सह्याद्री पर्वतरांगांसह राज्याच्या पठारी भागांमध्येही आता बिबट्याचे दर्शन नित्याची बाब ठरली आहे. बिबट्याचा मानवी वस्त्यांमधील वावर आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. बिबट्याचे संकट रोखताना सरकारी यंत्रणा जेरीस आलेली असताना, दुसऱ्या बाजूला कोयना खोऱ्यातील पट्टेदार वाघांची संख्या वाढविण्याचा धाडसी निर्णय वन विभागाने घेतला आहे. याबाबत सह्याद्री व्याघ्र राखीव (एसटीआर) प्रकल्पाचे संचालक तथा भारतीय वन सेवेचे अधिकारी तुषार चव्हाण यांच्याशी केलेली बातचीत..बिबट्यांमुळे शेतकरी आधीच धास्तावलेले आहेत. त्यात पुन्हा विदर्भातील वाघ आणून ते सह्याद्रीत का सोडले जात आहेत?बिबट्या आणि वाघ हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. बिबट्यांच्या मानवी वसाहतींमध्ये होणाऱ्या हल्ल्याच्या घटना या उसातील बिबट्यांशी निगडित आहेत, हे तुम्हाला माहीत असेलच. उसात वाढलेल्या या बिबट्यांच्या समस्येवर वन विभागातील वरिष्ठांची मते तुम्ही माध्यमांनी मांडलेली देखील आहेत. सह्याद्रीच्या मूळ वनांमधील म्हणजे जंगलांमधील बिबट्यांकडून स्थानिक गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना राज्यभर उपद्रव होत असल्याचे तुम्हाला आढळणार नाही. कारण बहुतेक जंगली भागांमध्ये स्थानिकांनी जंगली बिबट्यांचे अस्तित्व, अर्थात सहजीवन मान्य केले आहे. आमच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच्या रांगांमध्येही बिबटे आहेत; मात्र तेथे बिबट-मानव संघर्ष दिसलेला नाही. आता वाघांबाबत सांगतो. .Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीत 'तारा'ची डरकाळी.सह्याद्रीत कुठेही मोघमपणे वाघ सोडले जाणार नाहीत. वाघ स्थलांतराची प्रक्रिया मुळातच खूप क्लिष्ट, शास्त्रोक्त व नियोजनपूर्वक असते. सध्या केवळ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्याच क्षेत्रात वाघ सोडण्याचे नियोजन आहे. हा भाग सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर येतो. विशेषतः चांदोलीच्या वसंतसागर आणि कोयना खोऱ्यातील शिवसागर जलाशयाच्या जंगली प्रदेशात सध्याचा वाघ्र प्रकल्प मोडतो. तो प्रदेश मुळात वाघांचाच होता. तेथे पूर्वी भरपूर वाघांचा वावर असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. कालांतराने शिकारी किंवा इतर कारणांनी वाघांची संख्या घटत गेली. अलीकडेच प्रकल्प क्षेत्रात तीन नर वाघ असल्याचे सिद्ध झाले. लोकांनी बाजी, सुभेदार व सेनापती अशी त्यांची नावेदेखील ठेवली आहेत..या नर वाघांसाठी तेथे मादीच नव्हती. त्यामुळे मादी आणल्यास संख्या वाढेल व पूर्वीच्या व्याघ्र प्रदेशानाला पुन्हा वैभव प्राप्त होईल, असा विचार केला गेला. तिकडे विदर्भात वाघांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याचे ठरले. याच उपक्रमाला वन खात्याने ‘ऑपरेशन तारा’ असे नाव दिले आहे. त्यासाठी आम्ही खूप कायदेशीर अभ्यास केला. राज्यापासून केंद्रापर्यंत विविध यंत्रणांकडून मान्यता मिळवल्या. अलीकडेच यातील पहिली चंदा नावाची वाघीण आम्ही सह्याद्री