Innovative Farm Projects: कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने स्थानिक यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून, शुक्रवारपर्यंत (ता. १५) जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यासाठी सुमारे २०० कोटी तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी एकूण ३१ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी ५ कोटी ६९ लाख, बुलडाणा जिल्ह्यासाठी ५.४५ कोटी आणि वाशीम जिल्ह्यासाठी ५.६४ कोटी रुपयांचा समावेश आहे..वातावरणातील सतत बदल, अनिश्चित पर्जन्यमान, वाढते नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण तसेच शेतीतील घटती उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढविणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (२०१८ ते २०२४) यशस्वी अंमलबजावणीनंतर त्याच धर्तीवर नवीन कृषी समृद्धी योजना राबविण्यात येत आहे..Krishi Samruddhi Yojana: निधी न दिल्यास रोष.ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष आणि मापदंडांनुसार थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने २०२५-२६ पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत थेट आणि पारदर्शक पद्धतीने लाभ पोहोचविण्याचा उद्देश आहे. या योजनेसाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तब्बल २००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी २०० कोटी रुपये केवळ जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत..Krishi Samruddhi Yojana: कृषी समृद्धीतून बुलडाण्यात नवे पर्व.या नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या भौगोलिक, हवामान आणि कृषी परिस्थितीनुसार उपक्रम तयार करणे अपेक्षित आहे. या योजनांमध्ये जलसंधारण, सिंचन सुविधा विस्तार, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती प्रोत्साहन तसेच बाजारपेठ जोडणी यांसारख्या घटकांचा समावेश होणार आहे. कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरणास चालना देणे आणि मूल्य साखळी बळकट करणे हा आहे. तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेही या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हास्तरावर तयार होणाऱ्या या नावीन्यपूर्ण योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणार आहे..यंदाचा अनुभव कटू...!गेल्या हंगामात नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून जिल्हा कृषी विभागाने चिया सीड लागवडीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करून पेरणीसाठी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र, नंतर निधीच्या कारणाने हे बारगळले. चिया सीड या पिकाची काढणी आटोपली तरी प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. हा अनुभव पाहता आगामी वर्षात यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.