Kolhapur News: चंदगड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक ऊस या नगदी पिकाला पर्याय शोधत असून, त्यामध्ये नाचणी (रागी) पीक फायदेशीर ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न, तुलनेने कमी खर्च आणि बाजारात वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांचा नाचणी लागवडीकडे कल वाढत आहे. विशेषतः उन्हाळी नाचणीचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे..ऊस हे बारमाही पीक असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत, पाणी, खत आणि भांडवली खर्च करावा लागतो. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत नफा कमी मिळतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. याउलट नाचणी हे कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक ठरत असून, शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चंदगड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून हळूहळू उसाचे क्षेत्र कमी करून नाचणीची लागवड वाढवली आहे..Summer Groundnut Cultivation: उत्तम उत्पादनासाठी उन्हाळी भुईमुगाची सुधारित लागवड फायदेशीर ठरते का?.खरीप हंगामात एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळते. मात्र, उन्हाळी हंगामात योग्य नियोजन आणि मेहनत घेतल्यास १४ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा अनुभव आहे. उन्हाळ्यात पिकाची निगा चांगली राखता येत असल्याने पीक भरघोस येते. शिवाय, नाचणी काढणीनंतर मिळणारी कड जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून उपयोगी पडत असल्याने हे पीक दुहेरी फायद्याचे ठरत आहे..उन्हाळी नाचणी लागवडीसाठी नोव्हेंबर महिन्यात गादीवाफ्यावर पेरणी केली जाते. सुमारे दीड महिन्यानंतर डिसेंबरमध्ये शेतात सऱ्या मारून २० बाय १५ सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. लागवडीपूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. गरजेनुसार खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते..Summer Onion Cultivation: उन्हाळी कांदा लागवडीचे सुधारित तंत्र; उत्पादन वाढवा, नुकसान कमी करा!.मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी जानेवारीत लागवड केल्याने मे महिन्यात काढणी आली. त्याच कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी व डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड करण्यात आली. त्यामुळे एप्रिलमध्ये पीक परिपक्व होऊन पावसाचा फटका टाळता येईल, असे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे..बाजारभावाच्या दृष्टीने पाहता, शहरी भागात नाचणीची मागणी सातत्याने वाढत आहे. मॉल व सुपर मार्केटमध्ये नाचणी ६५ ते ७० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. मात्र, ग्रामीण भागात व्यापारी शेतकऱ्यांकडून ती ३५ ते ४० रुपये प्रति किलो दराने खरेदी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते..उसाने शेतकऱ्याला आर्थिक बळ दिले असले तरी भांडवली खर्च, तोडणी काळातील त्रास आणि वन्य प्राण्यांकडून केले जाणारे नुकसान यामुळे शेतकरी पर्याय शोधत आहेत. नाचणी हे पीक त्यासाठी उत्तम पर्याय ठरत आहे.- नागेश गुरव, शेतकरी, सातवणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.