कर्जबुडव्या बड्या उद्योगपतींचे लाड करणारी आपली व्यवस्था लाखभर रुपयाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यावर मात्र किडनी विकण्याची वेळ आणते.एक शेतकरी एक लाख रुपयांचे कर्ज सावकारांकडून घेतो. सावकार मनमानी चक्रवाढ व्याज आणि दिवसाकाठी दंड लावतो. कर्जाची रक्कम तब्बल ७४ लाखांवर जाते. शेतकरी हे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या सावकारांकडून आणखी कर्ज घेतो. व्याज फेडता फेडताच त्याच्या तोंडाला फेस येतो. सावकाराचा ससेमिरा मागे लागतो. तो आपले घर, जमीन, ट्रॅक्टर, पत्नीचे दागिने सगळे काही विकतो. .अखेर कंबोडियात जाऊन आठ लाखाला किडनी विकतो. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रातील रोशन कुडे यांची ही कर्मकहाणी. ही माणुसकीला काळिमा फासणारी लांच्छनास्पद घटना. आपला समाज आणि इथली व्यवस्था किती किडलेली आहे याचे विद्रूप दर्शन या निमित्ताने घडते. ही केवळ एका शेतकऱ्याची अपवादात्मक कहाणी नाही; तर असे शेकडो रोशन या व्यवस्थेच्या चरकात पिळून निघत आहेत..Farmer Debt Issue: रासायनिक निविष्ठांमुळे शेतकरी कर्जबाजारी.लहान, गरीब शेतकऱ्यांना आणि थकित कर्जदारांना बॅंका दारात उभे करत नसल्यामुळे त्यांना सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यात अवैध सावकारीचे प्रमाण मोठे आहे. अधिकृत सावकारीसाठी सरकारने नियम केलेले आहेत. पण ते कागदावरच राहतात. एकदा का शेतकरी सावकारी पाशात अडकला, की त्याची सुटका होणे कठीण. या सावकारांविरोधात दाद मागितली तरी त्याची तड लागत नाही..रोशन खुडे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चार महिन्यांपासून दारोदार फिरत होते. खुडे यांच्यासारख्या अभावग्रस्त, सर्वार्थाने वंचित शेतकऱ्यांना नाडणारी इथली व्यवस्था बड्या धनिक, उद्योगपतींसमोर मात्र मान तुकवते. केंद्र सरकारने २०१४ ते २३ या काळात बड्या उद्योगपतींचे जवळपास १४ लाख कोटींचे कर्ज निर्लेखित केले. बडे कर्जदार बॅंकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेले. आणि शेतकऱ्यावर मात्र लाखभर रुपयाच्या कर्जामुळे किडनी विकण्याची वेळ येते..Farmer Debt Trap: कर्जबाजारीपणाचा सापळा.एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ का येते? सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेती हा तोट्याचा आणि दिवाळखोरीचा धंदा झाल्याचा हा परिणाम आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नाही. दुसरीकडे पाणी, वीज, माल साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक, सक्षम बाजारव्यवस्था आदी पायाभूत सुविधांची आपल्याकडे बोंब असल्यामुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती क्षीण असते..शेतीत सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून मोठी भांडवली गुंतवणूक होत नाही. निसर्गाने साथ दिली आणि चांगले उत्पादन आले, की सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडते. सरकारची धोरणे ग्राहककेंद्री आणि शेतकऱ्यांची उपेक्षा करणारी आहेत. शेतीची अशी चहूबाजूंनी कोंडी झाल्यामुळे निराश झालेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात..एक समाज म्हणून हे आपले सामूहिक अपयश आहे, परंतु आज त्याची कोणास ना खंत ना खेद! राज्यकर्ते केवळ निवडणुका जिंकण्यात आणि सत्तेची दुभती गाय पिळून काढण्यात मशगूल आहेत. विरोधी पक्ष गलितगात्र आहेत. शेतकरी संघटनांचा शक्तिपात झाला आहे. आणि समाज दिवसेंदिवस अधिकाधिक बथ्थड, संवेदनाहीन होत चालला आहे..शेतकरी आत्महत्या किंवा शेतकऱ्याला किडनी विकावी लागणे या घटनांमुळे आजकाल समाजाच्या कातडीवर ओरखडाही उमटेनासा झाला आहे. शेती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि अन्नसुरक्षेचा स्रोत असल्यामुळे शेतीची अशीच दुरवस्था झाली तर देशाला त्याची दीर्घकालीन जबर किंमत मोजावी लागेल; शेतकरी आज जात्यात आहे पण समाजातील बाकी घटक सुपात आहेत, याची जाणीव आज करून देण्याची वेळ आली आहे. व्यवस्था परिवर्तन झाल्याशिवाय या गुंतागुंतीच्या अरिष्टावर मार्ग निघणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.