Pune News: खरीप २०२५ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून, जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल. परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिलही उजाडू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली..राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीकविमा योजना राबवली. सुधारित योजनेत पेरणीच न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे..Crop Insurance Compensation: गतवर्षीची पीकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग .खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली आहे. तांत्रिक उत्पादकतेचीही माहिती दिली आहे. म्हणजेच खरिपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना देय विमा भरपाईची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले..२४०० कोटींचा हप्ताविमा योजनेत बदल झाल्याने यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला. यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना २४०० कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे. कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे. विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले..Crop Insurance Compensation: ‘कमाल’ शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई.कापूस, तुरीचा विमा कधी?जानेवारीत सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्यासह इतर खरीप पिकांची विमा भरपाई जानेवारीत मिळेल. मात्र कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रयोग पूर्ण होतील. त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली..धाराशिवमध्ये कंपनीचा आक्षेपधाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता तांत्रिक उत्पादकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे, तसेच पीक कापणी प्रयोग चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचा आक्षेप घेत विमा कंपनीने अपील केले आहे. या अपिलावर केंद्राच्या पातळीवरच तोडगा निघण्याची शक्यता आहे..हेक्टरी १७५०० रुपये भरपाई मिळणार का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार ५०० रुपये विमा भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत. मंडल पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडल पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे. त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची चिन्हे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.