शिवाजी काकडेHolistic Education and Student Development: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी व्यक्तीजीवन आणि आनंद याविषयी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट अशी. फ्रान्समध्ये एक फार मोठा विनोदी नट होता. तो शहरातल्या संपूर्ण लोकांना थिएटरमध्ये हसवत असे. तो एका डॉक्टरकडे गेला व म्हणाला, ‘‘माझ्याजवळ पैसा आहे, इतर सर्व गोष्टी आहेत पण मनःशांती नाही. मनःस्वास्थ्य नाही यासाठी मी काय करू?’’ मानसशास्त्रज्ञ असलेला डॉक्टर म्हणाला, ‘‘तू अमुक अमुक एका थिएटरमध्ये जा. तिथे एक नट फार सुंदर कार्यक्रम करतो. तो बघ म्हणजे तुला मनःशांती मिळेल.’’ त्यावर तो नट म्हणाला, ‘‘जो सर्व लोकांना नेहमी हसवतो तो नट मीच आहे.’’ मला मनःशांती नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे..ही गोष्ट आनंदाच्या बाह्य आणि आंतरिक स्वरूपातील फरक सांगते. मनःशांती हा आतून स्फुरलेला, स्रवणारा झरा आहे. आज शाळा, कॉलेजांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. भौतिक सुविधा क्षणात मिळू लागल्या. मात्र, या सगळ्यामुळे प्रेम, शांती, आनंद वाढला का? हा खरा प्रश्न आहे. विविध शालेय कार्यक्रमात नृत्यावर थिरकणारे विद्यार्थी, लग्नसमारंभ आणि उत्सवांत डिजेच्या तालावर जल्लोष करणारा समाज आपण पाहतो. पण हा बाह्य उत्साह म्हणजे अंतःकरणातील आनंद आहे का?.आनंददायी शनिवारतीव्र महत्वाकांक्षा, अघोरी स्पर्धा, अभ्यास आणि परीक्षेचा ताणतणाव मुलांना लहानपणीच विकृत बनवत आहे. लहान वयातच मुलांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य अशा मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. शिकण्याची प्रक्रिया ही मूलतः जिज्ञासेची आणि आनंदाची प्रकिया आहे. विद्यार्थ्यांचे शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक, आणि रंजक व्हावे, मुलांचे अध्ययनाचे ओझे कमी व्हावे यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणात ‘दहा दिवस दप्तराविना शाळा’, ‘आनंददायी शनिवार’ यांसारख्या उपक्रमांची आखणी केली आहे..Education System : शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारून पुढे जावे लागेल.आनंददायी शिक्षण म्हणजे गाण्याच्या तालावर थिरकणे, इव्हेन्ट मॅनेजमेंट करून मोठमोठ्या गॅदरिंग घेणे, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करून त्याचे फोटो, व्हिडीओ, रील्स प्रसारीत करणे इतकाच मर्यादित होऊ नये. उत्सव आवश्यक आहेच. कला, संगीत आणि नृत्य हेही शिक्षणाचे महत्त्वाचे घटक आहेत. पण त्यालाच आनंददायी शिक्षण मानणे योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची आंतरिक ओढ निर्माण करणे, जिज्ञासा जागवणे आणि ज्ञानाच्या शोधाचा आनंद मिळवून देणे हे शिक्षकाचे खरे काम आहे..आनंददायी शिक्षणासाठीशिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मूल जन्मापासूनच आपल्या भोवतालच्या जगाचे निरीक्षण करत असते, प्रश्न विचारते, प्रयोग करते आणि अनुभवातून शिकते. शिक्षण व्यवस्थेचे काम या नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक समृद्ध करणे आहे. या प्रक्रियेत भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इंग्रजी भाषा माध्यमामुळे देखील नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. मुलांची घरातील भाषा आणि शाळेतील शिक्षणाची भाषा यांच्यातील दरी वाढली तर शिकण्याची प्रक्रिया अधिक कष्टप्रद होते. मातृभाषा ही केवळ संवादाची भाषा नसून ज्ञानाशी नाते जोडणारे प्रभावी माध्यम आहे. आनंददायी शिक्षणास मातृभाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र केवळ मराठी माध्यमात शिकल्यामुळे शिक्षण आपोआप आनंददायी होते असेही नाही..