Modern Agriculture : सिरसाळा परळी वैजनाथ येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकुलमध्ये रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात रेशीम कोष उत्पादकांनी आधुनिक तंत्रज्ञान तसेच रेशीम उद्योगाचे अर्थशास्त्र जाणून घेतले..केंद्रीय रेशीम बोर्ड, महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालय, बीड जिल्हा रेशीम कार्यालय, ग्लोबल विकास ट्रस्ट, बीड जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय तसेच परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे वैज्ञानिक वीर शेट्टी तसेच जिल्हा रेशीम अधिकारी एस. बी. वराट उपस्थित होते..Sericulture Farming: बदलत्या हवामानात रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय : विजयअण्णा बोराडे.केंद्रीय रेशीम बोर्डाचे वैज्ञानिक वीर शेट्टी यांनी रेशीम उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, तुती लागवड, रेशीम किड्यांचे संगोपन, विविध किडी व रोगांचे व्यवस्थापन, तुती बागेवरील रोग तसेच रेशीम किड्यांवरील रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले..राज्य रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी रेशीम उद्योगातील उपलब्ध संधी, उद्योगाचे अर्थशास्त्र आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने रेशीम उद्योगाचे महत्त्व स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणींची दखल घेत त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले..Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा....कार्यक्रमादरम्यान प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबा सलगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळ कृषी अधिकारी रामराव पोळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रेशीम उद्योगातील संधी तसेच कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली..ग्लोबल विकास ट्रस्टतर्फे मुक्तेश्वर कडभाने यांनी संस्थेच्या रेशीम उद्योगातील कार्याची माहिती दिली. बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी कर्ज व पतपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले..कार्यक्रमाला पोहनेर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुधाकर पोळ, ग्लोबल विकास ट्रस्टचे विजय गव्हाणे, कृष्णा राठोड, दत्तात्रय काळे, रेशीमरत्न हनुमंत भरडे, लहू राठोड, गणेश मुसळे, डॉ. प्रवीण मांजरे यांच्यासह बीड व परभणी जिल्ह्यातील रेशीम विभागाचे प्रतिनिधी, परळी तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते..बीडची नवी ओळख ‘रेशीम उत्पादकांचा जिल्हा’ म्हणून व्हावीबीड जिल्ह्याची ओळख केवळ ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी न राहता आगामी काळात ‘रेशीम उत्पादकांचा जिल्हा’ म्हणून व्हावी, यासाठी रेशीम विभाग, कृषी विभाग, ग्लोबल विकास ट्रस्ट आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला..रेशीम उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, स्वच्छता, तापमान व आर्द्रता व्यवस्थापन तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.- वीर शेट्टी, केंद्रीय रेशीम बोर्डाचे वैज्ञानिक.शेतीतील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनापासून मूल्यवर्धनापर्यंतचा प्रवास करावा आणि शेतीला शाश्वत व फायदेशीर व्यवसायाचे स्वरूप द्यावे.- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय.कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व सहकार्य केले जाईल.- डॉ. अर्चना नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी, परळी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.