Solapur News: माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील ऊस अक्षरशः दुहेरी कात्रीत अडकला आहे. पुरानंतर तालुका व राज्यातील नेत्यांनी केलेली पाहणी, दिलेली आश्वासने आणि पूरग्रस्तांचा ऊस प्राधान्याने न्यायला जाईल या घोषणा प्रत्यक्षात मात्र हवेत विरल्याचे चित्र आहे. कारखानदारांनी पुरात तग धरलेल्या उसाकडे पाठ फिरवून तुलनेने चांगल्या आणि सुरक्षित उसालाच प्राधान्य दिल्याने सीना काठचा ऊस शेतातच पडून आहे..पुरातून कसाबसा वाचलेला ऊस आता तुरा धरून दिवसेंदिवस वजन, गुणवत्ता व साखर उतारा गमावत चालला आहे. आधीच पुरामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना याचा दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. त्यातच पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीसाठी कामगारांकडून भरमसाठ दराची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, ऊस न्यायला गेला तरी खर्च निघणे कठीण आणि न गेल्यास संपूर्ण पीक हातचे जाण्याची भीती अशी कोंडी निर्माण झाली आहे..Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत.ऊस शेतातच अडकून राहिल्याने पुढील रब्बी किंवा पर्यायी पिकांची लागवडही ठप्प झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका हंगामापुरता न राहता पुढील आर्थिक चक्रावरही परिणाम करणारा ठरत आहे. प्रशासन, कारखानदार आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील समन्वयाचा अभाव या संकटाला अधिक धार देत असून, आश्वासनांच्या पोकळ घोषणांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास ढासळत चालला आहे..Sugarcane Price Issue : सांगली जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सुटणार का?.पूरग्रस्तांचा वाली कोण? शेतकऱ्यांचा सवालसीना काठच्या पूरग्रस्त उसाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास असंतोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राधान्य कोट्यातून ऊस उचल, तोडणी–वाहतूक दरावर नियंत्रण आणि विशेष नियोजनाशिवाय पूरग्रस्तांच्या मदतीच्या घोषणा केवळ शब्दांची राख ठरणार आहेत. त्यामुळे आता पूरग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे..पुरात ऊस वाचवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस धडपड केली. नेते आले, फोटो काढले, आश्वासने दिली; पण आज कारखानदार आमच्याकडे फिरकतही नाहीत. ऊस नेला नाही तर संपूर्ण पीक वाया जाणार आहे. हा अन्याय किती दिवस सहन करायचा. आम्ही फार काही मागत नाही. फक्त पूरग्रस्त ऊस प्राधान्याने उचलावा आणि तोडणी–वाहतुकीचे दर नियंत्रणात ठेवावेत. वेळेत निर्णय झाले तर शेतकरीही परिस्थिती सावरू शकतो.- अमोल केसरे, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.महापुराच्या काळात सर्व कारखानदार तसेच विद्यमान व माजी आमदारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कारखाने सुरू झाल्यानंतर हे आश्वासन हवेतच विरले आहे. पूरामुळे आधीच मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांची आता कारखानदारांकडून पिळवणूक सुरू असून, मनमानी पद्धतीने एकरी १५ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचेच काम असून, कारखानदार व नेत्यांची आश्वासने केवळ जुमले असल्याचे सिद्ध झाले आहे.- किरण चव्हाण, शेतकरी, उंदरगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.