अमोल साळेFake News: पूर्वी ज्ञान मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. पण आज एका क्लिकवर माहितीचा महापूर उपलब्ध आहे. दुर्दैवाने, या महापुरात पोषक माहिती कमी आणि चटकदार पण खोटी माहिती जास्त आहे. ज्याप्रमाणे खराब अन्न शरीराला घातक असते, तसेच चुकीची माहिती आणि माहितीचा अतिरेक यामुळे आपला समाज ‘वैचारिकदृष्ट्या आजारी’ पडत आहे. आज खरी आणि महत्त्वाची माहिती या खोट्या बातम्यांच्या ढगाखाली पूर्णपणे हरवून गेली आहे..जुलै २०१८ ची एक गोष्ट आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा नावाच्या एका छोट्या गावात पाच अनोळखी माणसे आली होती. त्याच काळात व्हॉट्सॲपवर ‘मुले पळवणारी टोळी आली आहे’ असे खोटे व्हिडिओ आणि मेसेज खूप फिरत होते. गावातील लोकांनी त्या पाचही जणांकडे संशयाने पाहिले आणि काहीही विचार न करता जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. यात त्या पाचही निष्पाप लोकांचा जीव गेला. नंतर समजले, की ते बिचारे फक्त भिक्षुकी करून जगणारे लोक होते आणि त्या बातम्या पूर्णपणे खोट्या होत्या. एका खोट्या मेसेजमुळे पाच जणांचा बळी गेला..ही घटना आपल्याला सांगते, की आजच्या काळात अफवा किती भयानक असू शकतात. आज भारतात ४० कोटींहून जास्त लोक व्हॉट्सॲप वापरतात. हे माध्यम सोईचे असले, तरी त्यावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या आज एक मोठे संकट बनल्या आहेत..अन्नाचा अतिरेकमाणसाच्या इतिहासात एक काळ असा होता, की लोक अन्नाच्या कमतरतेमुळे किंवा भुकेमुळे मरायचे. पण आज काळ बदलला आहे. आता लोक अन्नाच्या कमतरतेपेक्षा ‘अतिसेवन’ आणि ‘चुकीचे अन्न’ खाल्ल्यामुळे होणाऱ्या, जीवनशैलीजन्य आजारांनी (उदा. मधुमेह किंवा हृदयविकार) अधिक मरत आहेत. अर्थात, आज उपलब्ध असलेले सर्वच अन्न ‘जंक’ किंवा खराब आहे असे नाही, परंतु चविष्ट आणि चटपटीत, पण आरोग्याला अपायकारक अन्न आज मोठ्या प्रमाणात आणि सहज उपलब्ध आहे..Digital Literacy: यू-ट्यूबर विरुद्ध अंतराळवीर : बदललेली स्वप्ने .माहितीच्या बाबतीतही आज असेच झाले आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. पण आज एका क्लिकवर माहितीचा महापूर उपलब्ध आहे. दुर्दैवाने, या महापुरात पोषक माहिती कमी आणि चटकदार पण खोटी माहिती जास्त आहे. ज्याप्रमाणे खराब अन्न शरीराला घातक असते, तसेच चुकीची माहिती आणि माहितीचा अतिरेक यामुळे आपला समाज ‘वैचारिकदृष्ट्या आजारी’ पडत आहे. आज खरी आणि महत्त्वाची माहिती या खोट्या बातम्यांच्या ढगाखाली पूर्णपणे हरवून गेली आहे..स्वप्न शिक्षणाचे, वास्तव अफवांचेभारतात जेव्हा स्वस्त इंटरनेट आले, तेव्हा सर्वांना वाटले होते की आता मुले घरी बसून शिक्षण घेतील. गावागावांत ज्ञान पोहोचेल. पण झाले उलटेच. इंटरनेटचा वापर शिकण्यासाठी कमी आणि अफवा पसरविण्यासाठी जास्त होऊ लागला आहे. ज्या मोबाइलमध्ये अभ्यास असायला हवा होता, त्यात आता भांडण लावणारे व्हिडिओ आणि मेसेज फिरत आहेत..