New Delhi News: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबद्दल दोन्ही देशांनी व्यापक रूपरेषा जाहीर केली असली, तरी त्याचे सविस्तर तपशील अजूनही समोर आलेले नाहीत. परंतु प्राथमिक अंदाजानुसार भारत आपल्या कृषी बाजारपेठेत अमेरिकेला केवळ मर्यादित प्रवेश देण्याची शक्यता आहे. परिणामी मका, सोयाबीन, इथेनॉल, डेअरी यांसारख्या क्षेत्रांना या कराराचा फटका बसण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) रात्री भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा समाजमाध्यमांवर केली. त्यात भारताने अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क शून्य केल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकेच्या कृषिमंत्री ब्रुक रॉलिन्स यांनी भारताची मोठी बाजारपेठ अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली झाल्याचे वक्तव्य केले होते. या घडामोडींमुळे अमेरिकेतील शेतीमालाची भारतात शुल्कमुक्त आयात सुरू होईल आणि त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती..India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा.या पार्श्वभूमीवर प्राथमिक संकेतांनुसार केवळ बदाम, अक्रोड, पिस्ते, सफरचंद, नाशपाती आणि बेरी यांसारख्या उच्च मूल्य शेती उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करणे किंवा आयात कोटा वाढविण्यास भारत सहमती देऊ शकतो. तसेच फळे, भाजीपाला, वाइन आणि मद्य यांच्या व्यापारातील अडथळेही कमी केले जाऊ शकतात. भारत मका, सोयाबीन आणि सोयामील यांवरचे आयात शुल्क घटविण्याची शक्यता कमी आहे. भारतात कापूस वगळता जनुकीय बदल केलेल्या (जीएम) पिकांना परवानगी नाही..India US Trade Deal: अमेरिकेपुढे नांगी.अमेरिकेत प्रामुख्याने जीएम मका, सोयाबीन उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारतात या मालासाठी बाजारपेठ खुली होण्याची शक्यता धूसर आहे. भारताकडे सध्या मोठ्या प्रमाणावर मका आणि सोयामिलचा साठा आहे. भारत जगातील सर्वांत मोठा सोयातेल आयात करणारा देश असला, तरी सोयाबीनची आयात मात्र नगण्य आहे. तसेच मका, तांदूळ आणि उसापासून देशात मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचे उत्पादन होत आहे. त्यामुळे अमेरिकेतून इथेनॉल आयातीची किंवा इथेनॉल निर्मितीसाठी मका आयात करण्याची मागणी भारत मान्य करण्याची शक्यता कमी आहे..अमेरिकेने आपल्या डेअरी उत्पादनांना भारताची बाजारपेठ खुली करण्यासाठी दबाव टाकलेला असला, तरी भारतातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते कराराच्या कक्षेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. भारतात एका शेतकऱ्याकडे सरासरी दोन ते तीन जनावरे असतात, तर अमेरिकेत एका शेतकऱ्याकडे शेकडो जनावरे असतात. या तफावतीमुळे भारतातील लहान शेतकरी स्पर्धेत पिछाडीवर पडतात, असा युक्तिवाद भारताकडून करण्यात आला..ट्रम्प, मोदी यांची सुटकाबदाम, अक्रोड, पिस्ते, सफरचंद, नाशपाती आणि बेरी ही शेती उत्पादने प्रीमियम वर्गवारीत येतात. या उत्पादनांसाठी भारत आधीपासूनच आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे अमेरिकेतून त्यांचा पुरवठा वाढला, तरी भारतीय शेतकऱ्यांवर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला या मुद्यावर विरोधाचा सामना करावा लागणार नाही. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय बाजारपेठेत या उत्पादनांना मिळालेला प्रवेश हा अमेरिकन शेतकऱ्यांसाठी मोठा विजय म्हणून मांडू शकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.