Fertilizer Management: केवळ शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याची पूर्तता केल्याने पिकाची गरज भागेलच असे नाही. जमिनीत खते गेल्यानंतर पुढे त्यावर सूक्ष्मजीवांचे कार्य सुरू होते. यामुळे तो जैविक प्रक्रियेचा एक भाग बनतो. या लेखात अन्नद्रव्ये टाकल्यानंतर ती पिकापर्यंत कशी पोहोचतात, हे पाहू..हरित क्रांतीदरम्यान सुधारित व अधिक उत्पादनक्षम वाण आणले गेले. या संकरित व अधिक उत्पादनक्षम वाणांच्या वाढीसाठी अधिक पोषणाची आवश्यकता असते. त्यासाठी सुरुवातीला नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची शिफारस करण्यात आली. पुढे दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या शिफारशीही करण्यात आल्या. यांचे पिकांना प्रमाण कमी अधिक लागत असले तरी प्रत्येकाचे महत्त्व तितकेच आहे. पूर्वी गरजेच्या मानल्या जाणाऱ्या १६ अन्नघटकांमध्ये आता आणखी क्लोरिन, सोडिअम, सेलेनिअम, सिलिकॉन अशा काही अन्नद्रव्यांची भर पडली आहे..Fertilizer Management: पीक उत्पादन वाढीसाठी खतांच्या पायाभूत मात्रेचे महत्त्व.मूळ खडक झिजून तयार झालेल्या मातीत त्या मूळ पदार्थापासून मिळालेली खनिजे/ अन्नद्रव्ये असतात. एकेकाळी अन्नद्रव्याचे भांडार असलेली जमिनीमध्ये सातत्याने पिके घेत गेल्यामुळे अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत गेले आहे. त्याची संकरित वाणांची पोषण गरज वाढली असून, ती केवळ सेंद्रिय खतातून पूर्ण करण्याला अनेक मर्यादा आहेत. पिकांचे फेरपालट, त्यातही कडधान्ये व शेंगावर्गीय पिके घेणे, उत्पादनाव्यतिरिक्त अन्य सर्व अवशेष जमिनीत जिरवल्यास नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबू फुकोओका यांच्या मताप्रमाणे बाहेरून काहीही न वापरता पुढील पिकाची अन्नद्रव्ये गरज भागू शकते. पण अनेक कारणामुळे प्रत्येकाला ते शक्य होईलच असे नाही. त्यामुळे रासायनिक खतांकडे वळण्याशिवाय गत्यंतर राहत नाही..कृषी शास्त्रज्ञांनी पीकनिहाय अन्नद्रव्यांच्या शिफारशी केलेल्या आहेत. पण केवळ त्यांची पूर्तता केल्याने पिकाची गरज भागेलच असे नाही. कारण आपण दिलेल्या खतांवर प्रक्रिया करून पिकांना उपलब्ध करण्याचे काम सूक्ष्मजीव करत असतात. ही बाब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये आपले शास्त्रज्ञ कमी पडले. जोपर्यंत खते पोत्यात आहेत, तोपर्यंत ती रासायनिक आहेत. जमिनीत गेल्यानंतर पुढे त्यावर सूक्ष्मजीवांचे कार्य सुरू होते. यामुळे तो जैविक प्रक्रियेचा एक भाग बनतो. या लेखात अन्नद्रव्ये टाकल्यानंतर ती पिकापर्यंत कशी पोहोचतात, हेच पाहणार आहोत..कोणतेही अन्नद्रव्ये दिल्यानंतर ते जमिनीत स्थिर झाले पाहिजे. स्थिरीकरण म्हणजेच व्यवस्थित साठविण्याचे तीन प्रकार आहेत.कायिक स्थिरीकरण ः खते टाकल्यानंतर त्यातील अन्नघटक सेंद्रिय कर्बावरील विजातीय विद्युत भारामुळे त्यावर चिकटून बसतात. हे स्थिरीकरण थोडे हलके असते.रासायनिक स्थिरीकरण ः जमिनीमध्ये सतत विविध रासायनिक क्रिया चालू असतात. त्या रसायनाबरोबर खतातील अन्नद्रव्याची प्रक्रिया होऊन वेगळेच रसायन तयार होते. याला रासायनिक स्थिरीकरण म्हणतात. हे काहीसे कठीण स्थिरीकरण असते.जैविक स्थिरीकरण ः खत टाकलेल्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सुरू असल्यास तिथे कुजण्याच्या क्रियेत भाग घेणारे जिवाणू खतातील अन्नांशही खातात. पुढे ते मृत झाल्यानंतर शिल्लक राहिलेली शरीरे म्हणजे जैविक स्थिरीकरण होय..