Onion Crop Planning: खानदेशात आगाप खरीप कांदा लागवडीच्या तयारीला वेग आला असून तापी, गिरणा आणि अनेर पट्ट्यात कांदा रोपवाटिका निर्मिती सुरू झाली आहे. मात्र यंदा खरीप कांदा लागवड काहीशी घटण्याची किंवा स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..खानदेशात यंदा खरीप कांद्याची लागवड सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी उन्हाळ कांद्याची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टर, तर धुळे जिल्ह्यात जवळपास २० हजार हेक्टरवर झाली होती. त्या तुलनेत खरीप कांदा क्षेत्र कमी राहण्याची चिन्हे आहेत..Onion Nursery: कांदा रोपवाटिका बहरल्या, रोपांना मागणी.जलसाठा उपलब्ध असलेल्या भागांत कांदा लागवड स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र दुष्काळप्रवण पट्ट्यात लागवड घटण्याचा अंदाज आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी सावध भूमिका घेत आहेत. धुळे आणि शिंदखेडा भागात कांदा लागवड कमी होण्याची शक्यता असली, तरी साक्री तालुक्यात लागवड स्थिर राहण्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यात खरीप कांद्याची लागवड साधारण सात ते आठ हजार हेक्टरवर केली जाते. त्यापैकी एकट्या साक्री तालुक्यातच तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र असते..जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, चाळीसगाव, धरणगाव आणि जामनेर परिसरात कांदा लागवड स्थिर राहू शकते. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर आणि नंदुरबार भागात लागवडीत विशेष वाढ अपेक्षित नाही..सध्या कांद्याचे दर अस्थिर असले, तरी काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे कापूस पिकात नुकसान होत असल्याने काही शेतकरी कापूस क्षेत्र कमी करून कांद्याकडे वळण्याची तयारी करत आहेत..Onion Nursery Preparation: खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी.कांदा लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी केले असून, काहींनी स्थानिक पातळीवर इतर शेतकऱ्यांकडूनही बियाणे घेतले आहे. यंदा कांदा रोपांचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या रोपवाटिका तयार करण्यावर भर दिला आहे. काही भागांत व्यावसायिक रोपवाटिकांची निर्मितीही सुरू असून, त्यातील रोपांची विक्री केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा भागात या आठवड्यापासून कांदा रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यंदा खानदेशात किमान १५० हेक्टरवर कांदा रोपवाटिका राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..पावसापूर्वी बी पेरणीवर भरपावसाळा सुरू झाल्यानंतर रोपवाटिका तयार केल्यास अतिवृष्टी किंवा अनियमित पावसामुळे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे अनेक शेतकरी याच आठवड्यात रोपवाटिकांमध्ये बियाणे पेरणीचे नियोजन करत आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी रोपे चांगली तयार झाल्यास कमी-अधिक पावसात नुकसान कमी होते आणि आगाप लागवड करणे शक्य होते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या ठिबक आणि मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने रोपवाटिकांना सिंचन केले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.