डॉ. मिलिंद वाटवेबिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी दिसता क्षणी गोळ्या घालण्यापासून जंगलात शेळ्या सोडण्यापर्यंत उपायांची मांदियाळीच निर्माण झाली आहे आणि समस्या अधिक घातक की उपाय अशी स्पर्धा सुरू आहे. वन अधिकारी, वैज्ञानिक जोवर स्पष्ट भूमिका घेत नाहीत तोवर इतरांनी शेळ्या सोडण्यासारखी मुक्ताफळे उधळली तर त्यांना दोष देता येणार नाही. गेल्या पन्नास वर्षांतील तत्त्वांप्रमाणे वन्यजीव व्यवस्थापन यापुढे चालू ठेवता येणार नाही; शिकारीवर संपूर्ण बंदी व्यवहार्य नाही; उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना ठार करणं भाग आहे; पकडून किंवा नसबंदी करून समस्या मिटणार नाही हे बहुतेक वन अधिकारी, संशोधक खासगीमध्ये मान्य करतात, पण जाहीरपणे असं बोलायला कचरतात. निसर्ग-श्रद्धांमधून बाहेर पडून निसर्ग-वास्तवाला सामोरे जाण्याची मानसिकता जोपासण्याची गरज आहे..वाघ आणि बिबट्याच्या बातमीखेरीज वर्तमानपत्रांचे अंक निघत नाहीत, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली दिसते. समस्या खरीच आहे आणि गंभीरही. आताशा सोशल मिडियावर दिसणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत, की विनोद म्हणून कुणी टाकल्या आहेत, हे कळणं अवघड असतं. बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी जंगलात शेळ्या सोडण्याची घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केल्याची बातमी वाचून मी अशाच संभ्रमात पडलो. दिसता क्षणी गोळ्या घालण्यापासून जंगलात शेळ्या सोडण्यापर्यंत उपायांची मांदियाळीच निर्माण झाली आहे आणि समस्या अधिक घातक की उपाय अशी स्पर्धा सुरु आहे..Human Wildlife Conflict: दीर्घकालीन धोरणाने टळेल संघर्ष.कुणा एकावर दोषाचं खापर फोडावं अशी परिस्थिती नाही पण आत्मपरीक्षण करायचं झालं तर आजच्या समस्येमागे वन्यजीव संशोधकांचा दोष सर्वात मोठा आहे, असं मी मानतो. गेल्या काही दशकांमध्ये निसर्गप्रेमाची जाहीर अभिव्यक्ती वाढली आहे. दुर्दैवाने आपल्या निसर्गप्रेमाने निसर्गविज्ञानापेक्षा भोळसट निसर्गश्रद्धा जास्त वाढवल्या आहेत आणि वैज्ञानिकांनी त्यांचं निराकरण करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.‘निसर्गात नेहमीच संतुलन असतं आणि फक्त माणसामुळेच ते बिघडतं. माणसाला बाजूला केलं की ताबडतोब संतुलन प्रस्थापित होतं..प्राण्यांचा अधिवास माणसापेक्षा वेगळा आहे. प्राणी जंगलात राहतात आणि तिथे खायला मिळालं नाही तरच मनुष्यवस्तीत येतात. कुठलाही प्राणी निसर्गतः माणसावर हल्ला करीत नाही. प्राण्यांचा स्वभाव ठरलेला असतो आणि त्यात बदल होत नाही...’ असे अनेक समज विज्ञानाने पुष्टी न देताच पसरलेले आहेत आणि आपलं वन्यजीव व्यवस्थापन या अर्ध्या कच्च्या संकल्पनांवर आधारित आहे. समान हक्क, समान न्याय, भूतदया ही उच्च मानवी मूल्ये आहेत. पण ती निसर्गाची मूलभूत तत्वे नाहीत. जी तत्त्वे मानवी समाजाला लागू होतात ती जशीच्या तशी वन्यप्राणी व्यवस्थापनाला लागू करू पाहणे अनैसर्गिक आहे आणि त्यातून समस्या वाढणारच आहेत..Human Wildlife Conflict: उदंड झाली माकडे!.