तुलनात्मकदृष्ट्या तिन्ही स्थिरीकरणामध्ये जैविक स्थिरीकरण सर्वांत चांगले ठरते. कारण त्यातील अन्नद्रव्यांचा सहजासहजी नाश होऊ शकत नाही. तसेच स्थिर साठ्यातून पिकांना उपलब्ध साठ्यामध्ये रुपांतरणही वेगाने होऊ शकते. जोपर्यंत जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी चांगली होती, तोवर संकरित वाण आणि रासायनिक खतांच्या वापराने अधिक उत्पादन मिळाले. पण पुढे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे उत्पादन घसरत गेले. हरितक्रांती विनाकारण बदनाम झाली. रासायनिक शेतीला दोष देण्याची प्रवृत्ती वाढली. वास्तवात सेंद्रिय खतांचा अजिबात वापर न करणे किंवा कमी करणे याचा तो परिणाम होता. विनानांगरणी किंवा एसआरटी शेती करण्यास प्रारंभ केल्यानंतर काही काळातच त्याच जमिनी पूर्वीप्रमाणे उत्पादन देऊ लागल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कोणत्याही एकांगी शेतीपेक्षा एकात्मिक सेंद्रिय रासायनिक शेतीचा समन्वय केल्यास शेतीला शाश्वतता मिळू शकते..एक उदाहरण पाहू. अमेरिकेत घनदाट वाढलेल्या एका जंगलात नत्र कोठे व कसा साठविला गेला आहे, याचे विश्लेषण केले असता त्यात ९१ टक्के नत्र मृत सेंद्रिय पदार्थांत, ८.५ टक्के नत्र जिवंत वनस्पतीत, तर ०.५ टक्का नत्र बिगर सेंद्रिय मातीत असल्याचे निष्कर्ष मिळाले. (स्रोत ः कन्सेप्ट ऑफ इकोलॉजी, लेखक - कोरमोडी) आपल्या जमिनीत मृत सेंद्रिय पदार्थ ०.५ टक्काही नाहीत. म्हणजे ९९.५ पेक्षा जास्त बिगर सेंद्रिय माती शिल्लक आहे. अन्नद्रव्ये साठविण्याचे कोठार मृत सेंद्रिय पदार्थ असून, नेमके तेच आपण उद्ध्वस्त केले आहे. जंगलात सतत पालापाचोळा पडून जागेवरच कुजण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. आपण पूर्ण कुजलेले खत अमृत मानून शेतात टाकतो. या खतांचे प्रथम स्थिरीकरण योग्य प्रमाणात झाले तरच ती पुढे गरजेच्या वेळी उपलब्ध होऊ शकतात. .आपल्याकडे स्थिरीकरण फक्त स्फुरदाचेच होते असे सांगितले जाते. स्थिरीकरण-उपलब्धीकरण ही सूक्ष्मजीवशास्त्रीय संकल्पना कृषी रसायनशास्त्रात मान्य केलेली नाही. माती परीक्षणानंतरच खत मात्रा हं आपल्याकडील परवलीचे शब्द. या माती परीक्षणाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात सामू, क्षारता व सेंद्रिय कर्ब हे उपयुक्त घटक येतात. दुसऱ्या भागात उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश वगैरे. बाकी साठा उपलब्ध नसलेल्या अवस्थेत असतो. उपलब्ध साठा लहान असतो तर स्थिर साठा मोठा असतो. मुळात आपण मातीचा नमुना कोणतेही पीक नसताना घेतो, त्या वेळी उपलब्ध साठ्याचे कोणतेच प्रयोजन नसते. .मग या आकडेवारीवरून अन्नद्रव्यांचे उपलब्ध प्रमाण आणि बाहेरून किती द्यावे लागेल, याचे गणित करणे कितपत योग्य आहे? आज केंद्र सरकारकडून जमिनीच्या आरोग्य कार्डाची योजना राबवली जात आहे. जमिनीचा सामू, क्षारता याविषयी फारशी चर्चाच केली जात नाही. माझ्याकडे भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे प्रकाशित ‘नायट्रोजन ॲन्ड पोटॅशिअम फिक्सेशन इन इंडियन ऑइल’ या नावाची पुस्तिका आहे. त्यात लेखक कार्यक्षम व्यवस्थापनासाठी स्थिरीकरण गरजेचे आहे असेही लिहितो, तर स्थिरीकरणामुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असेही लिहितो. सूक्ष्म जीवशास्त्राच्या मते, फक्त स्फुरद नव्हे सर्वच अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होणे गरजेचे आहे. अन्नद्रव्याचे स्थिरीकरण म्हणजे ते पिकाला कधीच उपलब्ध होणार नाही, असे नसते. उलट अन्नद्रव्यांचा वेगवेगळ्या प्रकारे ऱ्हास होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ती रचना आहे..