तुषार गांधीIndian Sustainable Development: शाश्वत विकास..हा राष्ट्रउभारणीचा पाया असतो. या विकासयात्रेमध्ये अगदी शेवटी उभ्या असलेल्या माणसाचं योगदानही तितकंच मोलाचं असतं. बापू तर नेहमीच या शेवटच्या मनुष्यमात्रासोबत उभे राहिलेले दिसतात. वेग... हा सांप्रत स्वयंचलित काळयंत्राचा सूत्रसंचालक बनू पाहत असताना गांधीजी आपल्याला पावला पावलाने पुढे जायला सांगतात. वेगात जसं थ्रिल दडलेलं असतं तसंच काहीतरी हातचं सुटून जाण्याचाही मोठा धोका असतो. .जे धावू शकत नाहीत ते या प्रवासात मागे पडू शकतात म्हणूनच गांधीजी आपल्याला वेग नियंत्रणाचं महत्त्व सांगताना दिसतात. कालौघात आपल्याला या तत्त्वज्ञानाचा विसर पडला आणि संथपणामध्ये आपल्याला कमीपणा वाटू लागला. पण संथगतीनं पुढं जाण्यातही एक सौंदर्यशास्त्र दडलेलं आहे. गांधीजी नेमका त्याचाच शोध घेताना दिसतात..बापूंशी निगडित प्रत्येक प्रतीक आपल्याला तोच संदेश देऊ पाहते. विकासवाटेवर बेभानपणे धावत सुटलेल्या माणसाच्या हातून पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे. दुष्काळ, महापूर आणि विविध साथीचे आजार ही संकटे आ वासून उभी ठाकली असताना मनुष्यजातीसाठी गांधी तत्वज्ञान हा एक मोठा आधार ठरू शकतो. राष्ट्रविकासासाठी मोठे प्रकल्प, कारखाने, बंदरे आणि दळणवळण सुविधा या आवश्यक असल्या तरी गरीब व श्रीमंत यांच्यातील वाढती दरी चिंताजनक म्हणावी लागेल..शाश्वत विकास न समजल्याने ही वेळ आली आहे. वेगाने धावणाऱ्याला आपल्या मागे पडत असलेल्या बांधवाचा हात धरायचा असतो. आपल्याला आज नेमका त्याचाच विसर पडलेला दिसतो. आजची व्यवस्था गरीबाला श्रीमंत नाही तर लाचार बनवू पाहते, कारण तिला त्याचा फायदा घ्यायचा असतो. केवळ निवडणुका तोंडावर आल्यानंतर राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या सवंग लोकानुनयी घोषणांतून नेमके तेच दिसून येतं. गरिबी निर्मूलन हा विद्यमान व्यवस्थेचा कार्यक्रम राहिलेला नाही. त्यामुळे तिला शेवटच्या माणसाचा विसर पडलेला दिसतो..Mahatma Gandhi Thoughts : प्रेम लाभे प्रेमळाला...हा गांधीविचार.बिहारमधील भूकंपानंतर बापूंनी काढलेल्या पदयात्रेचा उल्लेख करावासा वाटतो. मदतनिधी गोळा करण्यासाठी गांधीजी अखंड फिरत होते. त्यावेळी फाटके-तुटके मळकट कपडे घातलेला एक इसम त्यांचा पाठलाग करत होता. ‘’’’मला बापूंना भेटू द्या! त्यांच्याशी बोलायचे आहे,’’’’ असा आग्रह त्यानं धरला होता. हा भिकारी गांधीजींना काय मदत करणार, असा विचार करून काँग्रेसचे कार्यकर्ते त्याला टाळत होते; पण बापूंनी त्याला प्रेमानं जवळ बोलावलं, त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला..तो बापूंना पैसे देऊ पाहत होता... बापूंनी त्याच्याकडं चमकून पाहिलं. त्यानं खिशातून चार आणे काढले... ‘’’’ एक आणा मी ठेवतो तीन आणे तुम्ही घ्या!’’’’ असं त्यानं सांगितलं. गांधीजींचे सहकारी त्याच्यावर भडकले.. ‘’’’केवळ तीन आण्यासाठी तू इतका कशाला धडपडतो आहेस,’’’’ असं त्यांनी सुनावलं. पण त्या महात्म्यानं ते तीन आणे घेतले आणि डोक्याला लावले, हेच माझ्यासाठी मौल्यवान दान असल्याचं त्यांनी सांगितलं..