रवींद्र पालकर डॉ. उत्तम कदम डॉ. सखाराम आघावMonsoon Farming: लिंबूवर्गीय पिकांवरील लेमन बटरफ्लाय ही एक महत्त्वाची पर्णभक्षी कीड असून, तिचा सर्वाधिक प्रादुर्भाव पावसाळी कालावधीत आढळतो. या काळात अळ्या कोवळी पाने वेगाने कुरतडून झाडांची वाढ खुंटवतात. विशेषतः रोपवाटिका आणि नव्याने लागवड केलेल्या बागांमध्ये या किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या किडीची ओळख, जीवनक्रम आणि योग्य वेळी प्रभावी व्यवस्थापनाची माहिती आजच्या लेखात छायाचित्रांसह जाणून घेऊया..शास्त्रीय नाव : पॅपिलिओ डेमोलियस (Papilio demoleus)गण (Order) : लेपिडोप्टेरा (Lepidoptera)कुल (Family) : पॅपिलिओनिडी (Papilionidae)यजमान पिके व वनस्पती : लिंबूवर्गीय गटातील सर्व पिके, बेल, बोर, कढीपत्ता आणि बावची.किडीची नुकसानकारक अवस्था : अळी..White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे.किडीचे विशेष वर्तनया किडी मध्ये उत्कृष्ट छद्मावरण (Camouflage) क्षमता आढळते. अळीच्या पहिल्या ते चौथ्या अवस्थेत तिचा रंग व आकार पक्ष्यांच्या विष्ठेसारखा दिसतो. त्यामुळे भक्षक पक्षी व इतर शत्रू तिला निर्जीव वस्तू समजून दुर्लक्ष करतात. पाचव्या अवस्थेत अळीचा रंग हिरवा होऊन ती पोषक वनस्पतीच्या पानांसारखी दिसते. या छद्मावरणामुळे अळी सहजपणे पानांमध्ये लपून राहते. भक्षकांच्या नजरेतून बचाव करते. हे संरक्षणात्मक वर्तन तिच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढविण्यास मदत करते..किडीची ओळखअंडी अवस्था : अंडी फिकट पिवळसर, गोलाकार व गुळगुळीत असून, तळभाग किंचित चपटा असतो. उबवणीपूर्वी अंड्यांचा रंग राखाडीसर होऊन कवचावर तपकिरी रेषा दिसू लागतात. अंड्यांचा सरासरी व्यास सुमारे ०.९९ मि.मी. असतो..अळी अवस्था : नव्याने उबवलेली अळी फिकट तपकिरी ते काळपट तपकिरी असून तिचे स्वरूप पक्ष्यांच्या विष्ठेसारखे दिसते. त्यामुळे ती पानांवर सहजपणे लपून राहते. वाढीच्या पुढील अवस्थांमध्ये अळीचा रंग पिवळसर हिरवा ते हिरवा होतो. डोके फिकट हिरवे असून दुसऱ्या वक्षखंडावर डोळ्यांसारखे दोन ठळक ठिपके दिसतात. शरीराच्या मागील भागावर तपकिरी व पिवळसर पट्टे आढळतात. शेवटच्या खंडावर शिंगासारखी रचना दिसून येते. अवस्थानुसार अळीची लांबी ४ ते ४० मि.मी. असते..कोषावस्था : कोष पिवळसर हिरव्या किंवा फिकट तपकिरी असून डोक्याजवळ दोन शिंगासारखे उंचवटे दिसतात. प्रौढ फुलपाखरू बाहेर पडण्यापूर्वी कोष पारदर्शक होतो. कोशाची सरासरी लांबी ३०.२ मि.मी व रुंदी ९.८ मि.मी. असते..Brinjal Shoot and Fruit Borer: वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन.प्रौढ अवस्था (फुलपाखरू) : प्रौढ फुलपाखरू आकाराने मोठे व आकर्षक असते. डोके व वक्षभाग काळा असून त्यावर पिवळसर क्रीम रंगाच्या रेषा दिसतात. पंख काळ्या रंगाचे असून त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके व पट्टे आढळतात. मागील पंखांच्या कडेला निळसर व नारिंगी रंगाचे ठिपके दिसून येतात. नराच्या उदराचा शेवटचा भाग टोकदार, तर मादीचा तुलनेने गोलाकार असतो. प्रौढ फुलपाखराच्या पंखांचा विस्तार साधारणपणे ८९ ते ९१ मि.मी. इतका असतो..जीवनक्रममादी कोवळ्या पानांवर एकेकटी सुमारे ७० ते १८० अंडी घालते. अंड्यांतून २ ते ३ दिवसांत अळ्या बाहेर पडतात. अळीच्या पाच इन्स्टार अवस्था साधारणतः १५ ते १७ दिवसांत पूर्ण होतात. त्यानंतर अळी रेशमी धाग्यांच्या साह्याने झाडालाच चिकटून पूर्वकोषावस्थेत जाते. पूर्वकोषावस्था १ ते २ दिवसांची, तर कोषावस्था ९ ते १० दिवसांची असते. कोषातून बाहेर पडलेले नर प्रौढ फुलपाखरू ३ ते ४ दिवस, तर मादी ६ ते ७ दिवस जिवंत राहते. किडीचा संपूर्ण जीवनक्रम सुमारे ३३ ते ३९ दिवसांत पूर्ण होतो. वर्षभरात साधारण ४ ते ६ पिढ्या पूर्ण होतात. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पावसाळ्यात अधिक आढळतो..नुकसानीचे स्वरूपअळ्या कोवळी पाने खात खात पानांच्या मुख्य शिरेपर्यंत कुरतडतात. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास झाडांची संपूर्ण पाने खाल्ली जाऊन झाडे पर्णहीन होतात.किडीच्या विविध अवस्था व जीवनचक्रसुरुवातीच्या अवस्थेतीलतपकिरी ते काळपट तपकिरी अळी..व्यवस्थापनपर्यायी यजमान तणांचा नायनाट करावा.प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेत अळ्या हाताने वेचून गोळा कराव्यात व नष्ट कराव्यात.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, निमयुक्त कीटकनाशक ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पी.पी.एम.) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.अळ्यांची संख्या अधिक जाणवल्यास बॅसिलस थुरिंजिएन्सिस या जैविक कीटकनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..परजीवी मित्रकीटकट्रायकोग्रामा इव्हॅनेसन्स : अंडी परजीवी.टेलेनोमस प्रजाती : अंडी परजीवी.ब्रॅकिमेरिया प्रजाती : अळी परजीवी.प्टेरोलस प्रजाती : कोष परजीवी.शिफारशीत रासायनिक कीटकनाशक : क्विनालफॉस (२५ टक्के ई.सी.) ३ मि.ली. प्रति लिटर पाणी.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच.डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.