अमोल साळेग्रामीण महाराष्ट्राची पूर्वीची ओळख ‘काटकसर’ आणि ‘बचत करण्याची सवय’ अशी होती. शेतीत उत्पन्न आल्यावर तो नफा अधिक उत्पादक रीत्या गुंतवला जाई. ‘जेवढं अंथरूण आहे, तेवढेच पाय पसरावे’ हा विचार घरोघरी रुजलेला होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज गावागावांत ‘चंगळवादा’चे वारे वाहू लागले आहे. आकर्षक जीवनशैली आणि हप्ते भरण्याची संस्कृती यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात समाज आपल्या भविष्याचा पाया पोखरत चालला आहे. यावर प्रत्येक कुटुंबाने गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे..‘आरबीआय’चा इशारानुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अहवालानुसार, भारतातील कौटुंबिक निव्वळ आर्थिक बचत ४७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच जीडीपीच्या ५.१ टक्के वर आली आहे. दुसरीकडे, कुटुंबांवरील आर्थिक दायित्व (कर्ज) ५.८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ असा, की आपण कमावतो त्यापेक्षा खर्च जास्त करतोय किंवा खर्चासाठी कर्जावर अवलंबून आहोत. ग्रामीण महाराष्ट्रातही हेच चित्र दिसत आहे. उत्पन्नाचा स्रोत मर्यादित असताना ‘खर्च’ मात्र शहराच्या तोडीस तोड होत आहेत. जेव्हा आपली बचत कमी होते, तेव्हा भविष्यात येणाऱ्या संकटांना (उदा. दुष्काळ, शेतीमालाचे पडलेले भाव) तोंड देण्याची आपली क्षमता संपते..Rural Festival: भाजीभाकरी प्रसादासाठी भाविकांची गर्दी .कर्जाचा विळखानॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या (NSS ७७ वी फेरी) अहवालानुसार, महाराष्ट्रातील ५४ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी आहेत. राज्याची सरासरी थकबाकी प्रति कुटुंब ८२,०८५ रुपये इतकी आहे. सर्वात धक्कादायक वास्तव हे आहे, की घेतलेल्या एकूण कर्जापैकी केवळ ५७.५ टक्के कर्ज हे शेतीकामासाठी (उत्पादक) वापरले जाते. उर्वरित ४२.५ टक्के कर्ज हे घरगुती खर्च, सण-उत्सव आणि चैनीच्या वस्तूंसाठी घेतले जाते.शेतीसाठी घेतलेले कर्ज हे पीक आल्यावर फेडता येते, पण चैनीसाठी किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी घेतलेले कर्ज हे पिढ्यान्पिढ्या मागे लागते. हा ‘अनुत्पादक खर्च’ हेच ग्रामीण गरिबीचे मुख्य कारण ठरत आहे..तुलनेचा सापळाग्रामीण भागात चंगळवाद वाढण्यामागे ‘तुलनेचा सापळा’ हे सर्वांत मोठे मानसशास्त्रीय कारण आहे. ‘शेजाऱ्याने गाडी घेतली, मग मी का नको? किंवा त्यांच्या मुलीचं लग्न धुमधडाक्यात झालं, मग माझ्या मुलाचंही तसंच व्हायला हवं,’ ही भावना आज घराघरांत शिरली आहे. सोशल मीडियाच्या आजच्या युगात, जीवनातील स्पर्धा एक नवीन आणि अधिक तीव्र स्वरूप घेत आहे. पूर्वी स्पर्धा केवळ प्रत्यक्ष जीवनातील शेजारी, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांशी असायची, पण आता ती आभासी जगातही पसरली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर सतत दिसणारे इतरांचे उत्तम जीवनशैलीचे प्रदर्शन, ही या तीव्रतेची मुख्य कारणे आहेत..Rural Story: हरवलेला दुपारचा प्रहर.जेव्हा आपण इतरांचे महागडे, ब्रँडेड मोबाइल फोन्सचे फोटो, त्यांच्या आलिशान घरांच्या किंवा चकचकीत गाडीचे फोटो आणि पोस्ट्स पाहतो, तेव्हा नकळतपणे आपल्या मनात एक तुलना सुरू होते. ही तुलना आपल्याला सतत ‘आपले जीवन त्यांच्याइतके चांगले का नाही,’ असा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते. या सततच्या प्रदर्शनामुळे, आपल्यालाही त्याच पद्धतीने वागावे, त्याच वस्तू खरेदी कराव्यात, त्याच ठिकाणी फिरावे असे तीव्रतेने वाटू लागते..