Parbhani News: गोदावरीच्या महापुरामुळे कपाशीच्या पऱ्हाट्या, तुरीच्या तुऱ्हाट्या, तर सोयाबीनच्या घुगऱ्या झाल्या आहेत. यंदा दिवाळीत दिव्यांच्या वातीसाठी देखील घरचा कापूस मिळणार नाही. गोदावरी नदीच्या महापुरामुळे बॅकवॉटरमुळे खरीप पिके समूळ नष्ट झालीत. तोंडचा घास हिरावल्याने दिवाळे निघाले असताना दिवाळी सणाची गोडी राहिली नाही. गोदावरीचा ओसरला असला तरी शेतकऱ्यांच्या वेदना, व्यथांचा पूर कायम आहे..यंदा मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यात पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याच्या काठच्या पिकांचे नुकसान झालेले असतांना सप्टेंबर मध्ये जायकवाडी, माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला दोन वेळा महापूर आला. पुराचे पाणी नदी पात्रात मावले नाही. उपनद्या, ओढे, नाल्यांचे पाणी गोदावरीने स्वीकारले नाही. प्रचंड तुंब निर्माण झाला..शेतीमध्ये तसेच गावांमध्ये शिरले. बॅक वॉटरमुळे दोन्ही काठच्या १ ते ३ किलोमीटर त्रिज्येतील पिकांवर १० ते १५ फुट पाणी जमा झाले. कित्येक तास पाण्यात बुडाले. पूर ओसल्यानंतर ४० ते ५० बोंडे लगडलेली कपाशी, काढणीस आलेले सोयाबीन, वाढीच्या अवस्थेतील तूर या पिकांचे काळे ठिक्कर पडलेले अवशेष दूरदूर पर्यंत दिसत आहेत. त्यावरून पीकहानीची व्याप्ती लक्षात येत आहे. ऊस देखील आडवा झाला. हजारो टन सुपीक माती गंगेला जाऊन मिळाली. गोदावरी नदी काठच्या या तीन तालुक्यात बागायती शेतकऱ्यांचे ऊस हे प्रमुख पीक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची सारी दारोमदार कपाशी व सोयाबीन पिकांवर असते. यंदा ही पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे...Flood Relief Package: ‘पॅकेज’चा फोलपणा.गोदावरी-दुधनाच्या पुराचा तडाखा...मानवत तालुक्यातील पाच मंडलांत २ ते ३ वेळा अतिवृष्टी झाली. तालुक्याच्या उत्तरे सीमेवरून वाहणारी दुधना नदी व दक्षिण सीमेवरून वाहणारी गोदावरी नदी काठच्या सुपीक जमीनीवरी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके चांगली बहरली होती. दुधना नदीच्या पुरामुळे सावंगी, नरळद, इरळद, कोथाळा आदी गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. गोदावरी नदी काठच्या रामपुरी बुद्रुक, थार, वांगी, कुंभारी या गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. थार गावाचा तब्बल १० ते १२ दिवस संपर्क तुटला होता. घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्यांची नासाडी झाली. ग्रामस्थांचे स्थलांतर करावे लागले होते..थारच्या शेतकऱ्यांच्या थार व वझूर शिवारात जमिनी आहेत. थार येथील तुकाराम गिते म्हणाले, की आमची वझूर शिवारातील पंचवीस एकरांतील सोयाबीन व कपाशी, तूर पिके बॅकवॉटरमुळे सडून गेली.नुसता वास सुटलाय. गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी कमीत कमी एक लाख रुपयांची उत्पन्न बुडाले. रामपुरी येथील ज्येष्ठ शेतकरी सखाराम साठे म्हणाले, की तीन एकरांतील कपाशी व तूर डोस्क्याएवढी वाढली होती. पण गंगेच्या पुरात बुडल्यान आता कपाशीच्या पऱ्हाट्या तर तुरीच्या तुऱ्हाट्या उभ्या आहेत.सुधाकर यादव म्हणाले की,पाच एकरातील कुजलेल्या सोयाबीनला वाफसा झाल्यावर पाळी घालून ज्वारी पेरणार आहोत..बॅकवॉटरमुळे पिके समूळ नष्ट...पाथरी तालुक्यातील ४ मंडलांत ३ ते ४ वेळा अतिवृष्टी झाली. गोदावरी नदी काठच्या मुद्गल, विटा बुद्रूक, लिंबा, आनंदनगर तांडा, डाकू पिंपरी, तारुगव्हाण, कानसूर, उमरा, अंधापुरी, गौंडगाव, गुंज, मसला, मसला तांडा, ढालेगाव, रामपुरी, वडी, निवळी, नाथरा, मरडसगाव, पाटोदा, मंजरथ गावातील शेतकऱ्यांना पिके हाती लागली नाहीत. मुद्गल येथील हनुमान गवळी म्हणाले, की गावाला पुराचा वेढा पडला होता. अजूनही पिकांमध्ये पाणीच असून सहा एकरांवरील कपाशी खल्लास झाली. गवत देखील सडून गेले आहे..Flood Crisis: ‘मनुदेवी’च्या प्रकोपाने आमचे व्हत्याच नव्हते झाल...उरल्या सुरल्या पिकावर पाणी....सोनपेठ तालुक्यातील ४ मंडलात २ ते ४ वेळा अतिवृष्टी झाली. ऑक्टोंबर मध्ये उरल्यासुरल्या सोयाबीनची काढणी सुरू असताना आवलगाव व वडगाव मंडलात अतिवृष्टी झाली. कापणी केलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. भिजून भिजून कापूस नख्यामध्ये चिकटून बसला आहे.थडी उक्कडगावचे श्रीराम भंडारे म्हणाले, की गोदावरी काठच्या विटा खुर्द, वाघलगाव, लासिना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहिग्राम, शिर्शी या गावातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे..जून ते सप्टेंबर पीक नुकसान स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये अंदाजित)तालुका पेरणी क्षेत्र बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्रमानवत ४३२०२ ५३ ३९०१८ ३६६८१पाथरी ३६८५७ ५५ ४२३५१ ३३०२१सोनपेठ ३३५३६ ५२ ५२७७९ ३२८१५.गोदावरी नदी तसेच शिवारातून वाहणाऱ्या दोन उपनद्या, नाल्यांच्या बॅक वॉटरमुळे यंदाच्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे उत्पन्न बुडाले आहे. स्थळ पंचनामे करून आम्हाला शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी.सुग्रीव गिते, थार, ता. मानवत, जि. परभणी.गोदावरीला चार वेळा पूर आला. अडीच एकरांतील कपाशीपासून एका वातीसाठी देखील कापूस मिळणार नाही. शासनाने जाहीर केलेल्या मदतीतून खर्च देखील निघणार नाही. पंजाब सरकारप्रमाणे मदत द्यायला पाहिजे.संतोष पवार, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी..दर चार, पाच वर्षांनी गोदावरीच्या पुरामुळे कपाशी तसेच उसाचे नुकसान होते. यंदा अडीच कपाशी दहा फूट पाण्यात बुडाली होती. बोंडसकट पऱ्हाटी सडून गेली. भरीव मदतच तर द्यावीच कर्जमाफी पण करावी.साजीद अली, विटा खुर्द, ता. सोनपेठ, जि. परभणी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.