प्रा. मिलिंद वाटवेउत्तरार्धप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास माणसांनी नष्ट केले आहेत म्हणून प्राणी माणसाच्या वस्त्यांवर आक्रमण करीत आहेत हे गृहीतक (hypothesis) प्रथमदर्शनी अगदीच पटण्यासारखं आहे. पण नैसर्गिक अधिवास म्हणजे नक्की काय? ते प्राण्यांना जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतात का? ती त्यांची पहिली निवड असते आणि ती न मिळाल्यासच ते मनुष्यवस्तीकडे येतात असं खरंच आहे का? कित्येक प्राण्यांच्या बाबतीत असं दिसतं, की ते नेहमीच मनुष्यवस्तीच्या आसपास वावरत होते आणि आहेत. त्यांच्या कित्येक पिढ्यांनी कधी जंगल पाहिलेलंच नाही..यात बिबटे, माकडे, रानडुक्कर, नीलगाय येतात. अनेक प्राण्यांचा नैसर्गिक निवास जंगल नसून गवताळ प्रदेश असतो, आणि त्यांच्या दृष्टीने शेत आणि गवताळ कुरण यात फरक तो काय? बरं माणूस सुद्धा वन्य अवस्थेतच उत्क्रांत झाला आणि इतर प्राण्यांबरोबरच वाढला. अगदी अलीकडेपर्यंत प्रत्येक गावाभोवती जंगल होते. शेती आणि जंगले एकमेकांत मिसळूनच असायची त्यामुळे मनुष्यवस्ती आणि प्राण्यांचं अधिवास अशा दोन वेगळ्या गोष्टी होत्या या समजुतीतच तथ्य नाही. शहरे अलीकडे वाढली त्यानंतरच हे दोन वेगळे आहेत असा शहरी भ्रम निर्माण झाला..१९७०च्या दशकात प्राण्यांसाठी अभयारण्यांची निर्मिती झाली.त्यानंतर त्यांचा अधिवास वेगळा असतो, अशी एक प्रतिमा निर्माण झाली. त्यापूर्वी सगळीकडेच वन्यक्षेत्रे आणि मनुष्यवस्ती एकमेकांमध्येच वसलेले होते. विसाव्या शतकात खूप जंगलतोड झाली हे खरं आहे. पण त्याचबरोबर प्राण्यांची संख्याही इतकी कमी झाली की जंगले कमी झाल्यामुळे उपलब्ध अधिवासात प्राण्यांची फार गर्दी झाली आणि म्हणून ते बाहेर पडताहेत, अशी वस्तुस्थिती नाही. पुढे संरक्षण दिल्यानंतर आता त्यांची संख्या वाढून जंगलात गर्दी होऊ लागली आहे अशी शक्यता आहे. पण याला दिलेलं संरक्षण जबाबदार की कमी झालेलं जंगल?.Human Wildlife Conflict: संशोधनाची विजेरी पेटवा....कारण जिथे संख्या वाढली आहे ती राखीव जंगले आहेत आणि तिथले अधिवास वन खात्याने उत्तम प्रकारे राखले आहेत. निरनिराळ्या प्रांतांची तुलना केली तर ज्या भागात अधिवासांची जोपासना चांगली झाली त्या भागात समस्या कमी व्हायला पाहिजे होती पण उलट तिथेच ती जास्त वेगाने वाढत आहे. म्हणजे अधिवासांचा विनाश हे माणसावर आणि शेतपिकांवर हल्ला होण्याचे मुख्य कारण असल्याचा पुरावा देता येत नाही. दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगराइतकी माणसांची घनता आणखी कुठे असेल? आणि त्याच्यामधेच बिबट्यांची घनताही इतर कुठल्याही जंगलापेक्षा जास्त आहे. पण इथे माणसावर हल्ला होण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे प्राण्यांची संख्या आणि मनुष्यवस्तीची वाढ ही कारणं संघर्ष वाढायला पुरेशी म्हणता येतील का?.भीती कमी झालीपण मुळात नैसर्गिक अधिवास म्हणजे काय आणि प्राणी तिथे का राहतात? अन्नाची आणि पाण्याची उपलब्धता पाहिली तर ती वर्षभर मनुष्यवस्तीजवळ जेवढी असते तेवढी जंगलांच्या अंतर्भागात नसते. एक तर माणूस पाणी पाहून वस्ती करतो आणि इकडून तिकडून पाणी वर्षभर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. दुसरं म्हणजे शेती, बागायती, परसबाग यामध्ये अधिक पोषणमूल्ये असलेल्या आणि काटे, विषारी द्रव्ये, कडू चव नसलेल्या वनस्पती लावतो. मग जे आपल्याला खायला चांगलं ते प्राण्यांना वाईट का असेल? परत माणसाने फेकलेल्या कचऱ्यातही प्राण्यांना खाण्यासारखं खूप काही असतं. म्हणजे मनुष्यवस्ती हाच अधिवास अन्नपाण्यासाठी जंगलांपेक्षा अधिक चांगला आहे..