Farmer Loss Maharashtra : दिनांक ७ मार्च १९६६. आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन् त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, ‘विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे...!’ कार्यक्रमाच्या भाषणात देखील त्यांनी हा सल बोलून दाखवला. आज या भीमेने आणि तिच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केलेय! काय झालेय नेमके?.आमच्या सोलापूर जिल्ह्याची मुख्य नदी म्हणजे भीमा. सीना आणि नीरा या दोन अन्य महत्त्वाच्या नद्या. भीमेच्या पात्रावर उजनी येथे १९६९ साली महाकाय धरणाचे काम सुरु झाले आणि १९८० मध्ये धरण पूर्णत्वास आले. सोलापूर शहराच्या पाण्याची समस्या मिटवण्यासाठी चक्क १२९ किमी दूर अंतरावरची जागा निवडली गेली. विशेष म्हणजे इथून बारामती केवळ ४३ किमी अंतरावर. सगळा भार, त्रास आणि हानी सोसली सोलापूर जिल्ह्याने विशेषतः करमाळा तालुक्याने. लाभार्थी झाला पुणे जिल्हा..धरण उशाला, कोरड घशाला ःविशेष म्हणजे धरणास ४५ वर्षे पूर्ण होऊनही सोलापूरला चार दिवसाआडच पाणी येते. तेही बऱ्यापैकी गढूळ आणि घाण! पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आणि कारखाने तसेच पुणे शहराची सगळी घाण पुढे जाऊन भीमेच्या पात्रात येते. उजनीजवळ भीमेचे पात्र अडवण्याआधी तिच्या माथ्यावरील भागात चासकमान, वीर, भाटघर, बंडगार्डन या धरणातील तसेच मुळा, मुठा, इंद्रायणी या नद्यांवरील धरणातील पाणीही भीमेमध्येच येते.इतकी सगळी घाण पोटात घेऊन ही नदी उजनीपाशी येते, जिथे तिचा प्रवाह अडवला गेलाय. परिणामी धरणात दरवर्षी हजारो टन गाळ वाढतोय. पुणे जिल्ह्यातील धरणे भरून झाली की तिथला ओव्हरफ्लो या पात्रात येतो. सोलापूर जिल्ह्यात पुण्याच्या मानाने खूप कमी पाऊस पडत असूनही उजनी शंभर टक्के भरते, मग धरणातून पाणी सोडले जाते..Chandrabhaga River Pollution: चंद्रभागा पात्रात मैलामिश्रित पाणी.परिणामी नदीकाठच्या ज्या गावात पावसाचा थेंबही नसतो अशा गावांची त्रेधा तिरपीट उडते, गावे जलमय होतात. अधून मधून शेतीसाठी आणि सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठीही पाणी सोडले जाते.दरवर्षी उन्हाळ्यात सोलापूरचे महापौर जलसंपदा मंत्रालयात भिकाऱ्यासारखे उभे असतात, मुख्यमंत्र्याच्या दालनात कटोरा घेऊन, पाणी सोडण्यासाठीचे आर्जव करत असतात. पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसाआड होऊ लागतो.नियमित व स्वच्छ पाण्यासाठी पूर्वी लोक बोंब मारत असत, आता लोकांच्या अंगवळणी पडलेय. शहरात पाणीसाठा करण्यासाठीचे मुबलक जलकुंभ नाहीत, हा क्रूर विनोद म्हणावा का? आमच्या इथले लोकप्रतिनिधी निव्वळ बाजारबुणगे आहेत. ज्यांच्यात दम आहे असे बोलले जाते तेदेखील आपल्या मतपेटीचे राजकारण करण्यात दंग दिसतात. .अलीकडे निवडून आलेले देखील याला अपवाद नाहीत, उलटपक्षी नव्याने आमदार झालेली मंडळी मूलभूत प्रश्नात स्वारस्य दाखवण्याऐवजी धार्मिक तेढ वाढून आपली पोळी कशी भाजता येईल यात अधिक रममाण झालेली दिसतात. असो. राजकारण्यांवर टीका करून काही फरक पडत नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी ४५ वर्षांपूर्वीची पाइपलाइन आता सातत्याने फुटते, तिला गळती लागते आणि पाणी वाया जाते. बऱ्याचदा धरणातील पाणीपुरवठा करणाऱ्या पंप स्टेशन्सचे फिडर्स वीजपुरवठा खंडित होऊन बंद पडतात. पाणीपुरवठा वाऱ्यावर सोडला जातो. दर दोन-तीन वर्षाआड दूषित पाण्यामुळे शहरात काही मृत्यू होतात.