ही केवळ दिखाऊगिरी नसून, सामाजिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची आणि इतरांच्या बरोबरीने उभे राहण्याची एक आंतरिक इच्छा असते. या अंधानुकरणामुळे व्यक्ती स्वतःच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता, केवळ ‘स्टेट्स’ राखण्यासाठी अनावश्यक खर्च करते, ज्यामुळे कर्जबाजारी होणे किंवा आर्थिक ताण वाढणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. सोशल मीडियाने या ‘नक्कल करण्याच्या’ प्रवृत्तीला एक विशाल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, जिथे प्रत्येकजण आपल्या जीवनाचा केवळ एक आकर्षक पण मर्यादित भाग जगासमोर मांडत आहे. त्यामुळे इतरांवर दडपण वाढत जाते. ही तुलना आपल्याला अशा वस्तू खरेदी करायला भाग पाडते ज्यांची आपल्याला गरज नसते, केवळ समाजाला ‘दाखविण्यासाठी’ आपण स्वतःचा खिसा रिकामा करतो..Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी .लग्नाचा बडेजावग्रामीण भारतातील शेतकरी आणि इतर घटकांसाठी कर्जाच्या वाढत्या ओझ्यामागे अनेक कारणे असली तरी, ‘लग्नावरील अवाढव्य खर्च’ हे त्यापैकी एक प्रमुख आणि चिंताजनक कारण आहे. अनेक सर्व्हे आणि विस्तृत अहवालांनी हे तथ्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. एका मध्यमवर्गीय किंवा गरीब शेतकरी कुटुंबासाठी, मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाचा सोहळा हा केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसतो, तर तो कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो..ग्रामीण समाजात लग्नाच्या वेळी मोठेपणा दाखविण्याची, पारंपरिक विधींसाठी मोठा खर्च करण्याची आणि वधू-वर पक्षांना भरमसाट हुंडा किंवा भेटवस्तू देण्याची एक अनावश्यक स्पर्धाच निर्माण झाली आहे. या सगळ्या ‘सामाजिक दबावा’मुळे होणारा एकूण खर्च अनेकदा एका सामान्य शेतकरी कुटुंबाच्या दोन ते तीन वर्षांच्या सरासरी उत्पन्नापेक्षाही जास्त असतो. उदाहरणार्थ, जर एका कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये असेल, तर लग्नाचा खर्च पाच ते दहा लाखांपर्यंत सहज पोहोचू शकतो..Rural Employment: ऊस पाचटापासून मूल्यवर्धनासह रोजगार निर्मिती.या बाबतीत पुढील दोन मुद्दे निर्णायक ठरतातसांस्कृतिक दबाव ः समाजातील मानमरातब जपण्यासाठी कर्ज काढून केलेली मोठी जेवणावळ, डीजे आणि अफाट रोषणाई यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडते.वास्तव ः ज्या लग्नाचा थाट चार तास टिकतो, त्याचे हप्ते फेडण्यासाठी शेतकऱ्याला चार ते पाच वर्षे रक्ताचे पाणी करावे लागते. अनेकदा यासाठी हक्काची जमीन विकली जाते किंवा गहाण ठेवली जाते. ही सामाजिक प्रतिष्ठा नसून एक प्रकारचा ‘आर्थिक आत्मघात’ आहे.ईएमआय संस्कृती आणि स्मार्टफोन ः आज गावागावांत ‘शून्य टक्का व्याज’ आणि ‘सुलभ हप्ते’ (EMI) या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. २०-३० हजारांचा स्मार्टफोन किंवा महागडी दुचाकी घेताना हप्ता लहान वाटतो. पण असे तीन-चार हप्ते मिळून आपल्या हातात येणारी रोकड पूर्णपणे संपवून टाकतात. स्मार्टफोन ही आज गरज असली, तरी दरवर्षी नवा मॉडेल घेण्याचा मोह हा चंगळवादाचा भाग आहे. वस्तूची किंमत दुकानातून बाहेर पडताच कमी होते, पण त्याचे हप्ते आणि व्याज मात्र वाढतच राहते..