Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनी विकावी लागल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. परंतु सरकारी पातळीवर मात्र या विषयाबद्दल अनास्था दिसून आली. सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्याने किंवा आमदाराने या विषयावर भाष्य केले नाही. .तसेच गृह, वैद्यकीय शिक्षण आणि सावर्जनिक आरोग्य या विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून दिली. हे प्रकरण परदेशात घडल्याने या विभागांशी याचा काहीच संबंध येत नसल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला. सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना हरपल्या असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली..रोशन कुडे यांच्याकडून एक लाखाच्या कर्जापोटी दहा लाख रुपये रोख आणि दोन एकर शेती नावे करून घेतल्यानंतरही कर्ज थकित असल्याचे भासवीत सावकाराने वसुलीचा तगादा लावला होता. चक्रवाढ व्याज लावत कर्जाची रक्कम ७४ लाखावर गेल्याचे सांगण्यात आले. नागभीड तालुक्यातील मिन्थुर येथील कुडे यांची चार एकर शेती. शेतीला पूरक व्यवसायाची जोड असावी म्हणून त्यांनी १२ दुधाळ गाईंची खरेदी केली..Moneylenders Loan: सावकारी ओझ्याखाली एक लाखावर कर्जदार.त्याकरिता दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र या गाईंना ‘लम्पी’ची लागण झाली. त्यांच्यावरील उपचारासाठी म्हणून परत दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतले. इतके करूनही गाईंना मात्र वाचवता आले नाही. दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला. या कर्जाच्या वसुलीसाठी सावकारांकडून सुरुवातीला तगादा, टोमणे आणि पुढच्या काळात धमक्या सुरू झाल्या..कर्जातून सुटका व्हावी म्हणून कुडे यांनी सावकारालाच दोन एकर जमीन विकली. तसेच ट्रॅक्टर, पत्नीच्या अंगावरील दागिने आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपले नाही. कर्ज चुकविण्यासाठी आणखी काही सावकारांसमोर हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशातच एका सावकाराने कुडे यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला..त्यानंतर एका एजंटाच्या माध्यमातून कंबोडिया येथील नॉम पेन्ह या शहरात त्यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडली. त्यानंतर २६ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णालयातून सुट्टी झाली. विमानाने ते तिरुअनंतपुरम येथील विमानतळावर उतरले व गावी परतले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात सहा सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..पाच सावकारांना अटकरोशन कुडे यांनी या प्रकरणात महिनाभरापूर्वीच तक्रार दिली. परंतु पोलिसांनी या तक्रारीची कोणतीच दखल घेतली नाही, असा आरोप आहे. मात्र या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर ब्रह्मपुरी येथील मनीष घाटबांधे, किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर या सहा सावकारांविरोधात भारतीय दंड संहिता १२० (ब), ३२६, ३४२, २९४, ३८७, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहेत. हे प्रकरण मानवी तस्करीशी संबंधित असल्याने या दिशेनेही आता पोलिस तपास करीत आहेत..Illegal Moneylending : अकोटमध्ये अवैध सावकाराविरुद्ध कारवाई.एक लाखाचं कर्ज घेतलं. त्याचे ७४ लाख झाले. चार महिन्यांपासून दारोदार भटकत होतो. पोलिसांकडे तक्रार केली. पण न्याय मिळाला नाही. शेवटी कर्जासाठी किडनी गेली, आता हातात काहीच उरलेलं नाही. आता मंत्रालयासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होणार आहे.रोशन कुडे, पीडित शेतकरी.सर्व प्रकरणांचा तपास केला असता गैरअर्जदार आणि अर्जदार यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अवैध सावकारीचा प्रकार घडला, असे निष्पन्न झाले आहे. मम्मूका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.२००५ मध्ये डोरली हे गाव शेतकऱ्यांनी विक्रीस काढले होते. त्यानंतर रसूलापूर या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यासाठी किडनी विकण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी भाजपकडून या बाबींचा राजकीय फायदा घेण्यात आला. आता मात्र भाजपच्या सत्ताकाळात शेतकऱ्याला थेट किडनी विकावी लागली, हे दुर्दैवी आहे.विजय जावंधिया, शेती प्रश्नांचे अभ्यासक.शेतकऱ्याची किडनी थेट विदेशात काढली जाते. याची थोडीशीही कल्पना गुप्तवार्ता विभागाला लागत नाही. हे मुख्यमंत्र्याच्या नियंत्रणातील गृहखात्याचे मोठे अपयश आहे. राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.विधिमंडळातील आजी-माजी सदस्यांचे निधन झाल्यास शोक प्रस्ताव मांडला जातो आणि कामकाज स्थगित होते. गेल्या काही वर्षांत तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या प्रति कोणत्याच संवेदना व्यक्त केल्या जात नाही. यापेक्षा कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव काय असेल?बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.सावकाराकडून किडनी विकली जाते ही क्रौर्याची सीमा आहे. शेतकऱ्यांवर सावकारी पाश अधिक घट्ट होत आहे हे यावरून सिद्ध होते.ललित बहाळे, अध्यक्ष, शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणीत).सावकारी कर्ज चुकविण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागते हा प्रकार दुर्दैवी आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून त्यामध्ये बँकांचेच नाही तर आता सावकारी कर्ज देखील माफ केले पाहिजे.अजित नवले, शेतकरी नेते, किसान सभा.शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याची किडनी काढून विकली जाते, ही अत्यंत लाजिरवाणी व संतापजनक घटना आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ लक्ष घालून कठोर कारवाई करावी. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह मुंबईत रस्त्यावर उतरेल.रविकांत तुपकर, अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी मुजोर खासगी सावकारांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. राज्यातील शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने रक्षण करणारे सरकार महाराष्ट्रात होते. परंतु सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणींची अक्षरशः परिसीमा झाली असून त्यांच्यावर किडन्या विकण्याची वेळ आली आहे.सुप्रिया सुळे, खासदार.शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागली. ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्याला काळिमा फासणारी आहे. हा राज्यातील अपयशी व्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे. शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा चौकशी समित्या बसतात. पण शेतकरी जिवंत असताना त्याला जगण्यासाठी आधार देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? सरकारने वेळीच जागे व्हावे, नाही तर शेतकरी संपून जाईल.जयंत पाटील, आमदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.