जे सत्तेत असतात ते तमाशा पाहतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते आंदोलने करतात, सत्ताधारी आणि विरोधक बदलेले गेले तरी भूमिका त्याच राहतात हे विशेष. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण केवळ आमच्या सोलापूरसाठीच असावी. .नदी नव्हे गटारगंगा ःभीमाशंकरच्या कुशीतून उगम पावणारी भीमा पंढरपूरजवळ येते तेव्हा तिचे गटार झालेले असते आणि भोळे श्रद्धाळू भाविक ते पाणी तीर्थ म्हणून पितात, त्यात स्नान करतात. वारीचे दिवस जवळ आले की जिल्हाधिकारी आणि जलसंपदावाले यांच्यात तमाशा रंगतो. काही टीएमसी पाणी सोडण्याची अनुमती मिळते. पंढरपूरजवळ भीमेचे पात्र चंद्रकोरीच्या आकारात दिसते, म्हणून ती चंद्रभागा या नावाने ओळखली जाते.संत जनार्दनांनी लिहिलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगात, ‘माझी बहीण चंद्रभागा करितसे पापभंगा’ अशी एक ओळ आहे. आता ही नदी पंढरपूरपाशीच डबक्याच्या स्वरूपात असते. आता पापभंग होत असेल का? मधल्या काळात ‘नमामी चंद्रभागे’चे नाटक करून झाले.नदीचे मूळ स्वरूप कधीच नष्ट झालेय. धरणातून पाणी सोडल्याशिवाय चंद्रभागेत पाणी वाहत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आणखी एक मौज म्हणजे, पंढरपूरपासून ते थेट दक्षिण सोलापूरपर्यंतच्या जेवढ्या भागातून भीमा वाहते तिथे तिच्या कोरड्या- ओल्या पात्रातून बारमाही वाळू उपसा सुरु असतो. सत्तेत असणारे सारे नीच अधम यात सामील असतात. यांना आजवर कुणीही वेसण घालू शकले नाही हे सत्य आहे..पाणी जिरणार कुठे? ःनदी बहुतांश काळ कोरडी असते वा त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते, अशा वेळी आणखी एक पुण्यकर्म केले जाते; नदी पात्राच्या कडेने भराव घालून त्यात घरे बांधली जातात. आसपासची झाडे कापली जातात.हे सर्व कमी होते की, काय म्हणून सोलापूर पुणे चौपदरी हायवेची निर्मिती करताना आधीच्या दुपदरी रस्त्याच्या दुतर्फा असणारी सगळी झाडे कापली गेली. सोलापूरपासून ते थेट उरुळीकांचन पर्यंत झाडांची हिरवीगार कमान रस्त्याने लागायची. ही सर्व झाडे काही महिन्यात कापली गेली.काहींनी न्यायालयात धाव घेतली तेव्हा सरकारच्या वतीने ग्वाही देण्यात आली की कापलेली झाडे वसवली जातील, त्यांचं पुनर्रोपण केलं जाईल. आजतागायत या रस्त्याच्या मधोमध असणारी खुरटी झुडपे सोडली तर अन्य वृक्षराजी दिसत नाही.यावर ताण करताना आणखी धक्कादायक कामे केली गेली, ती म्हणजे या चौपदरी रस्त्याच्या निर्मितीसाठी लाखो टन मुरूम बेकायदेशीर रित्या आसपासच्या गावांची हद्द खोदून उपसला गेला. परिणामी शेतजमिनी धसू लागल्या. याहीउपर कडी करताना काही खेड्यात देखील सिमेंटचे रस्ते करण्याचे पाप केले गेले. पाणी जिरणार तरी कुठे नि किती?आधीच आमचा जिल्हा अतिशय सपाट मैदानी भागाचा धनी. त्यात पाणी अडवून धरण्याच्या तमाम जागा अशा पद्धतीने उद्ध्वस्त केल्यानंतर या आठवड्यात सलग पडलेल्या पावसाने सर्वात जास्त नुकसान शेतकरी बांधवांचे झालेय. या सर्व अधम अमानुष निसर्गकत्तलीत शेतकरी सहभागी नव्हते मात्र तरीही त्यांना याची झळ सर्वाधिक पोहोचली..River Pollution: नद्या प्रदूषणमुक्तीसाठी पाण्यावर प्रक्रिया करू.बदललेली पीकपद्धती ःशेतीच्या बाबतीत एक मोठी चूक आमच्या जिल्ह्यात झालीय ती म्हणजे आमचा जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक मुख्य जिल्हा झालाय. ज्या जिल्हयात पर्जन्यमान कमी आहे तिथे केवळ भीमेच्या कालव्यांतून वाहणाऱ्या पाण्यावर डोळा ठेवून पाण्याची ही साठमारी झालीय, तिला काय म्हणावे? जवळपास सर्व तालुक्यांत साखर कारखाने हे सत्तास्थानाची भ्रष्ट प्रतीके झालीत. पुढाऱ्यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी जनतेला देशोधडी लावण्याचा हा कृषक प्रकार होय.