जनुकीय स्वार्थवास्तविक उत्क्रांतीविज्ञानाने हे पूर्वीच स्पष्ट केलं आहे, की एक प्रकारचा जनुकीय स्वार्थ सर्व जातींच्या वर्तनामागे असतो. जीवशास्त्रीय स्वार्थामधून निसर्गातली सगळी नाती निर्माण होतात. स्वार्थातूनच कधी कधी सहकार्य, कधी कधी संतुलन निर्माण होतं; पण संतुलन हा काही निसर्गाचा मूलभूत धर्म नाही. तसं असतं तर आजवर उत्क्रांत झालेल्या प्रजातींपैकी ९९ टक्क्यांहून अधिक नामशेष झाल्या नसत्या. काही परिस्थितीत काही कारणांनी निसर्गात संतुलित व्यवस्था निर्माण होते. पण ती एखाद्या निसर्गतःच निर्माण होणाऱ्या साथीच्या रोगाने बिघडूही शकते हे वास्तव निसर्ग अभ्यासकांना स्पष्ट दिसतं..तसेच प्राणी जंगलात राहतात आणि तिथे पुरेसे खायला मिळालं नाही तरच मनुष्य वस्तीत शिरतात, असा दुसरा भाबडा अवैज्ञानिक समज आहे. मुळात प्राण्यांचा अधिवास माणसापेक्षा वेगळा असतो, अशी भ्रामक समजूत अलीकडेच निर्माण झाली आहे. माणूस निसर्गातच उत्क्रांत झाला. आत्ता आतापर्यंत शेती आणि जंगले गळ्यात गळे घालूनच नांदत होती. नागरी वस्त्या आणि भूमीचे वेगळे उपयोग अलीकडेच वाढले. म्हणजे प्राण्यांपेक्षा वेगळे अधिवास माणसाने अलीकडेच निर्माण केले..Human Wildlife Conflict: बिबट्याला पकडण्याऐवजी जागीच ठार करा.त्यापुढे जाऊन वन्य प्राण्यांसाठी वेगळी अभयारण्ये निर्माण करण्याचा कालसापेक्ष निर्णय गेल्या शतकात अपरिहार्य म्हणून घ्यावा लागला. त्याने प्राण्यांचे अधिवास माणसापेक्षा वेगळे असतात या समजाला आणखी बळकटी मिळाली. पण वन्य प्राण्यांच्या कित्येक जाती माणसाच्या निकट सान्निध्यातच शतकानुशतके जगत आल्या आहेत. त्यात बिबट्या पण आहे. मनुष्य वस्तीच्या आसपासच, पण तरी माणसाशी समोरासमोर येणे टाळून कित्येक वन्य जाती शेकडो वर्षे जगत आल्या आहेत..माणसाची भीती संपलीमग आजच असं काय बदललं की मोठी गंभीर समस्या निर्माण झाली? या समस्येला मुख्यतः कारणीभूत असलेला बदल हा, की या प्राण्यांची माणसाबद्दलची भीती वेगाने नाहीशी होत आहे. आता ते माणसाला टाळत नाहीत. दिवसाढवळ्याही मनुष्य वस्तीत शिरू लागलेत. माणसाची भीती का होती तर माणूस हा शिकारी प्राणी होता म्हणून. आता पन्नास वर्षे म्हणजे प्राण्यांच्या डझनावारी पिढ्या शिकारमुक्त जगत असतील तर ही भीती का राहावी? जोवर माणसाची भीती असते तोवर माणसाच्या सान्निध्यातही ते बऱ्यापैकी संख्येने जगू शकतात. जर माणसाची भीती गेली आणि प्राणी दिवसा ढवळ्या माणसासमोर वावरू लागले तर प्राण्यांची थोडी संख्याही जास्त त्रासदायक होऊ शकते. प्राण्यांना वाटणारी माणसाची भीती हा माणूस आणि वन्यप्राणी यांच्या सहजीवनाचा प्रमुख आधार आहे..Human Wildlife Conflict: घाव समस्येच्या मुळावर!.प्राणी मुख्यत: जंगलात राहतात ते सुद्धा माणसाच्या भीतीमुळेच. नाहीतर पाणी आणि अन्नाचा पुरवठा बऱ्याचदा जंगलापेक्षा मनुष्यवस्तीच्या आसपासात जास्त असतो आणि वर्षभर असतो. आपण टाकलेल्या कचऱ्यातही प्राण्यांना खाण्याजोगं कितीतरी असतं. त्यामुळे जंगलात खायला मिळत नाही म्हणून ते मनुष्यवस्तीत येतात हे खरं नाही. जंगलात शेळ्या सोडण्याच्या कल्पनेमागे हाच गैरसमज आहे. तो चुकीचाच आहे. शेळ्या सोडून समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता नाही. अनेक बिबट्यांना आणि इतर प्राण्यांनाही मनुष्यवस्तीजवळ पकडून जंगलात सोडल्यावर ते आधीच्या जागी परत आले असं घडलं आहे. कारण तोच त्यांचा अधिवास आहे. माकडे, वानर, बिबटे, घारींसारखे पक्षी यांचा माणसाचे सान्निध्य हाही नैसर्गिक अधिवासच आहे. प्राण्यांनी जंगलात असावं अशी आपली आजची समजूत आहे. त्यांनी आपल्या समजुतीप्रमाणेच वागावं अशी सक्ती आपण कशी करणार?.