवत्ता महत्त्वाचीरवंथ करणाऱ्या पशुधनाला दिल्या जाणाऱ्या खाद्याची गुणवत्ता सुधारल्यास मिथेन उत्सर्जनात लक्षणीय घट होऊ शकते, असे विविध संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याची पचनक्षमता वाढवल्यास रुमेनमधील किण्वन अधिक कार्यक्षम होते आणि मिथेन निर्मिती कमी होते.चाऱ्याची पचनक्षमता वाढल्यामुळे जनावरांना अधिक ऊर्जा उपलब्ध होते, परिणामी दूध व मांस उत्पादनात सुधारणा दिसून येते. तसेच आहारामध्ये धान्याचे प्रमाण वाढविल्यासही मिथेन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते, कारण धान्यामुळे प्रोपियोनेट निर्मिती वाढते व मिथेन तयार होण्याची प्रक्रिया दडपली जाते. मात्र निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याची पचनक्षमता वाढविण्यासाठी रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया कराव्या लागतात, ज्यासाठी अतिरिक्त खर्च येतो..लहान व गरीब शेतकऱ्यांसाठी हा खर्च परवडणारा नसतो. दुसरीकडे, आहारात धान्याचा समावेश करण्यालाही मर्यादा आहेत, कारण धान्य महाग असते आणि बाजारात त्याची उपलब्धताही अनिश्चित असते. जर शासनाच्या धोरणामध्ये बदल करून पशुखाद्यासाठी दर्जेदार धान्य आयात करण्यास परवानगी दिली, तर हा उपाय व्यावसायिक स्तरावर प्रभावीपणे राबविता येऊ शकतो.- डॉ. समीर ढगे, ९४२३८६३५९६(पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.