मग प्राणी मनुष्यवस्ती सोडून जंगलात का बरं राहत असतील? तर याचं कारण तो अधिवास अधिक चांगला आहे असं नसून त्यांना वाटणारी माणसाची भीती हे आहे. माणूस हजारो वर्षे शिकारी प्राणी आहे आणि त्याने पन्नास हजार वर्षांपूर्वी मॅमथ, लोकरी गेंडे, अस्वलांच्या भल्या मोठ्या जाती यांची शिकार केल्याचे पुरावे आहेत. म्हणून वन्य प्राणी माणसाचे सान्निध्य शक्यतो टाळत आले आहेत. मनुष्य वस्तीच्या जवळपास यायचं तर रात्री गुपचूप येत आले आहेत. यामुळे जवळ जवळ वावरत असले तरी दोघांची प्रत्यक्ष समोरासमोर गाठ शक्यतो पडत नव्हती आणि संघर्ष टाळला जात होता..Human Wildlife Conflict: संघर्ष नको, सहजीवनच हवे...!.मात्र गेल्या पन्नास वर्षांत शिकार बंद झाल्यामुळे माणसाची भीती झपाट्याने नाहीशी होत आहे. शेतीची राखण पूर्वीही करावी लागतच होती. पण जरा हुऽऽर्र हुऽऽर्र केल्यावर प्राणी पळून जात होते. बुजगावण्यालाही घाबरत होते. आता ज्या अभयारण्यात वाघ तुमच्या जीपला घासून जातो, हरणे जीपच्या शेजारी निवांतपणे चरत राहतात, नीलगाईंना तर मनुष्यप्राण्यांची भीतीच उरली नाही. तिथल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची राखण करणे कसे शक्य होईल सांगा?.नियंत्रित शिकारम्हणजे अधिवासाचा नाश, प्राण्यांची वाढणारी संख्या, माणसाची भीती नाहीशी होत जाणं अशी अनेक संभाव्य कारणं आहेत. ती ताडून पाहण्याचे काम अलीकडे सुरू झाले असून त्यातून हळूहळू असं स्पष्ट होऊ लागलं आहे की माणसाची भीती नाहीशी होणं हे संघर्ष वाढण्याचं मुख्य कारण असून, प्राण्यांची संख्या वाढणं, जंगलतोड, इतर विकासकामे ही दुय्यम कारणं आहेत. मग आता उपाय मुख्य कारणावर प्रहार करणाराच असायला हवा. जर शिकार बंद केल्यामुळे माणसाबद्दलची भीती नाहीशी झाली असेल, तर शिकार नियंत्रित स्वरूपात परत आणायला हवी..याचा मूळ उद्देश प्राणी मारणं हा नसून जगलेल्या प्राण्यांमध्ये माणसाची योग्य तेवढी भीती परत निर्माण करणं हा असायला पाहिजे. याला काही वेळ लागेल, तोही द्यायला हवा. याचबरोबर जंगलंही पुरेशी राखली, तर प्राणी तिथेच राहतील. माणसाच्या आजूबाजूला आलीच तरी रात्री बेरात्री गुपचूप येतील. यामुळे संघर्ष कमीत कमी प्रमाणावर येईल. पिकांचे रक्षण प्रभावीपणे करता येईल. पण याचा अर्थ वन्यजीवविषयक धोरण आणि कायदे यात मुलभूत बदल करणे भाग आहे..त्याशिवाय केलेला कुठलाही उपाय तात्पुरता ठरेल. कदाचित आम्ही काहीतरी करतो आहोत अशी बतावणी करून लोकांना काही काळ गप्प बसवता येईल, पण सहजीवन साधायचं असेल तर समस्येच्या मुळावर घाव घालायला पर्याय नाही. मानव वन्यप्राणी यांच्या संतुलनात माणसाने शिकारी असण्याला फार मोठं महत्त्व आहे. शिकार पूर्णपणे बंद करून हा समतोल साधणं तत्त्वतःच अशक्य आहे. पण याचा अर्थ कुणीही कितीही शिकार करावी असा नाही. सातत्याने होणाऱ्या संशोधनासहित योग्य ते नियंत्रण असणारी आणि व्यवहार्य अशी शिकार व्यवस्था डिझाइन करावी लागेल. वन्यजीव व्यवस्थापन आणि संशोधकांपुढचं खरं आव्हान हे आहे.milind.watve@gmail.com(लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.