एके काळी भूगोलाच्या पुस्तकात सोलापूरचा उल्लेख 'ज्वारीचे कोठार' असा असे. आता ज्वारी मुबलक पेरली जात नाही. वसंत, मालदांडी हे इथले मुख्य वाण होते. बेभरवशाच्या पावसामुळे अनेकदा पिके करपून जातात, दुबार पेरणीचे संकट येते. शिवाय पिकावर रोगराईही होते. मग शेतकरी ज्वारीसाठी उत्सुक दिसत नाही.तुलनेने उसाचे पीक कमी कष्टाचे. शिवाय एकदा ऊस लावला की गावाच्या मोकाट राजकारणी लोकांच्या जिपड्यात बोंबलत फिरायला नवी पिढी मोकळी होते. बाकी लोक हरिनाम सप्ताह करत बसतात. आळस वाढीस लागणारे हे सर्व कृषी धोरण.इथल्या शेतीमातीच्या कसानुसार पीक घेतलं पाहिजे, ते घेतलं जात नाही. दरम्यान लोकांनी दुभती जनावरेही घेतली. मात्र दुधाचा पैसा हा मृगजळासारखा आहे, ‘ज्यांच्याकडे खूप मोठया संख्येने गुरे आहेत त्यांना मलाई आणि बाकीच्या लोकांच्या नशिबी कसाई’ अशी स्थिती आहे. हे वास्तव आहे, कुणी याला नाके मुरडून काही फरक पडत नाही.मोठ्या प्रमाणात मातीची झीज गावोगावी होत गेली. वाट्टेल त्या किमतीवर रस्त्यांचे जाळे उभे करताना भविष्यात काय घडू शकते याचा कुणीही अदमास घेतला नाही, हे अतिशय खेदाने म्हणावे लागते.पाणी अडवून धरायला जागाच नसल्याने प्रलयकारी पाऊस झाल्याने सीनामाईचे पोट आता तट्ट फुगलेय. लाखो हेक्टर शेतीचे तिने वाटोळे केलेय. हजारो गुरे भीमेच्या आणि सीनेच्या उदरात गडप झालीत.कित्येक कुटुंबे दोन पिढ्या मागे गेलीत. बांधावर येणारे राजकारणी त्यांच्या आवडत्या राजकीय धंद्यात व्यग्र आहेत.आमच्या जिल्ह्याच्या वर्मी घाव बसला आहे मात्र याचे भान कुणालाच नाही, ही किती वाईट गोष्ट आहे ना! तरीही प्रार्थना करतो की आमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे तळतळाट कुणाला लागू नयेत.दीर्घकालीन आराखडा आखून, अनेक कठोर उपाययोजना करून, तसेच मोठ्या प्रमाणावर भौतिक बलिदाने देऊन ही भळभळती जखम कायमची बरी करता येईल. कष्टकरी श्रमिकांचा ही कर्मभूमी आहे, हिला असे वाऱ्यावर सोडू नका, अन्यथा याची कटू फळे मिळतील!.भीमेच्या भाळी वनवास ःसोलापूर जिल्ह्यातील चांदणी, कामिनी, मोशी, बोरी, सीना, माण, भोगावती आणि नीरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. यापैकी नीरा नदी पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंगपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या दरम्यान भीमाला मिळते.कर्नाटकात रायचूरच्या उत्तरेस सुमारे २४ किमी अंतरावर कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर भीमा कृष्णा नदीत विलीन होते . ज्या ठिकाणी दोन्ही नद्या एकत्र येतात, तिथे भीमा प्रत्यक्षात कृष्णा नदीपेक्षा लांब आहे. तरीही भीमेच्या भाळी वनवास आहे!जो सोलापूर जिल्हा दरवर्षी दुष्काळाच्या छायेत असतो तो थेट महापुराच्या थपडा खातोय हे चित्र अतिशय विदारक आणि भीषण आहे. याची खंत किती राज्यकारण्यांना आहे, हे या निमित्ताने दिसलेय. आगामी काळात असे पुन्हा पुन्हा घडू शकते.‘भिवरेच्या तीरी माहेर’ असणं आता कायमचे धोकादायक होईल का या प्रश्नाचे नेमके उत्तर कुणी देईल का? हे अश्रुपूर्ण सवाल आमच्या जिल्ह्यातील लेकींचे नसून भीमेचे आहेत, आमच्या मायमाऊलीचे आहेत!(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.