चंगळवादापासून वाचण्यासाठी काय करावे?या प्रश्नावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर कृती करावी लागेल. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास आपण या चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर पडू शकतो,‘गरज’ आणि ‘इच्छा’ यातील फरक ओळखा : कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा- ‘या वस्तूशिवाय माझे काम अडणार आहे का?’ जर उत्तर ‘नाही’ असेल, तर ती वस्तू घेण्याचा विचार किमान ३० दिवस पुढे ढकला. याला ‘३०-दिवसांचा नियम’ म्हणतात. ३० दिवसांनंतर अनेकदा तो मोह ओसरलेला असतो.‘प्रदर्शनापेक्षा प्रगती’ला महत्त्व द्या : घराबाहेर उभी असलेली महागडी गाडी तुमची प्रतिष्ठा वाढवत नाही, तर तुमच्या मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि तुमची बचत ही तुमची खरी ताकद असते. समाजात ‘दिसण्यापेक्षा’ आर्थिकदृष्ट्या ‘असण्याला’ महत्त्व द्या..Rural Development: सुसंवादाने सोडविला वादातील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न.गुंतवणुक सुरू करा : मोबाइल किंवा गाडीचा हप्ता भरण्यापेक्षा गुंतवणुक सुरू करा. शेतीचे उत्पन्न हातात आल्यावर आधी बचत बाजूला काढा आणि मगच उरलेला पैसा खर्च करा. नियमित केलेली छोटी गुंतवणूक चक्रवाढ व्याजाच्या जोरावर भविष्यात मुलांचे लग्न किंवा शिक्षणासाठी मोठा निधी उभा करू शकते. यामुळे तुम्हाला कोणापुढेही हात पसरण्याची वेळ येणार नाही.साधेपणाने लग्न : लग्नातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी साध्या पद्धतीने विवाह करण्याला प्राधान्य द्या. लग्नावर खर्च होणारा पाच-दहा लाख रुपयांचा निधी जर तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवला, तर त्यांच्या आयुष्याची सुरुवात कर्जमुक्त आणि सुखद होईल..आपत्कालीन निधी : शेती हा अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. किमान सहा महिन्यांचा घरखर्च चालेल इतकी रक्कम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा पीक बुडाल्यामुळे सावकारी कर्जाच्या दारात जावे लागणार नाही.सोशल मीडियाचा प्रभाव कमी करा : दुसऱ्यांच्या जगण्याशी स्वतःची तुलना करणे थांबवा. सोशल मीडियावर जे दिसते ते सर्व सत्य नसते. स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा..चंगळवाद हा एक असा आजार आहे जो तात्पुरते सुख देतो; पण कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक संकटात लोटतो. परंतु, या चंगळवादाच्या प्रवाहापासून स्वतःला वाचविण्यासाठी धोपट मार्गापेक्षा वेगळा विचार करण्याची आणि एकट्याने उभे राहण्याची हिंमत असणे आवश्यक आहे. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून, रूढ सामाजिक दबावांना झुगारून देणारा स्वतंत्र विचारच आर्थिक गुलामगिरीतून मुक्ती देतो..भविष्यातील आर्थिक चिंता टाळण्यासाठी आता स्वतःसाठी भक्कम तयारी करणे आवश्यक आहे. जुन्या पिढीतील बचतीच्या चांगल्या सवयींना आजच्या आधुनिक गुंतवणुकीच्या मार्गांची योग्य जोड दिल्यास आपली आर्थिक स्थिरता आणि समृद्धी कायम राखता येईल.लक्षात ठेवा, ‘तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल अशी व्यवस्था करा, तुम्हाला पैशासाठी आयुष्यभर राबावे लागेल अशी स्थिती निर्माण करू नका.’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.