उपलब्धीकरणजमिनीत अन्नद्रव्याचे उपलब्धी नेमकी कशी होते, हे प्रथम पाहू. वनस्पतीच्या केशमुळाभोवती असलेले सूक्ष्मजीव पिकाच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतात. एक अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचे काम कित्येक सूक्ष्मजीव प्रजाती नैसर्गिकरीत्या करत असतात. वनस्पतीच्या मुळांच्या सोडल्या जाणाऱ्या रासायनिक स्रावाच्या संदेशानुसार हे सूक्ष्मजीव कार्यान्वित होत असतात. कारण हे स्राव सूक्ष्मजीवांचे खाद्य असल्याने तिकडे आकर्षित होतात. जमिनीतील अन्य परिस्थिती ज्या सूक्ष्मजीव प्रजातीला अनुकूल असते, तीच प्रजाती कार्यरत होते. तिची संख्या वाढते. पिकाच्या मागणीप्रमाणे अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात आणण्याचे काम करते. काम संपताच पुन्हा सुप्तावस्थेत जाते. या उपलब्धीकरणाच्या कार्यामध्ये आपण दिलेली सेंद्रिय खते मोलाची ठरतात. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी २०-२५ गाड्या एकरी शेणखत टाकण्याची शिफारस केली जाते, पण त्यामागील नेमका उद्देशच शेतकऱ्यांना सांगितला जात नाही..Fertilizer Use Efficiency: जमिनीनुसार वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता .जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करणारे व पिकाला गरजेप्रमाणे अन्नद्रव्य पुरवणारे अशा दोन प्रकारचे सूक्ष्मजीवांचे गट असतात. यातील पहिल्या गटाचे खाद्य कुजणारा पदार्थ, तर दुसऱ्या गटाचे खाद्य पहिल्या गटाने कुजवून तयार केलेले सेंद्रिय खत असते. आपल्याला पूर्ण कुजलेले शेणखत टाकण्यास सांगितले. त्यात पहिल्या गटाचे काम जमिनीबाहेरच पूर्ण झालेले असते, तर सेंद्रिय खत हे खाद्य असलेल्या गटासाठी पुरेसे सेंद्रिय खत आपण विविध कारणांमुळे देऊ शकत नाही. मग स्थिरीकरण व उपलब्धीकरण या दोन्ही क्रियांवर मर्यादा येतात व उत्पादन घटते. नेमके कारण लक्षात येत नसल्याने शेतकरी चाचपडत बसतो. रासायनिक खतांचे डोस वाढवत बसतो..एकाच पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. त्या त्या वेळी त्या त्या सूक्ष्मजीवांना सूचना देण्याची व त्या त्या वेळी ते अन्नद्रव्य उपलब्ध करण्याची अद्भुत रचना सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून निसर्गाने केलेली आहे.निसर्गतः अन्नद्रव्याचा सर्व साठा उपलब्ध अवस्थेत ठेवला जात नाही. कारण तो पाण्यात विद्राव्य होणारा व सर्वांत नाशवंत असतो. शेतकऱ्याने दिलेल्या अतिरिक्त सिंचनामध्ये किंवा जास्त पावसामुळे निचरा होऊन जाऊ शकतो..निसर्गात सजीवांचे दोन गट आहेत. १) वनस्पती व २) प्राणी गट. वनस्पती प्राण्यांचे अन्न तयार करतात. तर प्राणी वनस्पतींचे अन्न तयार करतात आणि अन्नचक्र पूर्ण होते. वनस्पतींनी तयार केलेले अन्न प्राण्यांनाही सूक्ष्मजीवांचे मध्यस्थीशिवाय खाता किंवा पचवता येत नाही, तर प्राण्यांनी तयार केलेले अन्न वनस्पतींनाही सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय खाता येत नाही.वनस्पती स्वतःचे अन्न प्रकाश संश्लेषणातून स्वत: तयार करतात, त्यामुळे त्या स्वयंपूर्ण असल्याचे शिकवले जाते. जर त्या स्वयंपूर्ण आहेत, तर त्यांना खते देण्याची गरज काय? म्हणजेच वनस्पती स्वयंपूर्ण नाहीत. त्यांना जमिनीतून अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. ती खतांद्वारे पूर्ण केली तरी सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय खाता येत नाहीत. या शास्त्रीय बाबी शेतकऱ्यांना सांगितल्याच जात नाहीत..