Farmer Festival: गेल्या आठवड्यात विदर्भातील एका गावामध्ये बैलपोळ्याऐवजी ट्रॅक्टर पोळा साजरा झाल्याचे वृत्त काहींनी वाचले असेल. पंधराशे लोकवस्तीच्या या गावात काही वर्षांपूर्वी दीडशे बैल होते. त्यांची संख्या कमी कमी होत जेमतेम दहापर्यंत आली आणि दुसरीकडे ट्रॅक्टरची संख्या २५ पर्यंत वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाची दखल घेत बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरला सजवून त्यांचा पोळा साजरा केला! ही परिस्थिती म्हणजे गेल्या काही वर्षातील कृषी क्षेत्रात होणारे सततचे स्थित्यंतराचे उदाहरण व त्याहीपेक्षा येणाऱ्या काही वर्षात आणखी वेगाने होऊ घातलेले बदल याची काहीशी नांदी म्हणून बघावे लागेल. .कृषिप्रधान भारत देशाची परिस्थिती गेल्या ४० वर्षांत वेगाने बदलली आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना नक्की माहिती आहे की सकल राष्ट्रीय उत्पन्नात आता सेवा क्षेत्र सुमारे ६० ते ६५ टक्के, औद्योगिक उत्पादन क्षेत्र साधारण २० ते २५ टक्के आणि उरलेले फक्त १३ ते १५ टक्के शेतीचे योगदान आहे. हेच आकडे स्वातंत्र्यापूर्वी जवळपास उलटे होते. एकीकडे सेवाक्षेत्राची भरभराट होत असताना देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण मात्र फारसे कमी झालेले नाही. कितीही शहरीकरण होते अशी तज्ञांनी व अभ्यासकांनी ओरड केली व सांख्यशास्त्र तसे सांगत असले तरी ६० टक्के लोकसंख्या ही अजूनही शेती व शेतीच्या संबंधित उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यामुळेच एकीकडे शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची संख्या तर कमी होत नाही पण शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा घटला आहे, हे कोडे सोडवताना तज्ञांचीही दमछाक होते आहे..BailPola: बैलपोळा; शेतकऱ्यांचा सण.कृषीतील यांत्रिकीकरणमहाराष्ट्रात कृषी क्षेत्रामध्ये अवजारांचा वापर सुरू करण्याचे श्रेय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना जाते. एकेकाळी प्रचलित असलेला लाकडी नांगर बाजूला ठेवून त्याऐवजी लोखंडाचा नांगर वापरण्यासाठी त्यांनी सायकलवरून गावोगावी जाऊन प्रसार केला. आजच्या भाषेमध्ये डायरेक्ट मार्केटिंग! १९७० च्या दशकात हरित क्रांतीनंतर देशभरात सर्वत्र छोट्या व मोठ्या कृषी साधनांच्या वापरास सुरुवात झाली, त्याचा प्रसार झाला व शेतकऱ्यांची पसंतीही वाढली. मळणी यंत्रापासून ट्रॅक्टर अशा अनेक यंत्रांची बाजारात भर पडली. शेतकऱ्यांना या साधनांमुळे श्रम कमी होतात, उत्पादकता वाढते हे लक्षात आल्यामुळे नवी यंत्रे विकत घेतली..परवडणाऱ्या किंमतीत यंत्रे तयार करणाऱ्या छोट्या शहरातील लघु-मध्यम उद्योगापासून मोठे नामांकित उद्योग समूह कृषीसाठी लागणाऱ्या उत्पादनात उतरले. आज आपल्यासमोर शेतीचे अनेक प्रश्न उभे आहेत. कोणत्याही मध्यम आकाराच्या शेतकऱ्याला विचारले की शेती करण्यात काय अडचणी आहेत तर अडचणीच्या पाढ्यामध्ये बेभरवशाचे बाजारभाव हे उत्तर पहिले असू शकेल. त्यापाठोपाठ शेतीसाठी पुरेशा संख्येने मजूर मिळत नाहीत, हा प्रश्न नक्की ऐकायला मिळतो. एकीकडे खेडेगावात बेरोजगारांची फौज आणि शेतीत काम करायला मजूर नाहीत किंवा असलेल्या मजुरांची मजुरी परवडत नाही किंवा हव्या त्या वेळेस योग्य त्या संख्येने मजूर मिळत नाहीत..