New York News : ‘‘भारताचा समकालीन जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आत्मनिर्भरता, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास या तीन महत्त्वाच्या संकल्पांवर आधारित असून, भारत नेहमीच आपल्या निवडीचे स्वातंत्र्य जपेल,’’ अशी भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे मांडली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ते बोलत होते. ‘भारताच्या नागरिकांतर्फे सर्वांना नमस्कार...’ अशा शब्दांनी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली..एस. जयशंकर म्हणाले, ‘‘आत्मनिर्भर, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास या मुद्द्यांवर भारत समकालीन जगाकडे पाहतो. ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे आपली स्वतःची क्षमता विकसित करणे, स्वतःची ताकद उभारणे. आपण याचे सर्व परिणाम आधीपासूनच पाहत आहोत, मग ते उत्पादन क्षेत्र असो किंवा अंतराळ संशोधन कार्यक्रम. औषधनिर्माण, डिजिटल विकास, उत्पादन क्षेत्र अशा विविध क्षेत्रात भारत नवे प्रयोग करीत असून, त्याचा जगालाही फायदा होत आहे. .US India Trade: अमेरिकेचा मका खरेदी करा, अन्यथा बाजारपेठ गमवाल.भारत आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे हित जपण्यासाठी, देशात तसेच परदेशातही कटिबद्ध आहे. दहशतवादाविरोधात ठाम भूमिका, सीमांचे संरक्षण, द्विपक्षीय भागीदारी, विदेशातील भारतीय समुदायाचे संरक्षण या गोष्टींना भारत आत्मसंरक्षण म्हणतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून, एक सांस्कृतिक सभ्यता असलेले राष्ट्र म्हणून आणि झपाट्याने प्रगती करणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत विकसित असून, त्यातूनच आमचा आत्मविश्वास दिसून येतो. .आम्हाला आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या भविष्यातील वाटचालीचा आत्मविश्वास आहे. भारत नेहमीच आपल्या निवडीचे स्वातंत्र्य जपेल आणि नेहमीच ग्लोबल साऊथचा आवाज राहील.’’ जयशंकर पुढे म्हणाले, ‘‘सध्या युक्रेन आणि मध्य पूर्व-पश्चिम आशियात दोन मोठे संघर्ष सुरू आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी अपेक्षांची पूर्तता केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला शांतता आणि समृद्धीमध्ये योगदान देण्याची संधी आहे. .सर्व बाजूंशी संवाद साधू शकणाऱ्या राष्ट्रांनी उपाय शोधण्यासाठी पुढे यायला हवे. संघर्ष संपुष्टात यावा यासाठी भारत आवाहन करत असून शांतता प्रस्थापित होईल, अशा कोणत्याही प्रयत्नाला भारत पाठिंबा देईल. सन २०२२ नंतर सुरू झालेल्या संघर्षामध्ये ऊर्जा आणि अन्नसुरक्षा या क्षेत्रांना मोठा फटका बसला. समृद्ध राष्ट्रांनी स्वतःला सुरक्षित केले. संसाधनाच्या तुटवड्यातील समाज जगण्यासाठी धडपडत राहिला आणि त्यानंतर केवळ नीतिमूल्यांची शिकवण ऐकावी लागली.’’.Foreign Trade Policy : नवे परकीय व्यापार धोरण सप्टेंबरपासून.सुधारणांचे महत्त्व अधोरेखितसंयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये तातडीने सुधारणेची गरज परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अधोरेखित केली. ‘‘सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्यत्वाचा विस्तार झाला पाहिजे,’’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘‘सुधारणा स्वीकारण्यास होत असलेल्या विरोधामुळेच संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे,’’ असे जयशंकर म्हणाले..जयशंकर म्हणाले...- आपण आता आयातशुल्काच्या दरातील अस्थिरता आणि बाजारपेठेतील अनिश्चित यांना सामोरे जात आहे. विशिष्ट बाजारपेठेवर अतिअवलंबित्व वाढले असल्याने जोखीमही वाढत आहे.- तंत्रज्ञानावरील नियंत्रण वाढवून आर्थिक चिंता कमी करण्याची गरज आहे.- पुरवठा साखळी आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा साठा ही महत्त्वाची गोष्ट असून, प्रमुख सागरी मार्गांचे संरक्षण एक महत्त्वाचे आव्हान आहे.- राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक दबाव दूर सारून राष्ट्रांनी पूर्वग्रह सोडून देण्याची गरज आहे..जयशंकर यांच्या गाठीभेटीन्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटनी गुटेरेस आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष अनालेना बारबॉक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभाग नोंदवला. ‘‘सध्याची भू-राजकीय आव्हाने, संघर्षाची केंद्रे, भारताची भूमिका आदी मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली,’’ असे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. जयशंकर यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी; तसेच अल्जेरियाचे परराष्ट्रमंत्री अहमद अत्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.