फेसबुक किंवा व्हॉट्सॲपसारख्या कंपन्यांना तुम्ही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवावा असे वाटते, कारण तुमचा प्रत्येक सेकंद त्यांच्यासाठी पैसा मिळवून देणारा असतो. त्यासाठी त्यांचे सॉफ्टवेअर (अल्गोरिदम) सातत्याने अशा बातम्या किंवा व्हिडिओ शोधते ज्या वाचून तुमच्या भावना चाळवल्या जातील, तुम्हाला खूप राग येईल, भीती वाटेल किंवा प्रचंड आश्चर्य वाटेल..अल्गोरिदमला सत्य किंवा असत्याशी काहीही देणेघेणे नसते; त्याला फक्त तुमचा 'वेळ' हवा असतो. त्यामुळे समाजात 'इको चेंबर्स' तयार होतात. ही अशी स्थिती आहे, जिथे आपल्याला फक्त आपल्याच विचारांचे प्रतिध्वनी ऐकू येतात. यामध्ये सोशल मीडिया आपल्याला आपलीच मते वारंवार दाखवतो; ज्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपलेच विचार बरोबर आहेत. समाज दोन टोकाच्या गटांमध्ये विभागला जातो..कौटुंबिक व्हॉट्सॲप ग्रुप्सआपल्या घरातील ‘फॅमिली ग्रुप्स’मध्ये अनेकदा ‘शुभ सकाळ’च्या मेसेजेससोबत आरोग्याबद्दलचे सल्ले किंवा राजकीय बातम्या येत असतात. हे मेसेज पाठवणारे आपले नातेवाईक किंवा वडीलधारी माणसे असतात, त्यामुळे आपण ती माहिती खरी मानतो. याला ‘कन्फर्मेशन बायस’ म्हणतात. याचा अर्थ आपल्याला जे पटते, तेच खरे वाटते. आपल्या जवळच्या माणसाने पाठवले आहे म्हणून आपण ती माहिती तपासून न पाहता पुढे पाठवतो आणि नकळत अफवांचे माध्यम बनतो..Digital Detox: शिकलेले असूनही आपण ‘अडाणी’ का?.आरोग्य, पैसा आणि मानसिक त्रासचुकीच्या वैद्यकीय माहितीमुळे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. कोरोना काळात शास्त्रीय आधार नसलेल्या अफवांमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले, काहींनी जीव गमावला. लसीकरणाबद्दलच्या खोट्या बातम्यांमुळे गोवर-पोलिओसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी'च्या अर्धवट सल्ल्यांमुळे लोक योग्य उपचारांसाठी उशीर करतात; जे जीवघेणे ठरू शकते..आर्थिक फसवणुकीसाठी आज ‘एआय’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जात आहेत. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा किंवा नामांकित व्यक्तीचा आवाज काढून तात्काळ पैशांची मागणी केली जाते. त्याला सुशिक्षित लोकही सहज बळी पडतात. याशिवाय, ‘रातोरात श्रीमंत व्हा’ अशा गुंतवणुकीच्या चुकीच्या योजना व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फिरत असतात. शेअर मार्केटच्या संदर्भात मिळणाऱ्या अर्धवट माहितीमुळे अनेक सामान्य गुंतवणुकदार आपली कष्टाची कमाई चुकीच्या ठिकाणी गुंतवतात आणि क्षणात मोठे आर्थिक नुकसान करून बसतात..मोबाइलवरील नकारात्मक बातम्या, हिंसक व्हिडिओ आणि द्वेषपूर्ण मजकूरामुळे भीती, संताप आणि चिंता वाढते. या ‘इन्फॉर्मेशन ओव्हरलोड’मुळे मेंदू माहितीवर प्रक्रिया करू शकत नाही. परिणामी चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, गोंधळ आणि निद्रानाश (Insomnia) असे त्रास होतात. विचारशक्ती टिकवण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ करणे ही आता गरज बनली आहे..