प्रकल्पात सुरक्षितपणे सोडली आहे. तिच्या सर्व हालचालींचा अभ्यास केला जात आहे. तिचे स्थलांतर यशस्वी झाल्याचे आढळल्यानंतर उर्वरित वाघ आणले जातील व ते याच प्रकल्पाच्या जंगलात सोडले जातील. मला हे सांगायचे आहे, की आमचा सुरक्षित व्याघ्र प्रकल्प वगळता इतरत्र कोणत्याही जंगलात किंवा डोंगरात कुठेही मोघमपणे वाघ सोडले जाणार नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गाने भीती बाळगण्याचे कारण नाही..Sahyadri Tiger Reserve: विदर्भातील ‘चंदा’ वाघीण सह्याद्री प्रकल्पात दाखल .पण या वाघांची संख्या भविष्यात वाढली आणि ते सध्याचा व्याघ्र प्रकल्प ओलांडून इतर भागांमध्ये घुसले तर?तसे होण्याची शक्यता वाटत नाही. कारण मुळात सध्याचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा जंगली भाग इतका विशाल आहे की किमान ५० वाघ सामावून घेण्याची क्षमता तयार झालेली आहे. तेथे भरपूर पाणवठे आहेत. मोठ्या प्रमाणात तृणभक्षक प्राणी आहेत. वाघांना असेच वातावरण हवे असते. अन्न-पाणी मिळवण्यात खूप अडचणी आल्याच तर समस्या येतात. मुळात, व्याघ्र प्रकल्पात काळजी घेतली जात असल्यामुळे वाघ त्यांचे भ्रमण मार्ग (कॉरिडॉर) निश्चित करतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सध्याचे वाघ डोंगररांगांमधील जंगलांमधून दक्षिणकडे म्हणजे कर्नाटक भागाकडे जात असतात. त्यांचा भ्रमण मार्ग कर्नाटककडे जात असून तो कोकणात किंवा उत्तरेकडील घाटमाथ्यांकडे जात नाही. मला ही बाब महत्त्वाची वाटते. कारण, महाराष्ट्र ते कर्नाटक अशा मधल्या सीमावर्ती डोंगरी भागातील सध्याची जंगले वाघांसाठी सुरक्षित आहेत. ते तिकडेच फिरणे पसंत करतात. त्यामुळे आमच्या प्रकल्पातील वाघ इतरत्र जाण्याची शक्यता वाटत नाही..वाघ बघणाऱ्यांची संख्या वाढेल, पण त्याचा त्या भागाला काय फायदा?हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. पर्यटक जेव्हा वाघ बघायला येतात; तेव्हा ते केवळ वाघाच्या संगोपनाला मदत करीत नसून त्या भागाच्या एकूण अर्थव्यवस्थेलाही चालना देतात. तुम्ही सह्याद्री वाघ्र प्रकल्पालगतच्या कोणत्याही डोंगरी भागात जा; तेथे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याचे तुम्हाला दिसून येईल. शेतकऱ्यांनाही पावसाळी पिके सोडून उदरनिर्वाहाचे साधन नाही. जर पर्यटकांची संख्या वाढली तर मी आत्मविश्वासाने सांगतो की तेथील जनजीवन सुखी होईल. पर्यटनाशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय तेथील शेतकऱ्यांना नाही, असे माझे मत आहे. सध्या आमच्याच प्रकल्पात बहुतेक कर्मचारी किंवा रोजंदारी कामगारदेखील स्थानिक शेतकरीच आहेत. .Sahyadri Farms: शेतकऱ्यांनी जाणले व्यावसायिक पीकपद्धत तंत्र .