Agriculture Sector Flood Impact: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असलेला मराठवाडा पाण्यासाठी तहानलेला असायचा. याच भूमीत आता पावसाने कहर केला आहे. अतिमुसळधार पावसाने मराठवाड्याची पुरती दैना केली आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात महापुराने अनेक गावे उद्ध्वस्त केली होती. त्याचीच प्रचिती आता मराठवाड्यात येत आहे. शेती आणि नागरी जीवनाचे अतोनात नुकसान या पावसाने केले आहे. विरोधक ओल्या दुष्काळाची मागणी करत आहेत, तर सत्ताधारी ती मागणी अंगाला शिवूनही घेत नाहीत. .विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण, भाऊ आणि बरेच काही लाडके करून त्यांच्यासाठी थेट लाभाच्या योजना देऊन राज्याची तिजोरी रिकामी केली आहे. अर्थात, हेही सत्ताधारी नाकारतात. झाकली मूठ सव्वा लाखाची, असली तरी खरे काय ते सत्ताधाऱ्यांना माहीत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक तरतुदीचा विषय चर्चेला आला. की त्याआधी वित्त व नियोजन विभागाचे शेरे सरकारला आरसा दाखवतात. त्यामुळे माध्यमांसमोर आपली आर्थिक स्थिती कितीही बळकट असल्याचा दावा केला तरी त्यात फारसे तथ्य नाही..अलीकडे सजग माध्यमे आणि सोशल मीडियामुळे सरकारला कृतीच्या पातळीवर इकडे तिकडे काही करता येत नाही. भलेही आर्थिक मदत दिली नाही तरी नागरिकांना चालते पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन मात्र जबाबदारीचे असायला हवे अशी अपेक्षा असते. हे पुरते जाणून असलेल्या सरकारने लगोलग दौरे काढले आहेत. मदत साहित्यांच्या पिशव्यांवर फोटो लावून ते वाटणे सुरू आहे. दुसरीकडे परिस्थिती काय आहे?.Maharashtra Flood: डोळ्यांदेखत संसार वाहून गेला....शेतातील पिके तर वाया गेलीच आहेत पण वर्षानुवर्षे कसलेली शेती वाहून गेली आहे. झाडे कोलमडून पडली आहेत. दाव्याला बांधलेली जनावरे सोडायला उसंत न मिळाल्याने महापुरात जनावरांचा बळी गेला आहे. काडी काडीने जमवलेला संसार कोलमडून पडला आहे. अशा वेळी सरकार देते काय? दौऱ्यावर गेलेल्या सर्वच मंत्र्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे का जावे लागले? याची कारणे सरकारचे धरसोडीच्या धोरणात आहेत. सरकारने ‘लाडक्यां’साठी राबविलेल्या योजनांमुळे तिजोरी रिकामी झाली आहे असे सांगितले जाते..मात्र दुसरीकडे राज्यात ८६ हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग राबविला जातो. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये मेट्रोसारखे प्रकल्प राबविले जातात. राज्यावरच्या कर्जात भर घालून हे प्रकल्प राबविले जातात आणि त्याच वेळी आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी थोडी उसंत घेऊन राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेकडेही पाहणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० रुपये देतो म्हणून उच्चरवाने सांगणे सोपे आहे. पण याच योजनेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतील?.शेतीवर त्याचा नेमका परिणाम काय होईल, याकडे सरकारने पाहिलेले नाही. लाडक्या बहिणींनी भरभरून मते दिली असे सांगितली जाते. आता याच बहिणी बांधावर पाहणीला गेल्यावर गळे काढत आहेत. त्यांच्यासमोर उद्ध्वस्त झालेली शेती आहे आणि या शेतीच्या नुकसानीला दिली जाणारी मदत तुटपुंजी आहे. जसे सरकार आपला फायदा काढून घेत आहे तसे आपल्या भविष्याची काळजी या बहिणींना असायला हवी ती नाही. जर १५०० रुपये देऊन सरकार आपल्या शेतीच्या नुकसानीची मदत कमी करणार असेल तर आपल्यासाठी दीर्घकालीन सोयीचे काय आहे हे आता पाहण्याची वेळ आली आहे..Agricultural Crisis: राज्यातील नुकसानीचे क्षेत्र पोहोचले ८३ लाख हेक्टरवर.