Flag Hosting Ceremony: सावित्री ही काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारी एक विधवा बाई. तिचा नवरा रानात करंट लागून मेला. त्यो जाताना सावित्रीला एक पोरगा, पाच पत्र्याची खोली आन दीड एकर शेत म्हागं ठेवून गेला. .लग्नाआधी सावित्री गावातल्या सणावाराला हळदीकुंकाला जायची, गल्लीत कसलाबी कार्यक्रम असूद्या तिला कुंकू यायचं पण नवरा गेल्यापासनं तिला कोणत्याच सवासणीचं आवतान न्हाय आलं. नवऱ्याबरोबर जणू सावित्रीचा समाजातला सन्मानबी मरून गेला व्हता. जरी कधी जवळच्या पाव्हण्याच्या एखाद्या कार्यक्रमात गेलीच तरी कुठंतरी कोपऱ्यात बसून राहायची. आया बाया हळद-कुंकू लावताना सावित्रीला डावलून पुढं जायच्या..Rural Motivational Story: अंदळदेवचे ‘लक्ष्मीदार’ सोमा आणि सखू! .नवरा मरून आता दहा वरिस सरली व्हती. सावित्रीचा पोरगा महादू यंदा दहावीला व्हता. लहानपणापसूनच महादूनं आईचं कष्ट आन तीजी समाजात व्हणारी कुचंबणा डोळ्यानं बघितली व्हती. दीड एकर कोरडवाहू शेतात कायच पिकत नव्हतं म्हणून त्येज्या आईनं लोकांच्यात रोजंदारीनं जावून घराचा गाडा हाकला व्हता. महादू कळता झाल्यापसून त्येज्या डोसक्यात फक्त एकच गोष्ट घोळत व्हती अन ती म्हंजी आईला एक ना एक दिवस लय मोठा मान मिळवून द्यायचा. दहावीची परीक्षा जवळ आली..Inspiring Farmer Story: वाघदऱ्याच्या गुहेतील वाघ अन् वाघीण.महादूनं मन लावून अभ्यास केला. घरची कामं करून त्येनं बोर्डात पहिला नंबर मिळवला. इकी दीशी सांच्यापारी महादूच्या शाळेचा शिपाई कसला तरी कागुद घेवून घरी आला. सावित्री चुलीवर सयपाक करत बसली व्हती. शिपाई आत आला आन त्यो कागद सावित्रीच्या हातात टिकवीत म्हणला, ‘‘उद्या शाळेत या सकाळी आठ वाजता, हेडमास्तरनं बुलिवलंय तुम्हाला.’’ हे ऐकून घाबरून सावित्री त्याला म्हणली, ‘‘काय कुटाना केला महाद्यानं.’’ ‘‘आवं बोर्डात पहिला नंबर आणून आईला पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनचा मान मिळवून दिलाय तुमच्या महाद्यानं.’’.थोड्या येळानं महादू घरी आल्यावर सावित्री त्याला त्यो कागुद दाखवीत म्हणायली, ‘‘आरं महादू, ही काय रं नवीनच, बाय माणसानं आसतंय व्हय समद्यांच्या म्होरं जायचं, लोक काय म्हणत्याल. तिथं समदा गांव असतंय.’’ तिला मधीच थांबावत मग महादू म्हणला, ‘‘आगं आपल्या देशाच्या राष्ट्रपतीबी विधवा हायत्या मग जर त्या झेंडा वंदन करू शकत्यात तर तू का नाही? ते काय सांगू नगं तुला यावंच लागल.’’.दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री नवी साडी घालून शाळेत गेली, तिला स्टेजवर खुर्चीवर बशिवलं, महापुरुषांच्या फुटूला पुजायचा मान दिला. गावच्या सरपंचांनी तीजा सत्कार केला. मग पीटीच्या सरांनी झेंड्याची एक दूरी वढायला सांगितली. सावित्रीनं जशी दुरी वढली तसा झेंडा आभाळात फडकला, झेंड्यातली फुलं तिज्या अंगावर पडली अन एका सुरात राष्ट्रगीत सुरू झालं.lokvyakhyankar@gmail.com(लेखक प्रसिद्ध लोकव्याख्यानकार आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.