Gokul Chairman Election Controversy: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) अध्यक्ष निवडीच्या मुद्यावरुन सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर 'महायुती'नेदेखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'गोकुळ'वरील सत्तेसाठी सतेज पाटील यांच्याकडून भावनिकतेची ढाल केली जात असल्याचा टोला 'महायुती'ने लगावला आहे..गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ संचालक त्यांचे निवडून आले. त्याच पद्धतीने आमचे १२ संचालक मतदारांनी निवडून दिले. त्यामुळे साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल केवळ आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात सतेज पाटील यांनी राहू नये. एका जागेच्या फरकाने मिळालेला विजय म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व नव्हे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, अशी टीका 'महायुती'ने केली आहे..Gokul Chairman Election: 'गोकुळ'मधील संख्याबळ फिरवण्याची चर्चा, मग निवडणुका घ्यायच्या कशाला? सतेज पाटील यांचा सवाल.सतेज पाटील यांनी गोकुळमधील घडामोडींबाबत माध्यमांना पत्र लिहून साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हिताची आणि लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, जनसुराज्य आदी महायुतीतील पक्षांनी मिळून माध्यमांना एक संयुक्त पत्र लिहिले आहे..त्यांची भूमिका आम्ही वाचली. मात्र त्यांच्या या भावना लोकशाहीसाठी कमी आणि स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक असल्याचे जाणवले; आणि म्हणून लोकशाहीचा अर्थ केवळ आपल्या बाजूने मिळालेला कौल एवढाच नसतो, हे सांगण्यासाठीच आम्ही वस्तुस्थिती स्पष्ट करीत असल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. .Gokul Chairman Election: गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी १० नोव्हेंबरला सभा घेण्याचे न्यायालयाचे आदेश.गोकुळ निवडणुकीत विरोधी आघाडीला १३ जागा मिळालेल्या आहेत. अध्यक्ष निवड करण्यासाठी आम्ही कुणाचीही अडवणूक केलेली नाही. त्यांनी त्यांचा अध्यक्ष जरूर करावा. आमच्यावर विरोधकांची भूमिका सोपवलेली आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. .निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा त्यांना झाला, हे आम्ही मान्य करतो. पण त्यातून जिल्ह्याचा संपूर्ण राजकीय जनाधार बदलला, असा निष्कर्ष त्यांनी काढू नये. या काठावरच्या विजयाच्या आधारे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय प्रतिनिधित्व आपल्याकडेच असल्याचा दावा करणे म्हणजे उर्वरित मतदारांच्या कौलाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे..२५ संचालकांच्या मंडळात गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असल्याचा मुद्दा गोकुळच्या पोटनियमांमधून निर्माण झाला. हा नियम आम्ही निवडणुकीनंतर तयार केलेला नाही. आमचे १२ संचालक हे आमच्या मतदारांनी आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले आहेत. त्यामुळे केवळ दुसऱ्या बाजूची गणपूर्ती पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यास सांगण्यासारखे असल्याचे 'महायुती'चे म्हणणे आहे..तसेच, शशिकांत पाटील- चुयेकर यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांकडून निवडणुकीपूर्वीच घोषणा झाली होती. तरीही जनतेने महायुतीला १२ जागांवर कौल दिला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला कोणाचा वैयक्तिक विरोध हा आमचा मुद्दा नसून, आमच्या मतदारांनी दिलेल्या कौलाशी प्रामाणिक राहणे ही आमची भूमिका आहे. .आम्हालाही अध्यक्ष निवडताना गणपूर्तीसाठी केवळ दोन संचालकांची आवश्यकता आहे. मग सतेज पाटील त्यांच्या बाजूचे दोन संचालक आम्हाला देऊन आमच्या अध्यक्ष निवडीसाठी आणि गोकुळचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करतील का? ते असे सहकार्य करणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मग केवळ पेच तयार झाला आहे म्हणून स्वतःच्या सोयीसाठी आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करायची आणि त्यासाठी भावनिक आवाहने करायची, हा कोणता न्याय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. .नियम दोन्ही बाजूंना समान असले पाहिजेत. शेवटी गणपूर्ती, अध्यक्ष निवड आणि अन्य कायदेशीर प्रश्नांचा निर्णय कायदा व संस्थेच्या पोटनियमांनुसारच झाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे आणि आम्ही त्याच मार्गाने आमची भूमिका मांडत राहू, असे त्यांनी म्हटले आहे..हे पत्रक कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जारी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.