राजकारण करते कोण?२०२१-२२ पासून अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत होते. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या मदतीत मोठी वाढ केली. त्याचा उत्सवही साजरा केला. जेथे जाईल तेथे ही वाढीव मदत सांगून लोकांना बेजार केले. सर्वच पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत केली. जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० वरून १३ हजार ६००, बागायत पिकांसाठी १३ हजार ५०० वरून २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार वरून ३६ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय ८ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात आला..मात्र पुढील पाचच महिन्यांत हा निर्णय बदलून पूर्ववत करण्यात आला. हा शासन आदेश सरकारच्या संकेतस्थळावरून काढण्यात आला. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांचा पाऊस पाडला. शेतकरी बेंबीच्या देठापासून बदललेल्या शासन आदेशामुळे होणारे नुकसान सांगत होता. मात्र त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नव्हते. आज शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना शेतकरी हा प्रश्न विचारत आहेत तेव्हा मात्र, त्यांना हे शेतकरी राजकारण करत असल्याचा साक्षात्कार होत आहे. यातून नेमके राजकारण कोण करीत आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे..सरकारी यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांपुढे इतकी वाकते की पाठीचा कणाच नाही की काय अशी शंका येते. मात्र तीच यंत्रणा शेतकरी आणि सामान्य नागरिकांपुढे ताठ होते. नियमांचा कीस पाडून त्यांना बेहाल केले जाते. शेतीच्या पंचनाम्यांमध्ये सुसूत्रता नाही, खरवडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे माहीत नाही. त्यामुळे नियम दाखविले जातात. एक जिल्हाधिकारी वेगळा नियम लावतो तर दुसरा तिसराच दाखवून शेतकऱ्यांना निरुत्तर करतो. त्यामुळे आता सरकारने पोकळ बाता न मारता आपत्ती व्यवस्थापनात सुसूत्रता आणली पाहिजे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सरकारने १८२९ कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले. तसेच पुढील आठ दिवसांत २२१५ कोटी रुपये जमा केले जातील असे सांगून ओला दुष्काळ जाहीर करणार का, याचे उत्तर टाळले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रत्येक मंत्री ओल्या दुष्काळाचे नावही तोंडात घेणे टाळत होते. मात्र हेच मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून खनपटीला बसले होते. याचाच अर्थ काहीही झाले तरी ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही असाच आहे. सरकार आजचे मरण उद्यावर ढकलू शकते, पण सर्वच बाजूंनी सामान्य नागरिक नागवला जाऊ लागला आणि त्याला नीट उभे नाही केले तर कधीतरी उत्तर द्यावे लागेल..‘कात्रजचा घाट’ नका दाखवूमाणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागात अनेक बदल करण्याचा चंग बांधला. मात्र त्यांच्या बोलघेवडेपणामुळे विभाग बदलण्याची नामुष्की पदरी पडली. तुलनेने कार्यकर्त्यांतले मंत्री म्हणून ओळख असलेले दत्तात्रय भरणे यांनी कृषिमंत्री झाल्यानंतर काही काळ आढाव्यात घालवले. मामा अशी ओळख असलेले भरणे ऐकून घेतात. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कोकाटे यांचा विश्वास संपादन करून कागदी घोडे काही काळ नाचवले. मात्र मामांनी नेमके पकडायला सुरू केले आहे. त्यामुळे नेमके कुठे जायचे ते सांगा, उगाच ‘कात्रजचा घाट’ दाखवू नका, असे भर बैठकीत मामा सांगू लागल्याने अनेकांची गोची होत आहे.: ९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.