तण निर्मूलनाऐवजी तण व्यवस्थापनतणमुक्त शेतीचा भलामण करताना तण व पिकाची अन्नद्रव्याबाबत स्पर्धा होत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक वनस्पती (मग ती तण असो की पीक) आपल्याला आवश्यक तितक्या अन्नद्रव्याची मागणी सूक्ष्मजीवांकडे करत असते. त्यांच्या केशमुळाभोवती असलेले सूक्ष्मजीव त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतात. पिकासाठी आपण शिफारशीप्रमाणे खते देत असलो तरी त्याचे प्रमाण पिकाच्या गरजेपेक्षा कितीतरी (तीन ते चार पट) अधिक असते. त्यातील थोडी अन्नद्रव्ये तणांनी खाल्ली, तरी घाबरायचे कशाला? फक्त पिकांच्या उंचीपेक्षा अधिक वाढून सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणारी तणे आपल्याला परवडणारी नाहीत. तणे शिरजोर होणार नाही, .इतकी काळजी घेतली तरी पुरेसे असते. पावसाळ्यात अगर अनुकूल अवस्थेत नत्र गरजेपेक्षा जास्त उपलब्ध होऊ शकतो. तणमुक्त शेतीत तो संपूर्ण पिकाकडून वापरला जाऊन त्याची शाकीय वाढ अधिक होते. त्यावर रोग-किडीचे प्रमाण वाढते. त्यापेक्षा अनुकूल वातावरणामध्ये अतिरिक्त नत्र तणांकडे वळला तर त्याची वाढ होते. फक्त त्यांना बेसुमार वाढे न देणे, हे एक काैशल्याचे काम आहे. वाढलेली तणे योग्य वेळी गाडली, ती जमिनीत कुजत राहिली तर त्यांची पिकाच्या वाढीला अधिक मदत होते. म्हणूनच तण निर्मूलनाऐवजी तण व्यवस्थापन करावयास शिकले पाहिजे..सेंद्रिय खत वापराचा प्राधान्यक्रमधान्य व कडधान्याच्या अवशेषातून वैरण तयार होते. त्यापासून जनावरांच्या शरीरात शेण व पुढे शेणखत तयार होते. उपलब्ध शेणखतांपैकी सर्वाधिक प्राधान्य फळबाग, भाजीपाला, नगदी पिकांना दिले जाते. त्यानंतर शिल्लक राहिल्यास अन्नधान्य पिकांना दिले जाते. हे क्षेत्र अधिक असून, त्यातील बहुतांश जमिनीला शेणखत दिलेच जात नाही..ही त्रुटी दूर करण्यासाठी फळबाग किंवा नगदी पिकांमध्येही त्यांच्या गरजेइतके सेंद्रिय खत त्या त्या रानातच तयार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. जमिनी अनेक कारणांनी खराब होतात. उदा. तापमान, आर्द्रता, सामू, क्षारता, प्राणवायूचा पुरवठा, जमिनीची निचरा शक्ती इ. कारण नेमके जाणून ते दूर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. विनानांगरणी शेती किंवा एसआरटी तंत्रज्ञानामध्ये यातील बहुतेक कामे आपोआप पार पाडली जातात..विद्राव्य खते : साधी खते व विद्राव्य खते यातील फरक समजून घ्या. साधी खते टाकल्यानंतर स्थिरीकरण व गरजेप्रमाणे उपलब्धीकरण या मार्गे सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीने वाटचाल करतात. या खतांचा एक दोन महिन्याचा हप्ता शेतकरी देऊ शकतात. तर विद्राव्य खते पिकाला सरळ घेता येतात आणि त्याचे परिणाम त्वरीत दिसतात. त्यामुळे नगदी पिके, फळबागांमध्ये विद्राव्य खतांचा वापर वाढला आहे. ही खते रोज किंवा एक दिवसाआड पिकांच्या गरजेनुसार द्यावी लागतात. त्यासाठी पिकांची अवस्था व त्या काळातील गरज माहिती करून त्यानुसार ती पिकांच्या मुळापाशी सोडावी लागतात. इथे अंदाजे खते देण्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होण्याचा धोका राहतो.- प्रताप चिपळूणकर८२७५४५००८८(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी असून, विनामशागत शेती व भूसूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.