प्रकल्पामुळे त्यांच्या हाताला काम मिळाले आहे. आम्ही तेथे जाणीवपूर्वक पर्यटन संस्कृती वाढवत आहोत. कारण हेच आहे की स्थानिकांना रोजगार मिळाला; त्यांच्याही झोपड्यांमध्ये विकासाचा दिवा लागावा. वन विभागाच्या पुढाकारामुळे सह्याद्री वाघ्र प्रकल्प किंवा वन खात्याच्या इतर क्षेत्रालगतची गावे पर्यटनात खूप झपाट्याने पुढे जात आहेत. तेथील काही गावे तर महाराष्ट्राचे निसर्गसंपन्न काश्मीर खोरे म्हणून उदयाला येऊ लागली आहेत. पर्यटन वाढल्यास शासनाची स्थानिक वन व्यवस्थापन समित्यांची संकल्पना तेथे अधिक प्रभावी व फलद्रुप होईल. जंगलांचे व्यवस्थापन आणि संवर्धन हे स्थानिक समुदाय व वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमधूनच उत्तम पध्दतीने होऊ शकते, हे आता सिध्द झालेले आहे..स्थानिक मंडळींचा सहभाग वाढल्यास ‘’जागतिक नैसर्गिक वारसा स्थळा’’चा वारसा चांगल्या पध्दतीने जपला जाईल, असे वाटते. शेवटी वन विभागाने आपल्या कोणत्याही उपक्रमात- मग ते अभयारण्य असो की राखीव प्रकल्प असो- तेथील जैवविविधतेच्या रक्षणाबरोबरच स्थानिक लोकांसाठी उपजीविकेला पूरक ठरणारे धोरण ठेवलेले आहे. त्यामुळे सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा विकास म्हणजे केवळ वाघांची संख्यावाढ नसून कोयना खोऱ्यातील संपूर्ण पर्यटनाला चालना देणारी ही प्रक्रिया आहे. तेथील शेकडो गावांमधील स्थानिकांना, शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा चांगला पर्याय निर्माण करून देणारी ही एक निसर्ग चळवळ आहे, असेमी म्हणेन..सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या नेमकी कोणत्या कारणास्तव वाढवली जाते आहे?एक समजून घ्या, की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे केवळ वाघांचा प्रकल्प नाही. जैवविविधतेच्या दृष्टीने ते क्षेत्र महाराष्ट्राचे वैभव आहे. आपल्या पश्चिम घाटातील तो एकमेव व्याघ्र प्रकल्प असला तरी तेथील जैवविविधता अमूल्य आहे. त्यामुळेच तर २०१२ मध्ये या प्रकल्पाला युनेस्कोने ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळा’चा दर्जा दिला आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी किंवा निसर्गप्रेमीसाठी ही बाब खूप अभिमानाची आहे. बरं एकदा युनेस्कोने वारसा स्थळाचा दर्जा दिला म्हणजे तो कायमचा ठरत नाही. त्यांचे नियम सतत पाळावे लागतात. तशी काळजी घ्यावी लागते. वन खात्याचे कर्मचारी तेथे अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामुळेच अजूनही वारसा स्थळाचा दर्जा कायम राहिला आहे. हा प्रदेश १२ नद्यांचे उगमस्थान असून ते अनेक दुर्मिळ वनस्पती व पशुपक्ष्यांचे माहेरघर बनलेले आहे. .जंगले वाचली तर मानवी विकासाला पुरक ठरणारे पर्यावरण टिकणार आहे. कोणत्याही जंगलात वाघ असणे म्हणजे तेथील जंगल भूमी अतिसुरक्षित मानली जाते. वाघांमुळे कोयनेचे जंगल आणखी सुरक्षित होईल. दुसरे मला हे सांगायचे आहे, की वाघांची संख्या वाढल्यास सध्या विदर्भाकडे जाणारे पर्यटक अगदी जवळच्या जवळ टायगर सफारीचा आनंद घेऊ शकतील. विचार करा, आपल्या पुण्या, मुंबईचे किती तरी पर्यटक खास वाघ बघण्यासाठी मोठा खर्च करून विदर्भाकडे जातात. त्यांना याच भागात अगदी १००-१५० किलोमीटर टायगर सफारीची सुविधा मिळाल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे देशविदेशातून पर्यटकांचा ओघ सुरू होऊ शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.