डॉ. आनंद गोरे, सुरेश खटिंगFodder Management: संभाव्य चाराटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध हिरवा चारा, कडबा, पिकांचे अवशेष, वाळलेला चारा आणि इतर स्रोतांचे नियोजन करावे. उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती, चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे आणि सामूहिक चारा व्यवस्थापन या बाबींवर भर देणे गरजेचे आहे..सध्याच्या परिस्थितीत गावपातळीवर उपलब्ध संसाधनांचा एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक आहे. गावातील विहिरी, बोअरवेल, शेततळी, पाइपलाइन, मोटारपंप, तुषार संच, उपलब्ध चारा, कडबा, मूरघास, कुट्टी मशीन आणि वाहतूक साधने यांची माहिती संकलित करून त्याचा सामूहिक वापर करण्याचे नियोजन करता येऊ शकते. यासाठी शेतकरी, ग्रामपंचायत, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, पशुसंवर्धन विभाग, दूध उत्पादक संस्था, शेतकरी गट आणि स्थानिक संस्थांमध्ये समन्वय आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचे प्रमाण, पिकांची स्थिती, सिंचनाची साधने, उपलब्ध चाऱ्याचा साठा आणि पशुधनाची संख्या यांचा एकत्रित आढावा घेऊन कृती आराखडा तयार करता येईल..Crop Management: पावसाच्या खंड काळातील उपाययोजना.रब्बी हंगामाचे नियोजनखरीप हंगामातील पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा लक्षात घेता रब्बी हंगामाचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. उपलब्ध ओलावा, जमिनीचा प्रकार, पुढील पावसाची शक्यता आणि उपलब्ध संरक्षित सिंचन यांचा विचार करून कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देता येईल..स्थानिक परिस्थितीनुसार जवस, करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचा विचार करता येईल. मात्र कोणते पीक घ्यायचे याचा निर्णय घेताना जमिनीतील ओलावा, पेरणीची योग्य वेळ, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषी हवामान सल्ला यांचा विचार करणे आवश्यक आहे. रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी शेताची योग्य मशागत करून ठेवावी. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर उपलब्ध ओलावा जास्तीत जास्त काळ टिकविण्यासाठी आवश्यक मृदा व जलसंधारण उपाययोजना करणे फायदेशीर ठरेल..कडधान्यवर्गीय चाऱ्याचा समावेशफक्त ज्वारी, मका किंवा बाजरीसारख्या गवतवर्गीय चाऱ्यावर पशुधनाचा आहार आधारित ठेवण्याऐवजी उपलब्धतेनुसार लुसर्न, बरसीम, चवळी, गवार किंवा इतर कडधान्यवर्गीय चाऱ्याचा योग्य प्रमाणात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. कडधान्यवर्गीय चाऱ्यामध्ये सामान्यतः गवतवर्गीय चाऱ्यापेक्षा प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने आहारातील प्रथिनांचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते.उपलब्ध हिरवा चारा, कोरडा चारा, कडधान्यवर्गीय चारा, संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी यांचा संतुलित वापर करण्यावर भर द्यावा. विशेषतः दूध देणाऱ्या जनावरांसाठी खनिज मिश्रणाचा वापर पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे महत्त्वाचे आहे..कोरड्या कडब्यावर युरिया प्रक्रियानिकृष्ट प्रतीच्या तंतुमय कोरड्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा उपलब्ध ज्वारीचा कडबा, गव्हाचा भुसा/ कडबा किंवा इतर कोरड्या तंतुमय चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी २ ते ४ टक्के युरिया प्रक्रिया प्रभावी तंत्र आहे. युरिया उपचाराचा वापर करता येतो. तांत्रिकदृष्ट्या २ ते ४ टक्के युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत वापरता येते.