Forest Life: प्रसंग पहिला... वेळ भरदुपारची. पुण्याच्या घाटमाथ्यातून कोकणात उतरणाऱ्या थिपथिप्या घाटासमोरील पूर्वेच्या दाट जंगलात गायीगुरे थोडी भीतभीतच चरत होती. एका मोठ्या धोंड्याच्या कडेला कान्हू बसलेला. सकाळपासून गुरे वळण्याचे काम केल्याने त्याला झपकन डोळा लागला. या सर्वांवर नजर होती ती बिबट्याची! त्याने संधी साधून थेट एका गायीवर झेप घेतली. मात्र, गायीचा गळा धरणे चुकले आणि बिबट्या गायीच्या पाठीवर स्वार होत शिकारीसाठी झटापट करू लागला. .त्यामुळे गुरे उधळली. गाय हंबरली आणि कान्हू जागा झाला. त्याने जवळच्या काठीसह बिबट्यावर झेप घेत एक जोराचा सणसणीत सपाटा बिबट्याला दिला. मार खाऊन बिबट्या पळून गेला. कान्हू दिवसभर जनावरे चालून सायंकाळी घरी परतला. त्याने पत्नी कोंडाबाईला ही घटना सांगितली. तिला त्यात काही आश्चर्य वाटले नाही. कारण, असे प्रकार संसारात अनेकदा घडले होते..Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा.प्रसंग दुसरा... वेळ मध्यरात्रीची. झोपडीत एका बाजूला कान्हू गाढ झोपलेला. सावध झोप असलेल्या कोंडाबाईच्या जमिनीला लागलेल्या कानाला कंप जाणवू लागला. ही हालचाल नेहमीच्या जनावराची नसल्याचे तिला कळले. तिने डोळे उघडताच समोर झोपडीत घुसून चुल्हीजवळ झोपलेल्या वाघ्या कुत्र्याला बिबट्या ओढून नेत असल्याचे दिसले. कोंडाबाई घाबरली नाही. तिने पटकन कान्हूला उठवले. तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याला पिकात ओढून नेले होते. कान्हू विजेच्या चपळाईने धावला. त्याने अंधारात बिबट्यावर दगडांचा मारा केला. भला मोठा बिबट्या हतबल झाला आणि त्याने कुत्र्याला सोडून पळ काढला. मग कान्हूने जखमी कुत्र्याला पुन्हा झोपडीत आणले.. कान्हू आणि कोंडाबाईच्या संसाराचा बिबट्या हा अविभाज्य भाग आहे. गेल्या ४०-५० वर्षांपासून दोघेही बिबटे, लांडगे, जंगली कुत्रे, अजगर, सर्प यांना तोंड देत छान संसार करीत आहेत. लवासा भागातून ताम्हिणीकडे जाणाऱ्या कशेडी भागातील जंगलात नऊ पिढ्यांपासून राहणाऱ्या ढेबेंची वस्ती आहे. त्यातील आठव्या पिढीतील जानू ढेबेंचा मुलगा कान्हू हा याच जंगलात वाढला. शिवकाळातील देवता वरदायिनी, जननी मातेचा भक्त असलेला कान्हू शौर्यवान असला तरी तो एक कष्टाळू शेतकरी आणि पशुपालक आहे..Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक .तर, कोंडाबाई म्हणजे समोरच्या जंगलातून दोन तास चालत गेल्यावर लागणाऱ्या भोरदेव डोंगरातील शेतकरी नागू धाकलू मरगाळे यांची झुंजार कन्या. कान्हू आणि कोंडा दोघेही शाळेत गेले नाहीत. पण, जंगलातच त्यांनी जीवनाची छान शाळा भरवली. ‘‘मी बारा वर्षांचा असताना आमचे लग्न लागले. तेव्हा लग्न लहानपणी लागत आणि नवरी मात्र माहेरीच राही. ती मोठी झाली की मग सासरी येई. माझे वडील व कोंडाचे वडील डोंगरी मित्र होते. त्यांनीच आमचे लग्न जुळवून दिले. आमच्या पिढ्यांनी मुलीला धन मानले होते. त्यामुळे आम्ही मुलीला हुंडा देत असू. माझ्या वडिलांनीसुद्धा कोंडाबाईच्या वडिलांना १६०० रुपये हुंडा दिला आणि मग आमचं लग्न लागलं.’’.वाघ्या कुत्र्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत कान्हू आपल्या जीवनाची कहाणी सांगत होता. कान्हूबाई म्हणाल्या, ‘‘डोंगरात पाणी नव्हते. त्यामुळे वऱ्हाडी आणि माहेरच्या डोंगरातील खोल भागातून डोक्यावर पाणी वाहून आणले. त्यानंतर लग्नाचा वरण, भाताचा सैपाक बनवला. लग्नाला १२ गावातील ५०० माणूस जेवला. मला पहिली मुलगी सीताबाई झाली. मग पांडुरंग, सुमन, पूर्वा, प्रकाश झाले..माझी सारी बाळंतपणं याच जंगलात सासू बबाबाईंनी केली. आम्ही वाघ, कोल्हे, गवे, डुकरे, सापांना तोंड देत नाचणी, वरी, भात,ज्वारीची शेती करून मुले वाढवली. इथले बिबटे खोडकर आहेत. त्यांना बऱ्याचवेळा नवऱ्याने बदडून काढले आहे. इतक्या वर्षांनंतर त्यांच्या खोड्या आता आम्हाला सवयीच्या झाल्या आहेत. बिबटे सतत मार खातात आणि पुन्हा आम्हाला त्रास देतात. पण, त्यांनी आम्हाला कधीही इजा केली नाही. आम्हीसुद्धा त्यांना कधीच घाबरलो नाही.’’.कान्हू आणि कोंडाबाईला चूल पेटवण्यासाठी रॉकेल हवे असल्यास ते आणायला पानशेतला जावे लागत असे. त्यासाठी पूर्ण १२ ते १४ तास चालावे लागे. या झुंजार वनजोडीने लाख संकटे झेलत मुलींची लग्न केली. पांडुरंग व प्रकाश यांना शिकवले. मुलांनी आता पुण्यात ‘कार वॉशिंग सेंटर’ काढले आहे. जंगल आता कायमचे सोडून शहरात जाण्याइतपत पैसा या कुटुंबाकडे आला आहे. मात्र, कान्हू आणि कोंडाबाईचा जीव याच जंगलात घुटमळत असतो. ते तेथेच अजूनही शेती करून जगत आहेत. त्यांची गुणवान मुले वेळ काढून स्वतःच या जंगलात जातात आणि आईबाबांच्या शेतीतला औत धरतात.(प्रकाश कान्हू ढेबे ७६२०२०६४२१).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.