कारण एकाच वेळेस अनेकांना तेच काम करायला मजूर लागतात आणि तेवढ्या संख्येने मजूर गावात नाहीत, अशी अनेक उदाहरणे शेतकरी देत असतात. गाय, बैल, म्हशी यांना पशुधन म्हणून संबोधण्याचा रिवाज आहे. पण एकेकाळचे हे पशुधन आता मानेवरचा बोजड जोखड बनल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांशी बोलताना असे लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये बैलजोडी सांभाळणे याचा न परवडणारा खर्च सोसावा लागतो. हातात कसण्यासाठी असलेली (कुटुंबात विभागलेली) जमीन, बैलजोडीचा वर्षभरातील वापराचे दिवस, वर्षभरातील बिनवापराचे दिवस व बैलजोडीवर होणारा खर्च याचे व्यस्त गणित अनेक शेतकरी बोलून दाखवतात..Bailpola Festival 2025: समभावाचा सण : बैलपोळा.त्यामुळेही बैलजोडीऐवजी कर्ज काढून ट्रॅक्टर विकत घेतलेला परवडला असाही शेतकऱ्यांचा कल दिसतो. असलेला ट्रॅक्टर स्वतःचे शेतीचे काम झाल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने द्यायचा, व नंतर रस्त्याच्या व अन्य कामासाठी भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवणे असाही काही जण व्यावहारिक विचार करतात. गेल्याच आठवड्यात साखर कारखान्यांनी ऊस तोडण्यासाठी मजुरांच्या ऐवजी ऊसतोडणी यंत्र वापरण्याबद्दल वृत्त होते. शेतीतील यांत्रिकीकरण हे एकीकडे वेग व उत्पादकता वाढवण्यासाठी साहाय्यक आहे पण त्याच बरोबरीने हे काम करणाऱ्या हातांचे काय, हा प्रश्न आहे..यंत्रे-अवजारे परवडणारी?एकीकडे यांत्रिकीकरण तर उपयुक्त होत आहे पण ते अल्प व मध्यम आकाराच्या जमिनीच्या शेतकऱ्याला परवडणाऱ्या किमतीत मिळतात का, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. आज मोठ्या ट्रॅक्टरची किंमत (अश्वशक्तीवर अवलंबून) आठ ते दहा लाख आहे. असे अजस्र धूड अर्थातच अगदी मध्यम आकाराची शेती करणाऱ्या व्यक्तीच्याही आवाक्याबाहेरचे आहे. मुळात जिरायती शेतीत कोणता शेतकरी इतके भांडवल निर्मिती करू शकतो? आणि शिवार जरी मोठे असले तरी बैलासारखाच ट्रॅक्टरही किती काळ शेतीत व अन्य कामासाठी वापरता येणार? यावर उपाय म्हणून अशी छोटी व मध्यम आकाराची अवजारे व यंत्रे भाड्याने देण्याची व्यवस्था असते..गेल्याच महिन्यात लोहारा तालुक्यात हराळी येथे ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने असा ‘अवजार बँकेचा’ प्रयोग वर्षभर यशस्वी केल्याचे पाहण्यात आले. सुमारे ७० लाख किमतीची साधारण लहान मोठी ६५ ते ७० शेतीसाठी उपयुक्त यंत्रे-अवजारे संस्थेने रोटरी क्लब लातूरच्या अर्थसाहाय्यातून खरेदी करून शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर वापरायला दिली. संस्थेचे कार्यकर्ते सुरेश मरगळे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे वर्षभरात या ‘बँकेचा; फायदा परिसरातील २५ गावातील ७०० शेतकऱ्यांना झाला. साधारण ६.५ लाख भाडे जमा झाले. एक वेगळा स्थानिक व्यवसाय उभा करण्याचे शिक्षणही पाच तरुण शेतकऱ्यांचे झाले..शेती यांत्रिकीकरणात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्या यंत्राचा आकार व अर्थातच किंमत. टाटा समूहाने अनेक वर्षांपूर्वी माध्यम वर्गास परवडणारी १ लाख रुपयाची गाडी तयार केली होती. नवीन तंत्रज्ञान व यंत्रे महागडी म्हणजे जास्त भांडवल लागणारी, बोजड, छोट्या तुकड्यात विभागलेल्या शेतीत वापरण्यास सोयीची नसतील तर त्याचा उपयोग काही विशिष्ट शेतकरीच करू शकतील. बैलपोळ्याकडून ट्रॅक्टर पोळ्याकडे जात असताना असे नवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. ड्रोन दीदी या केंद्र सरकारच्या योजनेत बचत गटातील महिलांनी ड्रोन भाड्याने देण्याचा व्यवसाय करावा अशी कल्पना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक बदलांमागची प्रेरणा व स्फूर्ती स्त्रीकेंद्रित व छोटा-मध्यम भूधारक असेल तर वेगाने होणारे यांत्रिकीकरण शेतीतले काबाडकष्ट काही तरी कमी करून सुखद होतील अशी अशा करूयात.(लेखक आर्थिक-सामाजिक विकास प्रक्रियेचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.