Latur News : शेती व शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या शेतरस्त्यांना कायमची ओळख मिळणार आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गाच्या धर्तीवर शेतीसाठी उपयुक्त ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग तसेच शिव आणि पांदण रस्त्यांना आता स्वतंत्र क्रमांक मिळणार आहे. .या रस्त्यांच्या हद्दी निश्चित करुन म्हणजेच त्यांचे सीमांकन करुन त्यांचे गाव नमुन्यात स्वतंत्र रेकॉर्डही ठेवले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने शुक्रवारी (ता. २९) कार्यपद्धती जाहीर केली असून त्यानुसार लवकरच गावकुसात कार्यवाही सुरु होणार आहे. यामुळे शेतरस्त्यांचे अस्तित्व आता पिढ्यान पिढ्या कोणीच मिटवून शकणार नाही..Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले.राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गाच्या धर्तीवर शेतरस्त्यांनाही रस्त्याचा दर्जा देऊन त्यांना सांकेतिक क्रमांक द्यावे व त्यांची बांधणी, सुधारणा व मजबुतीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आमदार पवार यांनी पाच वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. या कार्यपद्धतीनुसार सुरुवातीला ग्रामसेवक व तलाठी गावनकाशावर नोंद असलेल्या वापरातील किंवा अतिक्रमित शेतरस्त्यांची यादी तयार करुन त्याची नोंद एका प्रपत्रात घेणार आहेत. .यासोबत गावनकाशावर नोंद नसलेल्या पण वापरात असलेल्या शेतरस्त्यांची नोंद दुसऱ्या प्रपत्रात घेऊन रस्त्यांची यादी तयार करणार आहेत. ही यादीला ग्रामसभेची मान्यता घेऊन ती तहसीलदारांना देण्यात येणार आहे. तहसीलदारांकडून नकाशावर नसलेल्या आणि अतिक्रमित रस्त्यांची यादी भूमिअभिलेख विभागाला देण्यात येणार असून भूमिअभिलेख विभागाकडून या रस्त्यांचे सीमांकन म्हणजे मोजणी करून हद्दीची निश्चित करण्यात येणार आहे. .यात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सीमेवर सिमेंटचे खांब (बाऊंडरी पिलर) उभारण्यात येणार आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मामलेदार कोर्ट कायदा व महसूल कायद्यानुसार नोटीस देऊन तहसीलदारांकडून पोलीसांच्या मोफत बंदोबस्तात कारवाई होणार आहे..सर्व रस्त्यांची लांबी, रुंदी, तो रस्ता कोणत्या कोणत्या गट क्रमांकातून जातो आदी माहितीची नोंद स्वतंत्र गाव नमुन्यात ठेवण्यात येणार असून त्यासाठी अन्य गाव नमुन्याप्रमाणे सरकारने गाव नमुना नंबर १ (फ) निश्चित केला आहे. यासोबत रस्त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवरील इतर हक्कात शेतरस्त्याची नोंद केली जाणार आहे. रस्त्याच्या तपशीलासोबत त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नमुद केली जाणार आहे..Farm Road: राज्यात पाच वर्षांत पक्के शेतरस्ते.‘एमएच’च्या धर्तीवर रस्त्याला क्रमांकनोंदणीनंतर नवीन वाहनांना एमएचपासून सुरवात होणार क्रमांक दिला जातो. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा सांकेतिक क्रमांक सुरुवातीला असतो. याच धर्तीवर विविध शेतरस्त्यांच्या प्रकारानुसार जिल्हा, तालुका, गाव व रस्ता क्रमांक या क्रमाने शेवटी रस्त्याचा प्रकार असेल. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाला क्रमांक देण्यात आले आहेत. .लातूरसाठी २४ तर धाराशिवला २३ क्रमांक आहे. `ए` प्रकारात डबल लाईन, `बी` प्रकारात डबल डॉटेड लाईन रस्ता, `सी` प्रकारात सिंगल डॉटेड लाईन रस्ता, `डी` प्रकारात वापरात असलेल्या नकाशावर नोंद नाही, असा रस्ता तर `ई` प्रकारात शिव व पाणंद रस्ता रस्त्याचा समावेश आहे. .या पद्धतीने लातूर तालुक्यातील मुरुड या पहिल्या गावातील पहिल्या प्रकारातील रस्त्याला २४_०१_००१_००१_ A असा क्रमांक असणार आहे. याच पद्धतीने `ए` ते `ई` प्रकारच्या रस्त्याला क्रमांक दिला जाणार असून या कार्यपद्धतीने शेतरस्त्यांची रचना निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्येक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे..शेतरस्ते व पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सरकारने यापू्र्वी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. आता शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा अभ्यास करून समितीला शिफारसी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली आहे. आतापर्यंत शेतरस्त्यांची इतर हक्कात नोंद, रुंदी बारा फूट तसेच मामलेदार कोर्ट व महसूल कायद्यानुसार शेतरस्त्याबाबतचे निकाल ९० दिवसात देणे, रस्त्याला क्रमांक देणे आदी मागण्या मार्गी लागल्या आहेत. राहिलेल्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्यासह राहिलेल्या मागण्याही लवकरच मार्गी लागतील.- अभिमन्यू पवार, आमदार, औसा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.