संशोधक, वन अधिकाऱ्यांचा भ्याडपणामाझ्या मते वन्यजीव संशोधकांचा मुख्य दोष हा की त्यांनी हे वास्तव स्पष्टपणे मांडलं नाही. लोकांचे भाबडे गैरसमज तसेच राहू दिले. मी अनेक संशोधक, अनुभवी वन्यजीवप्रेमी तसेच वनखात्याच्या आजी-माजी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. गेल्या पन्नास वर्षांतील तत्त्वांप्रमाणे वन्यजीव व्यवस्थापन यापुढे चालू ठेवता येणार नाही; शिकारीवर संपूर्ण बंदी व्यवहार्य नाही; उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना ठार करणं भाग आहे; पकडून किंवा नसबंदी करून समस्या मिटणार नाही हे बहुतेक सर्व जण खासगीमध्ये मान्य करतात, पण जाहीरपणे असं बोलायला कचरतात. संशोधकांच्या, तज्ज्ञांच्या, वन अधिकाऱ्यांच्या अशा भ्याडपणातच सगळ्या समस्येचं मूळ सापडतं. वैज्ञानिक जोवर स्पष्ट भूमिका घेत नाहीत तोवर इतरांनी शेळ्या सोडण्यासारखी मुक्ताफळे उधळली तर मी त्यांना दोष देणार नाही..Human Wildlife Conflict: संशोधनाची विजेरी पेटवा....वन्यजीव संवर्धन हा सुयोग्य विज्ञानाधिष्ठित व्यवस्थापनाचा विषय आहे. माणसाला अभयारण्यातून बाहेर काढलं की अपोआप एक संतुलित व्यवस्था निर्माण होईल या संकल्पनेला आधीच तडा गेलेला आहे. ती अंधश्रद्धा आहे. विज्ञानमान्य संकल्पना नाही. पण अशी स्पष्ट मांडणी अजून वैज्ञानिकांनी केलेली नाही. माणूस शिकारी असणं हा माणूस-निसर्ग संबंधातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण म्हणून आजच्या परिस्थितीत सरसकट शिकार करा असं म्हणणं सुद्धा तितकंच भोळसट म्हणावं लागेल. आजच्या वस्तुस्थितीला धरून नियंत्रित शिकारीची व्यवस्था काळजीपूर्वक निर्माण करावी लागेल. हे वन्यजीव संशोधकांपुढचं खरंखुरं आव्हान आहे.अर्थात, या संशोधनाला वेळ लागेल..तोवर लोकांच्या जगण्याचं काय करायचं? तर जिथे समस्या गंभीर आहेत तिथे आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्वावर प्राण्यांना मारणे-पकडणे भागच आहे. हा कायमचा नाही पण आज तरी अत्यंत आवश्यक उपाय आहे. पण नक्की समस्या किती आणि कुठे कुठे आहे याचा तरी अभ्यास कुठे आहे? माणसे मारली तर फक्त आरडओरडा होतो. पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि सरकारकडे याचा विश्वसनीय डेटा सुद्धा नाही. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी असा कायदा आहे, पण तो फक्त कागदावरच. प्रत्यक्षात होण्याऱ्या नुकसानीच्या एक टक्का सुद्धा भरपाई दिली जात नाही..इथे निर्बीजीकरण इत्यादींचा उपयोग होणार नाही. पूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल. त्यासाठी कायदेही बदलावेच लागतील. आजचे कायदे १९७० च्या दशकातील आपत्ती व्यवस्थापनाला योग्य असे लिहिले होते. तेव्हा प्राण्यांचे नामशेष होणे ही आपत्ती होती. योग्य वेळी कायदे न बदलल्यामुळे आता उलट दिशेने आपत्ती व्यवस्थापनाची वेळ आली आहे. आपण कायम आपत्ती आल्यावरच जागे होणार का? आज आपल्याकडे अधिक चांगल्या दर्जाचं विज्ञान-तंत्रज्ञान आहे. निसर्ग-श्रद्धांमधून बाहेर पडून निसर्ग-वास्तवाला सामोरे जाण्याची मानसिकता वैज्ञानिकांनी जोपासण्याचीच काय ती गरज आहे. तसे झाल्यास योग्य उपाय सापडतीलच. milind.watve@gmail.com, (लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.