‘’’’बिर्ला-बजाज मला लाखो रुपये देऊ शकतात कारण त्यांच्यासाठी ती किरकोळ रक्कम असते पण या माणसानं त्याचं सर्वस्व पणाला लावून हे पैसे गोळा केले आहेत, उद्या आपल्याला खायला मिळेल की नाही हेदेखील त्याला ठाऊक नाही पण त्यानं मला दिलेले तीन आणे खूप मौल्यवान आहेत,’’’’ बापूंचे हे उद्गार ऐकून काँग्रेस कार्यकर्ते अवाक् झाले. गांधीजीच्या दृष्टीनं शेवटच्या माणसाला हे इतकं महत्त्वाचं स्थान होतं. गरिबानं स्वावलंबी व्हावं म्हणून ते आग्रही असायचे. विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं मी देशभर फिरत असतो..मोठे प्रकल्प, बंदरे, विमानतळे अन् महामार्गांवरून विकास सुसाट वेगानं धावताना दिसला. नद्यांमध्ये भराव टाकून विस्तारत जाणारी महानगरं पाहिली की येऊ घातलेलं संकट नेमकं किती तीव्र असेल या विचारानंच धडकी भरते. वातावरणाचा लहरीपणा ही नित्याची बाब बनली आहे. आज हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या उत्तराखंड, हिमाचलप्रदेश या राज्यांत कोसळत चाललेले डोंगर, वारंवार घडणाऱ्या ढगफुटीसारख्या घटना पाहिल्या की विकासाची किती मोठी किंमत आपण मोजत आहोत हे दिसून येतं. अस्थिर असलेल्या हिमालयात आपण मोठ-मोठे प्रकल्प आणून नेमकं काय साध्य करू पाहतो?.Sustainable Development : शाश्वत विकासाचे नियोजन.स्वातंत्र्य, स्वदेशी समानार्थीअमेरिकी अध्यक्षांनी लादलेल्या आयातशुल्कामुळं आपल्याला पुन्हा स्वदेशीकडं वळावं लागलं. खरंतर गांधीजी जेव्हा स्वदेशीचा आग्रह धरतात तेव्हा ती संकल्पना स्वातंत्र्याला समानार्थी असते. आज जेव्हा आपण रोजगारासाठी स्वदेशीचा आग्रह धरतो तेव्हा ती एका अर्थाने गुलामगिरीच. आपण इथे आपल्याच लोकांना परकी भांडवलदारांच्या दारांत उभं करतो. आम्ही वेतन देतो त्यामुळं तुम्ही आमची केवळ चाकरी करा, अशी येथे दात्याची भावना आहे..यात स्वातंत्र्य कुठं आहे? गांधीजी स्वदेशी उत्पादनांचा आग्रह धरतात तेव्हा त्या उत्पादनप्रक्रियेमध्ये एक कुटुंब सामावलेलं असतं. प्रत्येकाची जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. लघु-कुटीरोद्यागाच्या माध्यमातून त्यांना एका कुटुंबाचं स्वावलंबन अपेक्षित होतं. भांडवलदार आणि जमीनदारांच्या हाती सूत्रं असताना लोकांची काय अवस्था झाली होती, हे त्यांनी जवळून पाहिलं होतं..वाढीव आयातशुल्काचा चक्रव्यूह तोडायचा असेल तर आपल्याला प्रत्येक घरात उद्योजक तयार करावा लागेल. गावे हीच उत्पादनकेंद्रे असावीत, असे गांधीजी म्हणत. ते आपल्याला करता आलं तर ती खरी स्वदेशी असेल. नाही तर उद्या नोकऱ्यांसाठी गावे रिकामी होतील अन् शहरे भरतील. आता असेच चित्र दिसते. कोरोना काळात शहरांतील रोजगाराला ब्रेक लागला होता तेव्हा याच खेड्यांनी त्यांच्या वाट्याची कोरभर भाकरी आपल्याला दिली होती, हे विसरता कामा नये. रोजगारनिर्मितीच्याबाबतीत पाश्चात्य नव्हे तर भारतीय प्रारूप अंगीकारावे लागेल. सेवाक्षेत्राचा आग्रह धरत आपल्या तरुणाईला परदेशात पाठविले..