भाषा विषय केवळ गुणांसाठी न शिकवता तालासुरात, मधुर श्रवणीय आवाजात कविता ऐकणे, म्हणणे हे आनंददायी असते. उत्तम वाचक म्हणून विकसित झालेला विद्यार्थी तासनतास वाचनाचा आनंद घेतो. नाट्यीकरण, भूमिकाभिनय, सृजनशील लेखन, स्व-अभिव्यक्ती ही आनंददायी असते. गणित शिकताना फळ्यावर इष्टिकाचितीचे घनफळ काढण्यापेक्षा वर्गात प्रत्यक्ष वीट दाखवून तिचे घनफळ काढणे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असते..प्रत्यक्ष अनुभव, व्यवहार, क्षेत्रफळ, मापन करून गणित शिकवले तर ते शिकणे आनंददायी होऊन जाते. पर्यावरण शिक्षण चार भिंतीच्या सीमा तोडून जेव्हा प्रत्यक्षात उद्यानात, शेतात आणि निसर्गाच्या सांनिध्यात घडून मुले निरीक्षण करतील, जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारतील, तेव्हा ते शिकणे आनंददायी होईल. विज्ञान शिक्षणाकडे तर व्यवस्थेचे फारच दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रातील किती शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा आहेत, हा एक संशोधनाचा विषय आहे..Agricultural Education: एक स्वप्नवत प्रवास....प्रत्यक्ष अनुभव, कृती, प्रयोग यातून शिकणे मुलांसाठी आनंददायी असते. यातून मुलांमध्ये चिकित्सक व तर्कसंगत विचार, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होतो. मात्र, विज्ञानाचे प्रयोग करण्याची संधीच मुलांना मिळत नाही. कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांकडे देखील शालेय शिक्षणात दुर्लक्ष केले जाते. या विषयांतील प्रात्यक्षिक कार्यामुळे बालकांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. मुलांमध्ये कल्पनाशक्ती, सौंदर्यदृष्टी व सर्जनशीलतेचा विकास होतो..सध्या कोणताही प्रश्न निर्माण झाला की त्यावर उपक्रमांचा उतारा दिला जातो. आनंददायी शिक्षणासाठी स्वतंत्र तासिकांचे नियोजन करण्यापेक्षा रोजचे शिकणे घोकंपट्टीवर भर न देता प्रत्यक्ष अनुभवावर, कृती, खेळ, चर्चा, संवाद आणि मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांच्या शिकण्याला प्रोत्साहन देणारे असेल तर एकंदरीत शिकणंच आनंददायी होते. केवळ हसणे, नृत्य करणे म्हणजे आनंद नव्हे..तासनतास वाचन करणारा विद्यार्थी, अवघड गणित सोडवण्यात रमणारा विद्यार्थी किंवा एखाद्या प्रश्नाचा उत्तराच्या शोधात दिवस रात्र प्रयोग करणारा संशोधकही आनंदाचा अनुभव घेत असतो. निसर्गावर, प्राण्यांवर आणि माणसांवर अकारण प्रेम करणाऱ्या संवेदनशील व्यक्तीलाही आनंद मिळतो. केवळ हसणे म्हणजे आनंद नव्हे, तर जीवनातील अर्थ, जिज्ञासा, सर्जनशीलता, प्रेम आणि ज्ञानाचा शोधातून मिळणारी अंतःप्रेरणा म्हणजेही आनंद आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास न करता विद्यार्जनासाठी शिकतील तेव्हाच शिक्षण आनंददायी होईल. केवळ बाह्य उत्साह आणि मनोरंजन म्हणजे आनंद नव्हे. आनंदाची खरी अनुभूती अंतर्मनातून निर्माण होते..शिक्षकही आनंदी असावेआज शिक्षक एसआरआय, जनगणना, विविध शैक्षणिक ॲप्स, ऑनलाइन, ऑफलाइन प्रशिक्षणे, फोटो, व्हिडीओ, लिंक्स आणि असंख्य कामाच्या आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला आहे. अध्ययन - अध्यापन प्रक्रियेपेक्षा शिक्षक डेटा सेंटर म्हणून माहिती गोळा करण्याचे काम अधिक करू लागल्याने शिक्षक शाळाबाह्य होऊ लागले. ‘‘आम्हाला शिकवू दया’’, म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. दररोज वरतून येणाऱ्या उपक्रमांच्या पत्रांमुळे शिक्षकांची सृजनशीलता संपली. ज्या कुटुंबात कलह असतात त्या कुटुंबातील मुलांच्या भावविश्वावर परिणाम होतो. तसेच ज्या देशाच्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षक आनंदी नाही तेथील विद्यार्थी, समाज आणि राष्ट्र कसे आनंदी असू शकेल?: ७८८७५४५५५७(लेखक शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.