चार टक्के युरिया प्रक्रिया करताना १०० किलो कोरड्या कडब्यासाठी ४ किलो युरिया आणि साधारण ५० लिटर पाण्याचा वापर करावा. तयार द्रावण योग्य पद्धतीने कडब्यावर शिंपडून घ्यावे. त्यानंतर कडबा थरांमध्ये भरून दाबून हवाबंद स्थितीत ठेवण्याची काळजी घ्यावी. त्यानंतर २१ दिवसांनंतर कडबा उघडल्यानंतर ताबडतोब मोठ्या प्रमाणात जनावरांना देऊ नये. कडबा काही काळ हवेशीर ठेवून मुक्त अमोनिया बाहेर जाऊ द्यावा. तीव्र अमोनियाचा वास कमी झाल्यानंतरच तो योग्य प्रमाणात जनावरांना द्यावा..Livestock Fodder Management: चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे व्यवस्थापन.ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. युरिया थेट जनावरांना खाऊ घालायचा पदार्थ नाही. अयोग्य प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे पशुधनाला विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे युरिया उपचाराची अंमलबजावणी कृषी किंवा पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. साधे मीठ आणि गुळाचे पाणी (१ ते ४ टक्के) यांची प्रक्रियाही करता येते आणि चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते..पशुधनासाठी चारा सुरक्षापावसाच्या दीर्घ खंडाचा परिणाम खरीप पिकांबरोबरच पशुधनासाठी चाऱ्यावरही होतो. त्यामुळे चाराटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध हिरवा चारा, कडबा, पिकांचे अवशेष, वाळलेला चारा आणि इतर स्रोतांचे नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती, चाऱ्याची पौष्टिकता वाढविणे आणि सामूहिक चारा व्यवस्थापन या बाबींवर भर देणे गरजेचे आहे.उपलब्ध हिरवा चारा मोठ्या प्रमाणात एकाच वेळी जनावरांना देण्याऐवजी त्याचे नियोजनबद्ध वाटप करावे. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि इतर पिकांपासून उपलब्ध होणारे अवशेष चारा म्हणून वापर करावा. या अवशेषांचे योग्य कुट्टीकरण करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक केल्यास पुढील काळातील चाराटंचाई कमी करण्यास मदत होऊ शकते..कडबा व इतर कोरडा चारा पावसापासून सुरक्षित, हवेशीर आणि शक्यतो जमिनीच्या थेट संपर्कापासून दूर ठेवावा. ओलसर किंवा बुरशी आलेला चारा जनावरांना देणे टाळावे. योग्य साठवणूक केल्यास उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात टिकवता येते.पाणी अत्यंत मर्यादित असल्यास मोठ्या क्षेत्रावर चारा पीक घेण्याऐवजी आवश्यक पशुधनासाठी मर्यादित क्षेत्रात संरक्षित सिंचनाखाली चारा उत्पादन करण्याचे नियोजन करता येईल. उपलब्ध पाणी, पेरणीची वेळ, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक हवामान लक्षात घेऊन ज्वारी, बाजरी, मका, बरसीम किंवा लुसर्न यांसारख्या चारा पिकांचा विचार करता येतो..चारा पिकांची निवड स्थानिक परिस्थितीनुसार करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास बहुवर्षायू चारा पिकांचाही विचार करता येईल. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्यास चारा उत्पादनासाठी उपलब्ध संसाधनांवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.सध्या उपलब्ध असलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करून ठेवणे हा आगामी चाराटंचाईच्या काळासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो. मका, ज्वारी, बाजरी किंवा इतर योग्य अवस्थेतील हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करता येतो. योग्य पद्धतीने तयार केलेला मुरघास साठवून ठेवता येतो आणि चारा उपलब्धता कमी झालेल्या काळात त्याचा वापर करता येतो. मुरघास तयार करताना चारा योग्य अवस्थेत कापणे, साधारण २ ते ३ सेंमी कुट्टी करणे, योग्य प्रमाणात कोरडे पदार्थ राखणे, चारा घट्ट दाबून त्यातील हवा काढणे आणि हवाबंद पद्धतीने साठवणे महत्त्वाचे आहे. योग्य किण्वन झाल्यानंतरच मूरघास पशुधनाला द्यावा..गावपातळीवर शेतकरी गट, दूध उत्पादक संस्था, बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सामूहिक मुरघास निर्मिती व साठवणूक केंद्र उभारण्याचा विचार करता येऊ शकतो. यामुळे लहान व सीमांत पशुपालकांनाही या तंत्रज्ञानाचा लाभ मिळू शकतो.डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.