सुनिल चावकेPolitical Instability: जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी मंगळवारी होत असलेली निवडणूक ही एकतर्फी भासत असली तरी मतांचे अंतर तोकडे असल्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष- राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गाफील राहता येणार नाही, हे स्पष्ट आहे. सारे काही सुरळीत पार पडले, तर भाजप-रालोआचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सव्वाचारशेपेक्षा अधिक मते मिळवून सहज जिंकू शकतात. पण त्यासाठी मोदी सरकारला सर्व आघाड्यांवर शेवटचे मत पडेपर्यंत जागरूक राहावे लागणार आहे..रालोआच्या मित्रपक्षांचे लोकसभेत ५३ आणि राज्यसभेत २८ खासदार आहेत. या पक्षांची भूमिका, सत्ताधारी भाजपच्या खासदारांची कथित नाराजी, या निवडणुकीचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाशी असलेला अप्रत्यक्ष संबंध, त्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेतृत्वादरम्यान सुरू असलेली कथित रस्सीखेच, उपराष्ट्रपतिपदासाठीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दक्षिणेकडील असल्यामुळे तेथील खासदारांच्या मनात सुरु असलेली चलबिचल, ऑगस्ट महिन्यात ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’च्या सचिवपदाच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ‘व्हीप’ झुगारून भाजप खासदारांनी केलेले क्रॉसव्होटिंग, असे अनेक पैलू या निवडणुकीच्या निमित्ताने समोर येत आहेत. त्यामुळेच मोदी सरकारला गाफील राहून चालणार नाही..जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा स्वेच्छेने दिलेला नाही, तर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले, अशी दिल्लीतील राजकीय वर्तुळाची धारणा बनली आहे. धनखड यांच्या जागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये तरुण वयातच सक्रिय झालेले चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदी वर्णी लावायची आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपल्या पसंतीच्या नेत्याची नियुक्ती करायची, अशी तडजोड संघ-भाजपमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीत झाली असावी, असेही म्हटले जात आहे. संसदेत जेमतेम संख्याबळ असताना धनखड यांचा राजीनामा स्वीकारून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा धाडसी निर्णय अंगलट तर येणार नाही, ही शंका निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत दूर होणार नाही..Indian Politics: स्थैर्याची कसोटी पाहणारा ‘सप्टेंबर’.संशयाचे वातावरणया निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजप-रालोआ खासदारांसाठी आयोजित प्रीतिभोजन रद्द करण्यात आले. त्यासाठी पंजाबवर ओढवलेल्या महापुराचे आपत्तीचे कारण दिले गेले, मात्र या मुळाशी भाजपमधील नाराज खासदारांनी पाठ फिरवली तर काय, ही चर्चा आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी संघाच्या पसंतीचे राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करूनही भाजप अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे संघ-भाजपमधील कथित रस्सीखेच संपलेली नसतानाच भाजप-रालोआमध्येही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे..पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रातील तसेच राज्यांतील मंत्र्यांना अटक होऊन त्यांना तीस दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागल्यास एकतिसाव्या दिवशी त्यांना पदावरून आपोआप हटविण्याची तरतूद असलेले १३० वे घटनादुरुस्ती विधेयक आणल्यामुळे भाजपचे मित्रपक्ष सावध आणि नाराज झाले आहेत. अमित शहा यांनी आणलेल्या या विधेयकाचेही सावट उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे..इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यामुळे तेलुगू अस्मितेच्या मुद्यावरून तसेच १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या परिस्थितीचा राजकीय लाभ घेण्यासाठी पडद्यामागून भाजपसोबत कठोर वाटाघाटी चालविल्याची चर्चा आहे. राधाकृष्णन तमीळ असले तरी त्यांना विचारधारेच्या मुद्यावरून तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या खासदारांची मते मिळणार नाहीत. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असले तरी विरोधकांची मते त्यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय, राधाकृष्णन हे संघ-भाजपचे कर्मठ नेते असले तरी त्यांचे प्रतिस्पर्धी सुदर्शन रेड्डी हे दिवंगत भाजपनेते मनोहर पर्रीकर यांचे विश्वासू होते..Indian Politics: मित्रपक्षांच्या पथ्यावर पडणारे आंदोलन .संसदेच्या दोन्ही सभागृहांचे ७८२ सदस्य निवडणुकीतील मतदार आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी लागणारा जादुई आकडा ३९२ मतांचा असेल. जम्मू आणि काश्मीरच्या राज्यसभेतील सर्व चारही जागांसाठी निवडणूक झालेली नसल्याने लोकसभेतील खासदारांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल. लोकसभेतील २९३ आणि राज्यसभेतील १३० असे एकूण ४२३ खासदारांचे जिंकण्यासाठीचे संख्याबळ मोदी सरकारपाशी आहे. शिवाय विरोधकांची मते फोडण्याच्या प्रयत्नांमध्ये मोदी सरकार कुठलीही कसर सोडणार नाही..उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खासदारांनी आपले मत वाया जाणार नाही, अशा पद्धतीने मतदान करणे अपेक्षित असते. पण या निवडणुकीलाही अवैध मतांच्या समस्येने ग्रासले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या ३९२ मतांपेक्षा केवळ ३१ मते जास्त असलेल्या भाजप-रालोआला सत्ताधारी खासदारांची मते बाद ठरणे परवडणार नाही. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून गुप्त मतदान केले जाते. पक्षांचा व्हीप चालत नाही. त्यामुळे या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ची भीती असते. ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’च्या निवडणुकीत अमित शहा यांचे समर्थन लाभलेले संजीव बालियान यांच्याविरुद्ध लढताना भाजपचेच खासदार असूनही राजीव प्रताप रुडी बंडखोर ठरले..गुप्त मतदान पद्धतीच्या या निवडणुकीत रुडी यांना भाजपमधील असंतुष्ट खासदार, उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांतील भाजपच्या राजपूत समाजाच्या खासदारांनी मतदान केल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत अमित शहांचा अलिखित व्हीप कोणकोणत्या भाजप खासदारांनी झुगारला हे समजण्यास मार्ग नाही. या नाराज खासदारांनी क्रॉस व्होटिंग किंवा अवैध मतदान केल्यास राधाकृष्णन-रेड्डी यांच्यात एकतर्फी वाटणारी लढत अटीतटीची ठरू शकते. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेमुळे कागदावर एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीने उत्कंठा निर्माण केली आहे..‘इंडिया आघाडी’ने त्यांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी दाखविलेली राजकीय सक्रियतेपेक्षा सी. पी. राधाकृष्णन यांच्यासाठी मोदी सरकारची सजगता निर्णायक ठरणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडविला. केंद्राच्या राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटून राजकीय अस्थैर्य आणि अनिश्चिततेची मालिका सुरू झाली. ९ सप्टेंबर रोजी राधाकृष्णन यांच्या विजयाने मोदी सरकारची कोंडी करू पाहणाऱ्या राजकीय संकटांच्या मालिकेला विराम लागेल की ती नव्याने सुरू होईल, याचे उत्तर उपराष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत मिळणार आहे.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.