Fodder Shortage: लातूर, धाराशिव दोन्ही जिल्ह्यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात चारा व पाणीटंचाईला प्राधान्य देण्यात आले असून, त्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाने हाती घेतल्या आहेत. यातूनच धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्याबाहेर चारा विक्री व वाहतुकीला बंदी घातली आहे. चाराबंदीचे उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हास्तरीय वॉर रूमची स्थापना केली आहे..धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या गोठ्यात चारा कमी पडू नये आणि उपलब्ध चाऱ्यासाठी पशुपालकांची धावपळ होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे..Drought Management: दुष्काळातून आपण कधी शिकणार?.जिल्ह्यातून चारा बाहेर पाठविण्यावर सक्त प्रतिबंध करण्यात आला असून, उपलब्ध चारा प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि गोशाळांमधील पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश पुजार यांनी दिले आहेत. काही भागांतून जिल्ह्याबाहेर चारा इतर कारणांसाठी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे..यामुळे जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा, उदाहरणार्थ कडबा, सुका चारा, घास, वाडे इत्यादी जिल्ह्याबाहेरील अन्य जिल्ह्यांत कोणत्याही व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक, व्यापारी आणि संस्थांनी त्यांच्याकडील चारा प्रथम स्थानिक स्तरावर जिल्ह्यातील शेतकरी व गोशाळांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे..दुष्काळ जाहीर झालेल्या लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश दिले आहेत. यासोबतच दुष्काळग्रस्त भागात विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी सवलतींची प्रभावी अंमलबजावणी आणि पंचनामेविषयक कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले..Drought Notification: दुष्काळाची अधिसूचना आज: मुख्यमंत्री फडणवीस.पिण्याच्या पाण्याचे आणि पशुधनासाठी चारा याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास संबंधित गावाला पाणीपुरवठ्याचे पर्यायी जलस्रोत अगोदरच निश्चित करून ठेवावेत. तसेच उपलब्ध चारा आणि उपलब्ध होऊ शकणारा चारा याबाबतचा आराखडा तयार करावा. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा आणि पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. तसेच लातूर शहर पाणीपुरवठा जलवाहिनीच्या अवैध जोडण्या तोडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जलवाहिनीला गळती असल्यास त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी, असे त्यांनी सांगितले..वॉर रूममध्ये पथकवॉर रूममध्ये महसूल, महानगरपालिका, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम आणि नगर परिषद विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चौदा सदस्यीय पथक कार्यरत राहणार असून, दुष्काळ निवारणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले..लातूरमध्ये जिल्हास्तरीय वॉर रूमपावसाच्या सलग खंडामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांची वाढ, उत्पादकता, भूजल पातळी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेवर थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने या अनुषंगाने उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सोमवारी (ता. २८) दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.