कायदेशीर जबाबदारीअनेकदा लोकांना वाटते, की मी फक्त मेसेज फॉरवर्ड केला आहे, मी तो तयार केलेला नाही. पण कायद्यानुसार, चुकीची किंवा प्रक्षोभक माहिती फॉरवर्ड करणे हा देखील गुन्हा मानला जाऊ शकतो. ‘आयटी ॲक्ट’ (IT Act) नुसार अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते. विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपच्या ‘ॲडमिन’वर मोठी जबाबदारी असते. जर ग्रुपमध्ये एखादा आक्षेपार्ह मेसेज आला आणि ॲडमिनने तो रोखला नाही, तर ॲडमिनलाही पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते..डिजिटल हायजीन चेकलिस्टस्रोत तपासा : मेसेज कोठून आला आहे आणि तो देणारी व्यक्ती अधिकृत आहे का?भावनांवर नियंत्रण ठेवा : जर मेसेज वाचून खूप राग किंवा भीती वाटत असेल, तर तो फॉरवर्ड करण्याची घाई करू नका.गुगल लेन्सचा वापर : संशयास्पद फोटोची सत्यता तपासण्यासाठी गुगल लेन्सने तो फोटो सर्च करा, जिथे तो जुना आहे की नवीन हे समजेल.अपूर्ण माहिती टाळा : ‘हे जास्तीत जास्त शेअर करा’ किंवा ‘हा मेसेज दहा लोकांना पाठवा’ अशा प्रकारच्या विनंत्या असलेल्या मेसेजवर कधीही विश्वास ठेवू नका..निष्कर्षव्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया ही साधने आहेत. त्यांचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. जसे जास्त जेवण आरोग्याला घातक असते, तसेच विचार न करता वाचलेली माहिती बुद्धीला घातक असते. अफवांचा हा वणवा विझविण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. कोणत्याही मेसेजवर ‘फॉरवर्ड’ बटण दाबण्यापूर्वी क्षणभर विचार करा, कारण तुमची ती एक छोटीशी कृती एखाद्याचा जीव धोक्यात घालू शकते..अफवा रोखण्यासाठी काय करावे?अफवांच्या या संकटाचा सामना करण्यासाठी आपण अधिक व्यावहारिक आणि थेट मार्गांचा अवलंब करू शकतो :सरकारी आणि अधिकृत स्रोत तपासा : कोणत्याही सरकारी योजनेबद्दल किंवा महत्त्वाच्या निर्णयाबद्दल शंका असल्यास, थेट केंद्र सरकारच्या ‘PIB Fact Check’च्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर (X/Twitter किंवा Facebook) माहिती तपासा. तसेच राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत चॅनेलचा वापर करा..विश्वासार्ह न्यूज वेबसाइटचा वापर : एखादी बातमी व्हॉट्सॲपवर आल्यावर लगेच फॉरवर्ड न करता, ती बातमी गुगलवर शोधून मुख्य प्रवाहातील प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे का, ते पाहा. जर ती बातमी तेथे नसेल, तर ती अफवा असण्याची शक्यता ९९ टक्के असते.ग्रुपमध्ये ‘सोशल करेक्शन’ करा: जर तुमच्या एखाद्या ग्रुपमध्ये चुकीची माहिती आली असेल, तर गप्प न बसता ती माहिती खोटी असल्याचे पुराव्यासह सांगा. त्यामुळे इतर लोक ती माहिती पुढे पाठवण्यापासून थांबतील. ग्रुप ॲडमिनने देखील चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांना ताकीद देणे गरजेचे आहे..रिपोर्ट आणि ब्लॉक : जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून सतत अफवा किंवा फसवणुकीचे मेसेज येत असतील, तर व्हॉट्सॲपच्या ‘Report and Block’ या सुविधेचा वापर करा. यामुळे अशा खात्यांवर तांत्रिक मर्यादा येतात आणि अफवांचा स्रोत थांबवता येतो.७०८३५८१२८१ (लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.