मग नवे उद्योजक अन् उत्पादन कसे तयार होणार? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं (एआय) आज बहुतांश क्षेत्रातील कामे ही ऑटोमाइज होत रोबोटिक्सवर आली आहेत. त्यामुळं पारंपरिक धाटणीचे रोजगार कमी होणार हे निश्चित... अशा परिस्थितीत स्थायी रोजगारनिर्मितीसाठी आपल्याला गांधी तत्त्वज्ञानच शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू शकतं. एक `रोबो’ दहाजणांचे काम करू लागला तर मात्र तुम्हाला नफा महत्त्वाचा की सामाजिक दायित्व याबाबत फैसला करावा लागेल. पाश्चिमात्य मॉडेल हे कदाचित रोबो निवडेल कारण त्यांच्याकडं काम करणारे हात कमी आहेत, आपल्याकडे तसं नाही. राष्ट्रीय अन् सामाजिक स्वास्थ्याच्यादृष्टीनं रोजगारनिर्मिती हा खूप महत्त्वाचा घटक आहे..शाश्वत विकासाचे इंजिनगांधीजींची सर्वोदय ही संकल्पना या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. त्यात सर्वांचं भलं अभिप्रेत आहे. शाश्वत विकासरूपी रेल्वेचं ते एक महत्त्वाचं इंजिन आहे. सामूहिक सामाजिक नफ्यामध्ये व्यक्ती ही थेट भागीदार असायला हवी. त्याचा लाभांश तिला मिळायला हवा. वैयक्तिक असो अथवा सार्वजनिक मालमत्ता.. आपण केवळ तिचे विश्वस्त आहोत, ही भावनाही महत्त्वाची. शाश्वत विकासाचे हेच खरे भारतीय प्रारूप. ती गांधीविचारांची मोठी देणगी आहे. सामाजिक ताणतणावाचा आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो..हे टाळायचं असेल तर मात्र सर्वोदयाला सौहार्दाची जोड द्यावी लागेल. समाज आणि असो अथवा कुटुंबव्यवस्था ही विश्वस्तपणाच्या भावनेवरच टिकून राहू शकते. हा विचार आपल्याला तरुणाईपर्यंत पोचवायला हवा. गांधीजींनी विविध ठिकाणांवर आश्रमांची उभारणी करून हेच प्रयोग केले. अनेक मूल्ये त्यांनी वैयक्तिक आचरणामध्ये आणून समाजाला संदेश दिला. तत्त्वविचार कृतीमध्ये आणणारे आदर्श आपल्याला घडवावे लागतील..गांधीजी आणि उद्योगघराणीराजसत्ता आणि उद्योगकारण हे हातामध्ये हात घालूनच चालत असतं. आजमितीस दोन्ही घटकांमधील संबंध हे स्वार्थाच्या भावनेवर आधारित आहेत. गांधीजींसोबत बिर्ला- बजाज होते; पण बापू कधीही त्यांच्या आहारी गेले नाहीत. बिर्लांच्या कोलकत्यातील ज्यूटच्या कारखान्यात कामगारांनी संप पुकारला होता. त्यावेळी गांधीजी हे बिर्लांच्याच घरी होते. यावर कामगार नेते भडकले. गांधीजी भांडवलदारांच्या बाजूने उभे राहिले, अशी त्यांची भावना त्यावेळी झाली..पण गांधीजींनी मात्र त्यावेळी समतोल भूमिका घेतली. कामगारांच्या मागण्यांत तथ्य आहे, असं दिसताच त्यांनी त्या बिर्ला यांना त्या मान्य करायची सूचना केली होती. नव्यानं कारखाना काढू पाहणाऱ्या बजाज यांना ‘‘आता आणखी किती कमावणार?’’, संतुष्ट होऊन राहा, असे सांगायला गांधीजी कचरले नाहीत. ते हे सांगू शकले, कारण यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीही नव्हता.(लेखक हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू आहेत.)शब्दांकन : गोपाळ कुलकर्णी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.